टीव्हीमुळे वास्तववादी नाटक हद्दपार

नाटककार शफाअत खान; गोमंत विद्या निकेतन व्याख्यानमाला


13th January 2019, 06:05 pm

टीव्हीमुळे वास्तववादी नाटक हद्दपार
नाटककार शफाअत खान; गोमंत विद्या निकेतन व्याख्यानमाला
वार्ताहर । गोवन वार्ता
नावेली :
टीव्हीमुळे आपण अनेक आभासी प्रतिमांमध्ये गुरफटून गेलेलो आहोत. खरे काय व खोटे काय, यातील फरक समजत नाही. त्यामुळे वास्तववादी नाटक हद्दपार झाले आहे. एकेकाळी नाटकामुळे हजारो लोक एकत्र गोळा होत असत; परंतु टीव्हीने माणसाला वेगवेगळे केले आहे. त्यामुळे माणसे जोडण्यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागतील, असे उद्गार नाटककार शफाअत खान यांनी शनिवारी मडगावच्या गोमंत विद्या निकेतनच्या फोमेंतो एम्फिथिएटरमध्ये काढले.
गोमंत विद्या निकेतनच्या विचारवेध व्याख्यानमालेअंतर्गत दामोदर कृष्णा वेर्लेकर स्मृती व्याख्यानामध्ये ‘नाटक, नाट्यानुभव आणि प्रेक्षक’ या विषयावर ते बोलत होते.
प्रत्येकाकडे काही ना काही निर्माण करण्याची शक्ती आहे. आदिमानवही आपल्या बुद्धीने शोध लावत होता. त्यातूनच चाकाचा शोध लागला. ७० हजार वर्षांपूर्वी भाषेचा जन्म झाला. भाषेच्या उगमानंतर नाटकाचा जन्म झाला. नाटकातून पुढे लोकनाट्याचा जन्म झाला. चार वेद हे जगमान्य असले, तरी पाचवा वेद म्हणजे नाटक वेद. पहिले चार वेद हे काहीजणांपुरते मर्यादित असले, तरी नाटक वेद मात्र सर्वांसाठी आहे. रंजन करत प्रबोधन करणे हे नाटकाचे काम. संस्कृत नाटकामध्ये सूर व असूर या सर्व गोष्टी असत, असे शफाअत खान यांनी सांगितले.
नाटक हे प्रेक्षकांच्या अंतर्मनाला हात घालते व नवीन साक्षात्कार घडवते. जेव्हा एखादा नट नाट्य भूमिकेत शिरला की, त्याला भान रहात नाही, तो स्वत:चाही रहात नाही, असे सांगत खान यांनी चीनी झेनकथा व सुफी कथेतल्याही काही गोष्टी सांगितल्या.
सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर व उपाध्यक्ष सुहास नायक यांनी शफाअत खान यांचे पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले. दरम्यान, रविवार दि. १३ रोजी केवल कुमार शर्मा यांचे ‘उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना’ या विषयावर व्याख्यान होईल.
बाक्स
व्यक्त होणे ही आंतरिक गरज
बाहेरचे जग हे अमर्याद आहे, त्याहीपेक्षा अमर्याद आपले अंतर्मन असते. मनुष्य हा परिपूर्ण नाही, म्हणूनच तो पुन्हा पुन्हा परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ला व्यक्त करावेसे वाटते, ही मनुष्याची आंतरिक गरज आहे. त्याशिवाय माणसाला नीटपणे जगताच येणार नाही. त्यातूनच कहाणी किंवा गोष्टीचा जन्म झाला. प्रत्येकाकडे सांगण्यासारखे काही ना काही तरी असते. आपण जर ते व्यक्त केले नाही, तर मनावर दडपण येऊन आपण व्याधीग्रस्त होतो. त्यामुळे व्यक्त होणे किंवा गोष्ट सांगणे ही माणसाची आंतरिक गरज आहे, असे शफाअत खान म्हणाले.
कोट
नाटक हे सत्याचा साक्षात्कार घडवत असते. नाटक पाहताना तुमच्या अंतर्मनात प्रकाश पडतो आणि आपण नकळत स्वत:चे परीक्षण करू लागतो. चांगले नाटक हे जगण्याचे भान देताना वेगळी अनुभूती देत जाते. माणसाचे जगणे बदलले की नाटक बदलते. त्या त्या काळाचे भान ठेऊन नाटकामध्ये बदल होत असतो. नाटकाने रंजन होते, ते तुम्हाला गुंतवून ठेवते. नाटकामध्ये गोष्ट असते; पण गोष्ट म्हणजे नाटक नाही. गोष्ट ही गुंतवून ठेवण्यासाठी असते.
- शफाअत खान, नाटककार.