खेलो इंडिया : २२८ पदकांची कमाई करत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर


20th January 2019, 04:39 pm
खेलो इंडिया : २२८ पदकांची कमाई करत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर

पुणे :यजमान महाराष्ट्रने २२८ पदकांसह पुणे येथे रविवारी समारोप झालेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धा २०१९मध्ये पदक तक्त्यात पहिले स्थान मिळवले. या स्पर्धेत हरयाणा व दिल्ली यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान मिळाले.
महाराष्ट्रने एकूण ८५ सुवर्ण, ६२ रौप्य व ८१ कांस्य पदकांची कमाई केली. हरयाणाने एकूण १७८ पदके पटकावली. त्यांच्या खात्यात ६२ सुवर्ण, ५६ रौप्य व ६० कांस्य पदके मिळवली. दिल्लीने १३६ पदकांमध्ये ४८ सुवर्ण, ३७ रौप्य व ५१ कांस्य पदकांची कमाई केली.
कर्नाटकला ७७ पदकांची कमाई करता आली. त्यांनी ३० सुवर्ण, २८ रौप्य व १९ कांस्य पदकांची कमाई केली. तामिळनाडूनेही एकॅण ८७ पदकांची कमाई करताना २७ सुवर्ण, ३५ रौप्य व २५ कांस्य पदके आपल्या खात्यात टाकली. उत्तर प्रदेशने २३ सुवर्ण, २५ रौप्य व ४० कांस्य पदकांसह एकूण ८८ पदके जिकली.
यानंतर पंजाब (७२ पदके), गुजरात (३९), पश्चिम बंगाल (४४) व केरळ (५८) यांचा क्रमांक लागतो. भारत सरकारच्या क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालयद्वारे आयोजित या स्पर्धेत २९ राज्य व ७ केंद्रशासीत राज्यांतील एकूण ६०० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंनीही समाधानकारक कामगिरी केली. स्पर्धेत गोव्याने एकूण ८ रौप्य, ९ कांस्य पदकांची कमाई करताना एकूण १७ पदकांची कमाई केली. गोव्याच्या सुमन पाटील, श्रुंगी बांदेकर, सोहन गांगुली, झेवियर डिसोझा, यश पाडलोस्कर, सुमन यादव यांनी पदकांची कमाई केली.