कवळे गुरुकुलाचे शिबिर उत्साहात


13th January 2019, 06:10 pm


पणजी : श्री शांतादुर्गा शिक्षण समिती, कवळे गुरुकुलाचे मातृभूमी परिचय शिबिर श्रीपाद खेडेकर यांच्या पुरातन वास्तूत उत्साहात पार पडले.
शिबिराचे उद्घाटन कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य मोहन वेरेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पंच मोहन खेडेकर व श्री शांतादुर्गा शिक्षण समितीचे कोषाध्यक्ष श्रीपाद खेडेकर उपस्थित होते. सावईवेरे परिसरातील समाजसेवक, कलाकार, उद्योजक व स्वातंत्र्य सैनिक यांनी शिबिरात भेट दिली. मोहन वेरेकर यांनी आपल्या जीवनात चांगले संस्कार घडवणारे प्रसंग मुलांना सांगितले. डॉ. दत्ताराम देसाई यांनी मार्गदर्शन केले. चित्रकार हेमंत कासार यांनी चित्रकलेतील रेषा व रंगांचे महत्त्व सांगून मुलांकडून चित्रे काढून घेतली. चित्रकार अपर्णा खेडेकर यांनी मुलांना वारली चित्रकला शिकविली. गुरुकुलातील विष्णू नाईक व वैष्णवी नाईक यांनी मुलांना प्रार्थना व कोकणी व मराठी गीते शिकविली. कवींद्र फळदेसाई यांनी मुलांना पथनाट्य या नाट्यप्रकाराविषयी माहिती देऊन त्यातील बारकावे सांगितले.
रामदास चाफाडकर यांनी गोवा स्वातंत्र्यलढ्यातील आठवणी सांगितल्या. क्षेत्र भेटीदरम्यान मुलांनी वळवई बंदराला भेट दिली. त्याठिकाणी श्रीरंग जांभळे यांनी रेती व्यवसाय व त्याचा निसर्ग, मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम याबद्दल मुलांना माहिती दिली. त्यानंतर मुलांनी सावई स्पाईस प्लान्टेशनला भेट दिली. तेथे सचिन शेट्ये यांनी विविध प्रकारच्या वनस्पती व त्यांचे उपयोग याची माहिती मुलांना दिली. श्री गणेशदत्त मंदिर, श्री सातेरी शांतादुर्गा मंदिर, श्री अनंत देवस्थान, श्री विजयादुर्गा देवस्थानला मुलांनी भेटी दिल्या. रात्रीच्यावेळी मुलांनी भजनी मंडळातर्फे सादर केलेल्या भजनाचा व घुमट आरतीचा आनंद लुटला.
शिबिराचा समारोप वेरे वाघुर्मे पंचायतीचे सरपंच सत्यवान शिलकर यांच्या हस्ते झाला. समारोपाला गुरुकुलाचे व्यवस्थापक शिक्षणतज्ञ डॉ. नारायण देसाई व गुरुकुल पालक शिक्षक संघाचे सदस्य उमेश पणशीकर उपस्थित होते. याप्रसंगी मुलांनी शिबिरातील अनुभव कथन केले.