गोवा क्रिकेटला हवी योग्य दिशा

क्रीडा रंग

Story: सचिन दळवी |
19th January 2019, 10:54 am
गोवा क्रिकेटला हवी योग्य दिशा


----
स्वप्नील अस्नोडकर, शदाब जकाती यांच्यावरून झालेल्या अनेक वादविवादांवर मात करत गोव्याचा रणजी संघ रणजी करंडक खेळला. यावेळी संघात काही अनुभवी व नव्या खेळाडूंची भरणा असल्यामुळे किमान यावेळी गोव्याचे प्रदर्शन चांगले होईल, असे वाटत होते. मात्र, गोव्याचे २०१८-१९ वर्षातील प्रदर्शन अतिशय खराब राहिले.
गोव्याच्या संघाकडून रणजी करंडकात चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती. मात्र, कर्णधार सगुण कामत यांची व तळातील फलंदाजांची थोडेफार कामगिरी वगळता गोव्याची एकंदर कामगिरी ही निराशाजनक राहिली आहे. गोव्याने या सत्रात एकूण नऊ सामने खेळले. यात त्यांनी सात सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला. दोन सामने अनिर्णीत ठेवण्यात यश आले. यातील उत्तर प्रदेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात गोव्याला डाव आणि २४७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
सलामीवीरांचे अपयश
कोणत्याही संघाची सामन्यातील दिशा ही मुख्यत्वे सलामीवीर निश्चित करतात. जर ते संपूर्ण सत्रात अपयशी राहिले तर संघालाही त्याची किंमत मोजावी लागते. गोव्याच्या बाबतीतही हाच प्रकार घडला. गोव्याला सलामीवीरांकडून संघाला अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यांच्या अपयशामुळे नेहमी तिसऱ्या स्थानावर येणारा कर्णधार सगुण कामतला सलामीला खेळावे लागले. तीन सामने वगळता गोव्याच्या सलामीवीरांना प्रभाव पाडता आला नाही.
गाेलंदाज निष्प्रभ
एका बाजूला गोव्याच्या वरच्या फळीतील फलंदाज योगदान देण्यात यशस्वी होत नव्हते, तर दुसऱ्या बाजूला गोव्याच्या गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत होते. गोलंदाजांनी समोरच्या संघाला बऱ्याच वेळा दोन्ही डावांमध्ये गुंडाळले, मात्र मोठी धावसंख्या उभारण्यापासून त्यांना रोखता आले नाही. गोलंदाजांना सर्वाधिक त्रास हा तळातील फलंदाजांनी दिला आहे. त्यांना झटपट गुंडाळण्यात आपल्या गोलंदाजांना अपयश आले. गोव्याच्या पराभवाला प्रतिस्पर्धी संघातील तळातील फलंदाजांचे योगदान जबाबदार आहे.
मधल्या फळीने सावरले
गोव्यासाठी समाधानाची बाब म्हणजे या सत्रात मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी करत आपल्या संघाला प्रत्येक सामन्यात नामुश्कीतून वाचवले आहे. कधी अमित वर्मा, कधी स्नेहल कवठणकर तर कधी सुयश प्रभुदेसाईने महत्त्वपूर्ण खेळी करत गोव्याला संकटातून बाहेर काढले आहे. मात्र, त्यांना वरच्या फळीतील फलंदाजांकडून याेग्य साथ न लाभल्यामुळे नऊपैकी तब्बल सात सामन्यांमध्ये गोव्याला पराभव पत्करावा लागला.
संधी गमावली
पहिल्या सामन्यात डावाने पराभव स्वीकारावा लागला तरी घरच्या मैदानावर गोव्याला जम्मू आणि काश्मीरविरुद्ध मोठ्या विजयाची संधी होती. दुसऱ्या सामन्यात स्नेहल कवठणकरचे शतक व सलामीवीर सुमीरन आमोणकर, सगुण कामत, अमित वर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर गोव्याने पहिल्या ९ बाद ४६८ धावा केल्या. प्रतिस्पर्धी संघाला २७१ धावांत गुंडाळून त्यांना फॉलोऑनही दिले. मात्र पहिल्या डावातील अतिशय संथ फलंदाजीमुळे चौथ्या दिवशी जम्मू आणि काश्मीरला सामना अनिर्णीत ठेवण्यात यश आले.
जकाती - स्वप्नील हवेत
गोव्याचे सर्वांत अनुभवी खेळाडू गोलंदाज शदाब जकाती व स्वप्नील अस्नोडकर सध्या गोव्याच्या संघात नाहीत, मात्र या दोघांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्याची गोव्याच्या संघाला गरज आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) दोघाही खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी त्यांच्यावरही जबाबदारी टाकण्याची गरज आहे.
दौरे आवश्यक
गोव्याचा संघ रणजी व विजय हजारे चषक या मोठ्या स्पर्धा वगळता, मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसून येत नाही. रणजी चषकाच्या १० ते १५ दिवस आधी गोव्याच्या संघाचे शिबिर आयोजित करण्यात येते व याचा परिणाम संघावर होऊन गोव्याचे प्रदर्शन अतिशय खराब होते. यासाठी जीसीएने भविष्यात गोव्याबाहेर दौरे आयोजित करणे गरजेचे आहे.
स्थानिक क्रिकेट : नियंत्रण हवे
महत्त्वाच्या स्पर्धा नसताना गोव्याचे खेळाडू स्थानिक क्रिकेटमध्ये सहभागी होतात. त्यामुळे त्यांना उत्पन्नाचे साधन मिळते. मात्र, याची किंमत खेळाडूंना स्वत:चा दर्जा कमी करून मोजावी लागते. रणजी करंडकात खेळणाऱ्या फलंदाज किंवा गोलंदाजांना या स्थानिक क्रिकेटमध्ये क्वचितच चांगल्या दर्जाच्या फलंदाजांचा किंवा गोलंदाजांचा सामना करावा लागतो. या गोष्टीचे नुकसान त्यांना राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मोजावे लागते. यापेक्षा जीसीएने गोव्याच्या खेळाडूंसाठी इतर राज्यातील संघांसोबत दौरे आयोजित करावेत किंवा जीसीएने गोव्यात होणाऱ्या एकंदरीत स्थानिक क्रिकेटचा दर्जा पाहूनच या क्रिकेटपटूंना या स्पर्धेत खेळण्याची परवानगी द्यायला हवी.
(लेखक ‘गोवन वार्ता’ चे उपसंपादक आहेत.)