विद्यालयाच्या प्राचार्यांना विद्यार्थ्याची मारहाण


13th January 2019, 06:09 pm


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पर्वरी : वेरे येथील व्ही. एम. परूळेकर उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी कला शाखेत शिकणाऱ्या जमार अहमद एस. या विद्यार्थ्याने विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत नाईक यांना मारहाण करण्याची घटना नुकतीच घडली आहे. विद्यालयाच्या व्यवस्थापनाच्या आदेशानुसार प्राचार्य नाईक यांनी जमार अहमद एस. या विद्यार्थ्याविरुद्ध पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसानी या तक्रारीची नोंद भारतीय दंड संहिता कलम ३२३, ३५३ व ५०४ अंतर्गत केली आहे.
प्राचार्य प्रशांत नाईक यांनी याबाबत सांगितले की, जमार अहमद एस. हा विद्यार्थी वर्गात गैरहजर राहत होता. बारावी परीक्षेची तयार करण्यासाठी घेतलेल्या खासवर्गाना सुद्धा तो गैरहजर राहिला. म्हणून त्यांनी जमारला सांगितले होते की, त्याचे वडील हयात नसल्यामुळे त्याच्या आईला वा काकाला घेऊन विद्यालयात ये. ९ जानेवारी रोजी सकाळी जमार एका माणसाला घेऊन त्यांच्या कार्यालयात आला. आपण त्या माणसाला ओळखत नसल्यामुळे आपण त्या माणसाशी बोलू शकत नाही, असे विद्यार्थ्याला सांगितले. आपण त्याला आईला वा काकाला घेऊन येण्यास पुन्हा सांगितले. हे ऐकून तो विद्यार्थी संतापला आणि रागाने त्याने कार्यालयातील खुर्ची जोराने त्यांच्या अंगावर भिरकावली. ती खुर्ची डाव्या हाताला आपटल्याने मनगटाला जबर दुखापत जाली. नंतर कार्यालयाच्या बाहेर या विद्यार्थ्याने त्यांना मारहाण केली. विद्यालयाच्या व्यवस्थापनाच्या आदेशानुसार या विद्यार्थ्याविरुद्ध पर्वरी पोलिस स्थानकांत आपण तक्रार केली. त्या तक्रारीची नोंद पोलिसांनी ११ जानेवारी २०१९ रोजी केली, असे प्राचार्य नाईक यांनी सांगितले.
पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक यांनी विद्यार्थ्याला नोटीस पाठवून चौकशीला उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे. चौकशीनंतर त्याच्या विरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.