गार्बेज, गार्बेज​

परिसर

Story: अंजली आमोणकर |
19th January 2019, 10:54 am
गार्बेज, गार्बेज​


ड्रायव्हरला घेऊन आम्ही बरेचजण कोल्हापूरला निघालो होतो. वाटेत ऊस भरलेले ट्रक उभे, आडवे जवळून जाऊ लागले. उसाची पानं, बंद खिडक्यांना आपटत होती. गाडीवर घासून जात होती. ड्रायव्हर मात्र मजेत गाणी गुणगुणत होता. ‘अरेरे, गाडीवर चरे पडणार आता तुझ्या...’ आम्ही हळहळलो. गाडी स्वत: ड्रायव्हरचीच होती. त्यामुळे सगळ्यात जास्त हळहळ तर त्याला स्वत:ला वाटायला हवी होती. तेवढ्यात आडव्या गेलेल्या रस्त्यावरून एक ऊस भरला ट्रक अचानक समोर आला. ड्रायव्हरने करकचून ब्रेक आवळले. सर्वांची डोकी दणादण आपटून छान शेकून निघाली. गाडी पण थोडी घसरली व ट्रकला टेकून उभी राहिली. थोडक्याने अपघात टळला होता. झालं. आता दोन्ही ड्रायव्हरांचं चिक्कार वाजणार व तासभर इथेच मोडणार, असं वाटत असतानाच, ट्रक ड्रायव्हर मोठमोठ्याने शिट्ट्या देत सुटला व आमच्या ड्रायव्हरने सुहास्य वदनाने हात हलवत गाडी बाजूला घेतली आणि त्याला जाऊ दिले.
आश्चर्याने आम्ही विचारले की, ‘अरे, चूक तर त्याचीच होती ना. तुझ्या गाडीची केवढी वाट लागणार होती!’ त्यावर तो म्हणाला, ‘गार्बेज- डस्टबिनला मी एवढीच किंमत देतो.’
‘पण, तो तर उसाचा ट्रक होता...’
‘मी ट्रकबद्दल बोलत नाहीये. ड्रायव्हरबद्दल बोलत आहे. मान्य आहे, धडक बसली असती तर आपण सर्व त्या क्षणी हॉस्पिटलमध्ये असतो. पण काय आहे ना साहेब, या लोकांचं गार्बेज आपण कधीही स्वीकारायचं नसतं’.
‘गार्बेज?’
‘हो साहेब, रात्रंदिवस ड्युटी करून जेरीला आलेली ही मंडळी. गार्बेजची पिंप बनलेली असतात. फ्रस्ट्रेशन राग, फॅमिलीपासून दूर असल्याचे औदासीन्य, गरिबी व आजारपणांनी बेजार झालेला जीव, इतरांचे सौख्य पाहिल्यावर येणारी चरफड.... अशा सगळ्या गार्बेजची ही लोकं, पिंप बनलेली असतात. ती ओव्हरलोड झाली की मग ज्याच्या त्याच्या अंगावर गार्बेज काढून फेकायला सुरुवात करतात. कधी शिवीगाळ करून, कधी भांडून, कधी केवळ वादविवाद करून. आपण नसतो तो गार्बेज स्वीकारायचा. म्हणून मी हसून आधीच हात हलवून अशा लोकांना आधी जाऊ देतो. सर्वांशी भांडण तंटत बसलं तर, बघता बघता आपलंही डस्टबीन व्हायला वेळ नाही लागत. साहेब, एवढंसं आयुष्य मिळालेलं असतं देवाकडून. ते सुद्धा मान-अपमान, गैरसमज, वाद, भांडण असल्या गार्बेजनं भरून टाकायचं का? अन् गार्बेज, मग ते ओलं असो की सुकं, दोन दिवसाने दुर्गंधी मारायला लागतेच’.
आम्ही सर्व अवाक होऊन त्या टॅक्सी ड्रायव्हरचं अजब, पण सच्चं तत्त्वज्ञान ऐकत होतो.
‘हे तत्वज्ञानाच्या नावाखाली शेपूट घालणं झालं नाही का?’ गाडीतून कोणीतरी बोललं.
ड्रायव्हर परत हसला. आपापली विचारसरणी आहे साहेब. वांझ भांडणं, मारामाऱ्या, ज्यातून कोणतीही फायदेशीर फलनिष्पत्ती होणार नाहीये, चांगली की सोडून देऊन शांत डोक्याने आपली पुढील कालक्रमण केलेलं बरं?’ बोलणारा गप्प झाला.
ड्रायव्हरच्या तोंडी, इतकी विद्वत्तापूर्ण, जड जड शब्दांनी भरलेली भाषा विचार ऐकून खरे तर सर्वजण आधीच चाट पडलेले होते. ‘साहेब, डबल ग्रॅज्युएट आहे मी. पीएचडी करतोय. कॉलेजात लेक्चरर होतो. तिथले सर्वजण राजकारण्यांच्या गार्बेजची पिंपे बनलेले पाहून जीव विटला. दिली सोडून नोकरी. आता डबल कमावतोय’.
ड्रायव्हरनं गाडीत बसत सगळ्यांना बसायची खूण केली. अवघ्यांचे श्वास थांबायच्या मार्गावर असतानाच भानावर येत सगळ्यांनी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
(लेखिका साहित्यिक आहेत.)