होय ! मुक्तीपेक्षा जनमत कौलच श्रेष्ठ

काळे बावटे दाखवाच; मंत्री विजय सरदेसाई यांचे गोवा सुरक्षा मंचाला आव्हान

22nd January 2019, 06:17 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

मडगाव : गोवा मुक्तीमुळे आपल्याला भारतीयत्व प्राप्त झाले, हे जरी खरे असले तरी गोव्याचे वेगळेपण आणि गोंयकारपण हे जनमत कौलामुळेच सुरक्षित राहू शकले. त्यामुळे आपल्या विधानात काहीच गैर नाही, असा पुनरुच्चार गोवा फॉरवर्डचे नेते तथा नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी केला. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी गोवा सुरक्षा मंचाने आपल्याला काळे बावटे दाखवूनच दाखवावे, असे आव्हानही सरदेसाई यांनी दिले.  

मडगाव येथे सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सरदेसाई यांनी गोवा सुरक्षा मंचाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांना लक्ष्य केले.       

गोवा मुक्तीलढ्याबाबत वेलिंगकर यांनी आपल्याला शिक्षण देण्याची गरज नाही. आपले आई-वडील, काका, मामा व अन्य कुटुंबियांनी मुक्तीलढ्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. त्यांचे याबाबतीत मोलाचे योगदान आहे. गोवा मुक्तीलढ्याशी आपल्या कुटुंबियांचा जवळचा संबंध आहे. सुभाष वेलिंगकर यांचा राष्ट्रवाद भेसळ आहे. म्हणूनच तर त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून देखील बाहेर काढण्यात आले, असा टोला सरदेसाई यांनी हाणला.       

जनमत कौलाचे महत्त्व फार मोठे आहे. त्याचे महत्त्व दुर्लक्षित करता येणार नाही. गोवा मुक्तीचे महत्त्व कुणीही कमी करीत नाही, पण जनमत कौलाचा निकाल विरोधात गेला असता तर आजचा गोवा शिल्लक राहिलाच असता काय? असा सवाल सरदेसाई यांनी विचारला आहे. आपल्या विधानात काहीच गैर नाही. त्यामुळे आपल्याला कुणाचीही माफी मागायची गरज नाही. प्रजासत्ताक दिनी गोवा सुरक्षा मंचाने जिल्हा संकुलाच्या बाहेर ‘काळे झेंडे’ दाखवावेच, असे आव्हान मंत्री विजय सरदेसाई यांनी यावेळी दिले.                   

गोवा सुरक्षा मंच अशा पद्धतीने राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमाला ‘काळे बावटे’ दाखवणार असेल तर, गोवा फॉरवर्ड आणि जनमत कौलाचे समर्थक हे आपली ताकद दाखवायला तयार आहेत. गोवा सुरक्षा मंच हा लोकशाही विरोधी आहे. प्रत्येक वेळी राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांना ‘काळे बावटे’ दाखवून हा पक्ष कोणत्या राष्ट्रवादाचे दर्शन घडवतो, असाही सवाल सरदेसाई यांनी केला आहे. 

ढवळीकर जनमत कौलाच्या विरोधात 

सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मडगावच्या पालिका उद्यानाला जॅक सिकेरा यांचे नाव देण्याचा सल्ला दिला आहे. ढवळीकरांनी असा सल्ला देण्याची काहीच गरज नाही. मुळात म.गो. पक्ष आणि ढवळीकर यांनी खरोखरच जनमत कौलाच्या बाजूने मतदान केले होते काय, असा सवाल मंत्री विजय सरदेसाई यांनी केला आहे. जॅक सिकेरा यांच्याप्रती ढवळीकरांना एवढाच पुळका असेल तर त्यांनी बांदोडा येथे हा पुतळा उभारून दाखवावा, अशी मल्लीनाथी विजय सरदेसाई यांनी केली. नगरपालिका ही स्वायंत्त संस्था आहे. सुदिन ढवळीकर यांनी विनाकारण या स्वायत्त संस्थेच्या कारभारात लुडबुड करू नये. पालिकेत दूषित राजकारण करून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न ढवळीकरांनी करू नयेत, असा सल्ला सरदेसाई यांनी दिला.

गोवा, दमण-दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेकडून वक्तव्याचा निषेध

गोवा मुक्तीपेक्षा जनमत कौल श्रेष्ठ आहे या मंत्री विजय सरदेसाई यांच्या वक्तव्याचा गोवा, दमण-दीव स्वातंत्र्य सैनिक संघटनेतर्फे निषेध करण्यात आला. विजय सरदेसाई यांनी ताबडतोब आपले हे वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा पुढील परिणामांना सज्ज व्हावे, असा इशाराही संघटनेने दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत विष्णू पेडणेकर यांनी यासंबंधीचे पत्रक जारी केले आहे. अशा पद्धतीचे बेजबाबदार वक्तव्य नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी अजिबात शोभत नाही, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.  

Related news

चिरे खाणींच्या खंदकांवर सुरक्षात्मक उपाय करा

खाण खात्याचा आदेश; २० ऑक्टोबरपर्यंत मुदत Read more

अवैध रेती, चिरे खाणी; खाण खाते लक्ष्य

इतर खात्यांच्या असहकार्याचा फटका; प्रभावी तोडगा काढण्यासाठी उचलली पावले Read more

गोमेकॉतील भरतीबाबत अस्पष्टता

३० हजार उमेदवारांचे भवितव्य अनिश्चित; खाते प्रमुखही बुचकळ्यात Read more

Top News

चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचे आश्वासन; लवकरच कामाला सुरुवात Read more

अवैध रेती, चिरे खाणी; खाण खाते लक्ष्य

इतर खात्यांच्या असहकार्याचा फटका; प्रभावी तोडगा काढण्यासाठी उचलली पावले Read more

चिरे खाणींच्या खंदकांवर सुरक्षात्मक उपाय करा

खाण खात्याचा आदेश; २० ऑक्टोबरपर्यंत मुदत Read more