तुयेतील कारखान्यात भीषण स्फोट

तीन कामगर गंभीर जखमी; कारखाना, वाहनांची नासधूस


13th January 2019, 02:24 am

 

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : तुये येथील नवीन विस्तारित औद्योगिक वसाहतीतील राजेंद्र काशिनाथ जोशी यांच्या मालकीच्या सिमेंट ब्लॉक तयार करण्याच्या कारखान्यात शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजता गॅस बॉयलरचा भीषण स्फोट झाला. यात अखिल भानुदास नाईक (२५), अजित व रमजान अली हे तिघे कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तुये औद्योगिक वसाहतीतील नवीन विस्तारित औद्योगिक वसाहतीत पहिल्या टप्प्यात एकूण ४५ कंपन्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात ८ कंपन्या आहेत. त्यातील दोन कंपन्या कार्यरत आहेत. यातील एका मेसर्स राजेंद्र जोशी यांच्या कारखान्याचे ९ कामगार सिमेंट ब्लॉक तयार करीत होते. या कंपनीत दुपारी सव्वाबारा वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, १० किलोमीटर परिसरातील गाव अक्षरश: हादरले. बॉयलरचा स्फोट झाल्यावर कारखान्याच्या गेटसमोर पार्क करून ठेवलेल्या मालवाहू ट्रकाच्या (जी ए ०६-२८१९) समोरील केबिनचा पूर्ण चक्काचूर झाला. तसेच जवळ असलेल्या दुसऱ्या कंपनीच्या दगडी संरक्षक भिंतीचे नुकसान झाले. परिसरातील वाहनांची नासधूस करीत बॉयलरचा मोठा पाईप सुमारे ८०० मीटरवर जाऊन जंगलात पडला.
स्फोट झाल्यानंतर काही वेळेतच तुयेचे सरपंच नीलेश कांदोळकर, पंच आनंद साळगावकर, तसेच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सरपंच कांदोळकर यांनी यासंदर्भात अग्निशमन दल, पोलिस आणि १०८ वाहनाला माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना १०८ वाहनातून तुयेतील रुग्णालयात हलविले. हे तिघे गंभीर जखमी असल्याने त्यांना बांबोळी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. यामध्ये दोघे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर धाटकर व पराख यांनी पंचनामा केला.

सरकारी अधिकाऱ्यांची पाठ
तुये येथील कारखान्यातील स्फोटाची घटना भीषण असताना तेथे कोणीच फिरकले नाहीत. तुयेचे सरपंच, पंच, तसेच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली. सेकंड सॅटर्डेची सुट्टी असल्यामुळे घटनास्थळी कोणीही सरकारी अधिकारी फिरकले नाहीत. मोठी घटना असूनही सरकारी अधिकारी न फिरकल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.

औद्योगिक वसाहतीमध्ये काय चालतेय, याविषयी पंचायत अनभिज्ञ आहे. औद्योगिक झोन असल्याने पंचायतीकडे कंपन्यांची कोणतीही माहिती नाही. एखादी भीषण घटना घडली की, पंचायतीला धावून जावे लागते. नागरिक पंचायतीलाच दोषी धरतात.
- नीलेश कांदोळकर
सरपंच, तुये