राज्याचे हिवाळी अधिवेशन तीन दिवसांचेच निश्चित

३० जानेवारी रोजी अर्थसंकल्प मांडणार

22nd January 2019, 06:24 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता            

पणजी : राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन तीन दिवसांचेच राहणार आहे. अधिवेशनाला २९ जानेवारीपासून सुरुवात होईल. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ३० रोजी अर्थसंकल्प मांडतील. अधिवेशनाचा समारोप ३१ रोजी होईल. सोमवारी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या विषयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.            

पर्वरी विधानसभा संकुलात बोलावण्यात आलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते. त्यांच्यासोबत सभापती डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, उपसभापती मायकल लोबो, आमदार चर्चिल आलेमाव आदींचीही उपस्थिती होती. नवीन वर्षाचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या अभिभाषणाने कामकाजाला सुरुवात होईल. अधिवेशनाचा कालावधी वाढविला जावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांनी केली होती. परंतु सरकारने ती अमान्य केली. अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी आणि खातेनिहाय मागण्यांसाठी पुढे १८ दिवसांचे अधिवेशन होईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी हा विषय संपवला आहे.

या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० जानेवारी रोजी २०१९- २० या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर होईल. या अधिवेशनात पुरवणी मागण्या, लेखानुदानाला मंजुरी मिळवून ३१ रोजी अधिवेशन आटोपते घेतले जाईल. तीन सरकारी दुरुस्ती विधेयके या अधिवेशनात सादर होण्याची शक्यता आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयक व अनुसूचित जाती-जमातीविषयक एका दुरुस्ती विधेयकाचा यात समावेश आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

‘केवायसी’ पूर्ततेसाठीच पैसे काढण्यावर निर्बंध

टपाल खात्याकडून ट्वीट संदेशाद्वारे स्पष्टीकरण Read more