इमाम, हाफीजच्या खेळीने पाकिस्तान विजयी

पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५ गडी राखून पराभव


20th January 2019, 04:38 pm
इमाम, हाफीजच्या खेळीने पाकिस्तान विजयी

पोर्ट एलिझाबेथ :इमाम उल हक व महम्मद हाफीजच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा ५ गड्यांनी पराभव केला. हाशिम आमलाच्या शतकानंतरही आफ्रिकेचा संघ निर्धारित ५० षटकांत २ गडी गमावून केवळ २६६ धावाच करू शकला. हे लक्ष्य पाकिस्तानने चार चेंडू शिल्लक ठेवून गाठले. पाच सामन्यांच्या या मालिकेत पाकिस्तानने १-० अशी आघाडी घेतली आहे.
आमला - दुसानची खेळी व्यर्थ
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमलाने हेंड्रिक्ससोबत मिळून संघाला चांगली सुरुवात करून दिली. आमलाने नाबाद १०८ धावांची खेळी केली. हेंड्रिक्सने ४५ धावांचे योगदान दिले. यजमान संघाला पहिला धक्का ८२ धावांवर हेंड्रिक्सच्या रुपात बसला, मात्र यानंतर आमलाने रासई दुसानसोबत मिळून मोठी भागीदारी करताना धावसंख्यह २३७ धावांपर्यंत पोहोचवली. दुसान आपल्या शतकापासून केवळ ६ धावांनी दूर राहिला. संघाची धावसंख्या २३७ झाली असता हसन अलीने दुसानला शोएब मलिकच्या हाती बाद करवले. यानंतर आमलाने मिलरसोबत ​मिळून डाव पुढे नेण्यास सुरुवात केली व निर्धारित ५० षटकांत २ बाद २६६ धावा केल्या. हसन अली व शादाब खान यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
हाशिम आमलाने केलेल्या शतकाला इमाम व हाफीजने ग्रहण लावले. पाकिस्तानने ४५ धावांवर फखर झमानच्या रुपात पहिला गडी गमावला तरी इमामने बाबर आझमसोबत ​मिळून पाकिस्तानचा डाव पुढे नेला. १३९ धावांवर हेंड्रिक्सने आझमला त्रिफळाचीत करत ही भागीदारी मोडून काढली. ही भागीदारी तुटल्यानंतर इमाम व हाफीजच्या भागीदारीमुळे पाकिस्तानची धावसंख्या १८५ धावांपर्यंत पोहोचली. येथे ऑलिव्हरने इमामला बाद करत पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. मात्र एका बाजूला हाफिज टिकून खेळत होता व तो दक्षिण आफ्रिकेच्या विजयात सर्वांत मोठा अडथळा होता. इमाम बाद झाल्यानंतर शोएब मलिक व नंतर सरफराज अहमद व शादाब खान यांनी लहान लहान भागीदाऱ्या करत पाकिस्तानला विजयापर्यंत पोहोचवले.----बॉक्स---
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत २ बाद २६६ धावा : हाशिम आमला (नाबाद) १०८, रिझा हेंड्रिक्स झे. हसन गो. शादाब ४५, रासई दुसान झे. शोएब गो. हसन ९३, डेव्हिड मिलर (नाबाद) १६. गोलंदाजी : हसन अली १०-२-४२-१, शादाब खान १०-०-४१-१.
पाकिस्तान : ४९.१ षटकांत ५ बाद २६७ धावा : इमाम उल हक झे. हेंड्रिक्स गो. ऑलिव्हर ८६, बाबर आझम त्रि. गो. हेंड्रिक्स ४९, महम्मद हाफिज (नाबाद) ७१, शादाब खान (नाबाद) १८. गोलंदाजी : दुआने ऑलिव्हर १०-०-७३-२, इम्रान ताहीर १०-०-४४-१, रिजा हेंड्रिक्स ३-०-१३-१