कारवारजवळ बोट उलटून १५ भाविक समुद्रात बुडाले

उशिरापर्यंत सापडले ९ मृतदेह; ८ जण बचावले

22nd January 2019, 06:19 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता

काणकोण : कर्नाटकातील कारवारजवळील अरबी समुद्रात असलेल्या कुर्मागड बेटावरील जत्रेवरून बोटीने परतणारे १५ भाविक बोट उलटल्याने समुद्रात बुडाले. यातील ९ जणांचे मृतदेह रात्री उशिरा हाती लागल्याचे समजते. तर अन्य ६ जण बेपत्ता आहे. ही घटना सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. बोटीमध्ये एकूण २५ प्रवासी होते. बोटीला पकडून राहिल्याने ८ जण सुखरूप बचावले. दरम्यान, अलीकडच्या काळातील दक्षिण भारतातील ही सर्वांत मोठी दुर्घटना असल्याचे बोलले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, कारवारजवळ समुद्रात ३ किलोमीटर अंतरावर कुर्मागड बेट आहे. या बेटावर श्री नरसिंह देवस्थान हे प्रसिद्ध देवस्थान आहे. या देवस्थानच्या जत्रेसाठी दरवर्षी सुमारे २५ हजार भाविक उपस्थिती लावत असतात. यंदाही या जत्रेसाठी हजारोंच्या संख्येने भाविक आले होते. याच जत्रेहून बोटीतून परतताना सोमवारी भाविकांवर काळाने घाला घातला. सोमवारी दुपारच्या सुमारास अरबी समुद्र आणि काळी नदीच्या संगमावर बोट उलटून २५ पैकी १५ जण बेपत्ता झाले. तर अन्य ८ जण बोटीला पकडून राहिल्याने सुखरूप बचावले. बोट जेव्हा संगमावर पोहोचली तेव्हा समुद्राला भरती आली होती. त्यामुळे नावाड्याने बोटीचा वेग कमी करून ती थांबवली होती. बोट जेव्हा पुढे जाण्यासाठी निघाली त्याच वेळेस ती उलटली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बोटीने तीन वेळा पलटी खाल्ली आणि नंतर पाण्यात बुडाली. ज्यांना पोहता येत होते. ते बोटीला पकडून राहिल्याने सुखरूप बचावले. ते चक्क २० मिनिटे बोटीला पकडून होते. यात एक लहान मुलगा सुखरूप बचावला असून, त्याची आई मात्र बुडाली.

बोट बुडाल्याचे पाहून याच मार्गावर असलेल्या अन्य ५ ते ६ होड्यांतील प्रवाशांनी त्यांना मदतकार्य देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमार आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. त्यांनी बोटीला पकडून असलेल्यांना सुखरूप बाहेर काढून उपचारार्थ कारवार वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले. त्यानंतर नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर आणि पाणबुड्यांनी येऊन बेपत्ता प्रवाशांचा शोधकार्य सुरू केले.

दरम्यान, याच जत्रेला जाताना १८ वर्षांपूर्वी अशीच होडी उलटलामुळे कित्येक जणांचा बुडून मृत्यू झाला होता. सोमवारच्या घटनेमुळे त्या घटनेची सर्वांना आठवण झाली.

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

तेंडुलकरांनी खासदार निधीतून दिलेल्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचा शुभारंभ

औद्योगिक वसाहतीसाठी वाहन उपयुक्त ठरणार : मुख्यमंत्री डॉ. सावंत Read more

पणजी, म्हापसा, वास्को ओडीपींत २०० कोटींचा घोटाळा

आराखडे तात्काळ रद्द करून दोषींवर कारवाई करा : गिरीश चोडणकर Read more

Top News

चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचे आश्वासन; लवकरच कामाला सुरुवात Read more