भारतीय लष्कराची देदीप्यमान परंपरा

कव्हर स्टोरी

Story: अनंत जोशी |
12th January 2019, 12:16 pm
भारतीय लष्कराची देदीप्यमान परंपराभारतीय सैन्य परंपरा आणि इतिहास हा कैक वर्षांपासूनचा. पहिला संदर्भ वेदात आढळतो. महाग्रंथ रामायण आणि महाभारत यातही सेनेचा उल्लेख आहे. पहिल्या विश्व युद्धादरम्यान, युरोपतर्फे लढताना भारतीय सेनेने बहुमूल्य योगदान दिले. दहा लाख भारतीय सैनिकांनी देशाबाहेरील युद्धात भाग घेतला.
पहिल्या विश्व युद्धानंतर, भारतीय सशस्त्र सेनेत महत्वाचे बदल घडले. सब- लेफ्टनंट डी. एन. मुखर्जी यांनी भारतीय रॉयल इंडियन मरीनमध्ये कमिशन घेतले. १९३२ साली,  भारतीय वायु सेना ही  ऑक्झिलरी एयर फोर्स या नावाने प्रसिद्ध होती. त्यानंतर, दोन वर्षानी रॉयल इंडियन मरीनची  रॉयल इंडियन नौसेना झाली. दुसर्या महायुद्धादरम्यान, भारतीय सेनेने फक्त २ लाख सैनिकांसह लढायला सुरुवात केली होती,  पण ऑगस्ट १९४५ मध्ये ही संख्या वीस लाखांवर पोचली. इतिहासातील अशी ही पहिलीच घटना होती, जेथे स्वेच्छेने हे सर्वजण युद्धात सामील झाले होते.
भारतीय लष्कर ही ब्रिटिश साम्राज्यातील सर्वात मोठी फौज होती. त्यांचा पराक्रम पाहून ४००० जणांना गौरविण्यात आले. त्यापैकी ३८ सैनिकांना व्हिक्टोरिया किंवा जॉर्ज क्रॉस मिळाला. भारतीय सैनिकांचा कल भारतीयत्वाकडे वाढू लागला होता. १९४० साली  सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय होते, ज्यांनी स्क्वाड्रनचे नेतृत्व सांभाळले. जुलै १९४१ साली, भारतीय वैद्यकीय सेवा अधिकारी होते, हिराजी कुरसेटजी. ते जनरल होणारे पहिले भारतीय. युद्धादरम्यान बरेच भारतीय नावारूपास आले.  त्यापैकी के. एम. करिअप्पा, एस. एम. श्रीनागेश आणि के. एस. थीमय्या हे सर्व पहिले भारतीय बटालियन आणि ब्रिगेड कमांडर बनले.
 १९४५ साली युद्ध संपल्यानंतर, भारतीय लष्कराच्या अधिकारी गटात वैद्यकीय सेवेला सामावून घेण्यात आले. त्यात करसेटजी हे एकमेव मेजर जनरल, दोन ब्रिगेडियर आणि २२० अक्टिंग कर्नल किंवा लेफ्टनंट कर्नल असे इतर अधिकारी होते. ऑक्टोबर १९४५ सालानंतर, फक्त भारतीयांना कमिशन द्यावे असे ठरले, पण मुख्य प्रवाहात ब्रिटिश अधिकारीच होते. १९४६ साली, शाही भारतीय नौदलाच्या खलाश्यांनी युद्धनौका आणि आस्थापनावर बंड पुकारले. याचा परिणाम संपूर्ण भारतात झाला. स्वदेशीकरणाकडे कल चालूच उरला. जून १९४७ पर्यंन्त, सैन्यात ब्रिगेडियर हुद्दयाचे एकूण १४ च अधिकारी होते.
१९४७ ते १९५० हा काळ, लष्करासाठी नाट्यमय व क्लेशकारक होता. लष्कराचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे झाले. युद्धनौका, विभाग आणि विमानांची वाटणी करण्यात आली.
२६ जानेवारी १९५० भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित झाले. ब्रिटिश राज्यातील हुद्याचा बिल्ला, राजेशाही मुकुट,  ध्वज आणि “शाही” हा शब्द वगळून त्या जागी तिरंगा आणि अशोक स्तंभाचे चार सिंह प्रतीक म्हणून निवडण्यात आले. १ एप्रिल १९५५ साली एयर मार्शल सुब्रोतो मुखर्जी हवाई दलाचे पहिले कमांडर बनले. २२ एप्रिल १९५८ साली व्हाईस अॅडमिरल आर. डी. कटारी यांनी नौदलाची सूत्रे सांभाळली.
भारतात दरवर्षी १५ जानेवारीला लष्कर दिवस साजरा केला जातो. याच दिवशी लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांनी सेनाध्यक्षांची सूत्रे शेवटचे ब्रिटिश कमांडर जनरल सर फ्रांसिस बुचर यांच्याकडून घेतली. तसेच ज्या भारतीय अधिकार्यांना ब्रिटिश राजवटीचे कमिशन मिळाले होते, त्यांना पुनश्च भारतीय सेनेत घेण्यात आले. त्यांचा हुद्दाही कायम ठेवण्यात आला.
आतापर्यंत ज्या लढाया झाल्या, त्या पाहता आपल्या लष्कराकडे बराच अनुभव आहे यात शंका नाही. १९४७ साली भारत- पाकिस्तान दरम्यानच्या पहिल्या युद्धाचे कारण होते, काश्मीर. तेथील महाराज हरीसिंह यांना स्वतंत्र देश हवा होता तर मुस्लिम जास्त असल्याने पाकिस्तानला काश्मीर बळकावयचे होते. २२ आगस्ट १९४७ रोजी पाकने काश्मीरवर आक्रमण केले. तेव्हा महाराज हरीसिंह यांनी भारताला हाक मारली. मुख्यत्वे बर्माच्या लॉर्ड माऊंटबॅटनलाही त्यांनी सुचविले. २६ ऑक्टोबरला १९४७ रोजी लष्कर हवाईमार्गे पाचारण करण्यात आले. युद्धात पाकिस्तानला बरेच नुकसान सोसावे लागले. जिथे फौजा थांबल्या तेथे, संयुक्त राष्ट्र संघाच्या हस्तक्षेपाने नियंत्रण रेषेचा जन्म झाला. हैदराबादवर निजामांची सत्ता कायम होती. त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. १२ सप्टेंबर १९४८ रोजी गृहमंत्री सरदार पटेल यांनी लष्कराला हैदराबाद काबिज करण्यासाठी पाठवले. १८ सप्टेंबर १९४८ रोजी निझामांनी शरणागती पत्करली. त्यानंतर हैदराबादचे  भारतात विलिनीकरण झाले.
ब्रिटिश आणि फ्रेंच यांनी आपल्या वसाहती भारतातून हटविल्या होत्या, पण पोर्तुगीज आपली वसाहत गोवा,  दमण आणि दीव येथून हटविण्यास तयार नव्हते. वाटाघाटी निष्फळ ठरल्या. 18 डिसेंबर १९६१ रोजी, फक्त २६ तासाच्या लढाईनंतर हे तिन्ही प्रदेश ताब्यात घेण्यात आले. यात पोर्तुगीजचे ३१ सैनिक मारले गेले, ३००० सैनिक युद्धकैदी झाले. त्यांचे अल्बुकर्क हे जहाज बुडवले होते.
१९६२ साली चीनशी युद्ध झाले त्याचे कारण अक्साई चीन आणि चीनने अनधिकृतपणे बांधलेले रस्ते. रोज येथे चकमकी होतच असतात. मॅकमोहन रेषा ही दोन्ही देशातील सीमारेषा. तिबेटला देण्यात येणारी भारतीय मदत ही चीनच्या डोळ्यात खुपणारी होती.
१९६२ साली, भारतीय सेनेला, बुटल आणि अरुणाचल प्रदेश जवळ पाच किमी अंतरावर असलेल्या थांग ला भाग कूच करण्याचे आदेश मिळाले. चीनने भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. वाटाघाटी निष्फळ झाल्या. चीनने आक्रमण केले. चीनने अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशचा काही भाग काबिज केला. राजकीय नेते आणि सेनेचे काही चुकीचे निर्णय या पराभवाला कारणीभूत ठरले. कारणे शोधण्यासाठी जी हेण्डर्सन बृक आणि भगत समिती स्थापन करण्यात आली तिचा अहवाल अजूनही गुपित आहे.
भारत- पाक दुसरे युद्ध १९६५ साली झाले. यावेळेस भारत वरचढ होता. ऑगस्ट १९६५ ला, पाकिस्तानी अध्यक्ष आयुब खान याने ऑपरेशन जिब्राल्टर सुरू केले. त्यांचे सैनिक काश्मीरमध्ये घुसले व नागरिकांना भारताविरुद्ध भडकविण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण, भारताने पाकिस्तानची स्वप्ने धुळीस मिळविली. युद्धबंदी झाली त्यावेळेस ३००० भारतीय सैनिक शहीद झाले तर पाकचे ३८०० सैनिक मारले गेले. २०० हून पाक रणगाडे उध्वस्त झाले. भारताचे १५० रणगाडे निकामी झाले. 
१ ऑक्टोबर १९६७ रोजी, सिक्किम येथे चकमक झाली. १० ऑक्टोबरला पुन्हा युद्ध जुंपले. यात ८८ भारतीय आणि ३०० चीन सैनिक मृत्यूमुखी पडले. भारताने येथे चीनचा पराभव केला. १९७१ साली लष्कर आणि गृह मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षलवाद्यांना मारण्यासाठी मोहीम चालविण्यात आली. ज्यात शेकडो नक्षलवादी मारले गेले.
पूर्व पाकिस्तानात स्वातंत्र्य चळवळ सुरू होती, पाकने त्यांच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. हजारो बंगालींनी भारतात शरणागती पत्करली. भारताने बंगाली बंडखोर गटाला पाठिंबा दर्शविला. २० नोव्हेंबर १९७१ रोजी,  भारताने गरीबपुर ठिकाण काबिज केले. दुसर्या दिवशी पाकिस्तानने श्रीनगर, अमृतसर, जोधपूर, जैसलमेर येथे हल्ले चढविले. पण ते हाणून पाडण्यात आले. भारतानेही हल्ले केले. इकडे 4 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने हल्ला चढविला. 4 ते 16 डिसेंबर दरम्यान पाकिस्तानला प्रचंड नुकसान सोसावे लागले. ९०,००० पाकिस्तानी सैनिक युद्धकैदी तर ११,००० मृत्यूमुखी पडले. बांगलादेशचा उदय झाला.
सियाचीन ग्लेसीयर काश्मिरचा भाग असला तरी १९४७ साली याचा जास्त विचार झाला नाही. १९८० पर्यंत दोन्ही देशांनी तेथे सैन्य ठेवले नव्हते. पाकिस्तानने तेथे गिर्यारोहकांना परवाने देण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारत सावध झाला. १९८४ एप्रिलमध्ये कुमाऊं रेजिमेंट तैनात केले गेले. पाकिस्तानने लगेचच युद्ध केले. यात भारताने सिया ला आणि बिलफोंड ला पाककडून ताब्यात घेतले. पाकने ही जागा बळकावण्याचा निष्फळ प्रयत्न केला. १९९०, १९९५, १९९६ आणि १९९९ (कारगील) मध्ये. अजूनही भारत नैसर्गिक अडचणीला तोंड देत त्याचे रक्षण करीत आहे.
देशातील बंडखोरी आणि आतंकवाद इतिहासात भारतीय लष्कराने अतिशय मोलाची कामगिरी केली आहे. शीख बंडखोरी रोखण्यासाठी आपेरशन ब्ल्यू स्टार आणि वूड रोज राबविले. काश्मीरमध्ये शांतता राखण्यास दिवसरात्र झटत आहे. शांती सेना या नावाने श्रीलंकेत दल पाठविले. ऑपरेशन गोल्डन बर्ड ही मोहीम उत्तर पूर्व राज्यांमध्ये चालू आहे.
१९९८ मध्ये भारताने यशस्वी अणू चाचणी केली आणि चार दिवसांनंतर पाकिस्तानने अणू चाचण्या घेत,  दोन्ही देश अणूसंपन्न आहेत हे दाखवून दिले. पण, भारताने एक हायड्रोजन स्फोट घडवून आणला, जो पाकला करता आला नाही. १९९९ च्या लाहोर शिखर बैठकीनंतर तणाव कमी झाला. पण, तो जास्त काळ टिकू शकला नाही. पाकिस्तानने कारगिलमध्ये टायगर हिलसह काही ठिकाणे काबिज केली. तेव्हा आपले दोन लाख जवान तैनात करत लष्कराने ऑपरेशन विजयची नांदी केली. बर्याच अडथळ्यांना तोंड द्यावे लागले, पाक सैन्य उंचीवर असल्याने त्यांना फायदा झाला. आपले बरेच जवान शहीद झाले. पण, दोन महिन्यांत आम्ही टायगर हिलवर कब्जा मिळविला.
संयुक्त राष्ट्रांच्या अनेक मोहिमांत लष्कर भाग घेते. ४३ मोहिमांमध्ये भाग घेतला असून, त्यात १,६०,००० जवान होते. सध्या अफगाणिस्तानमध्ये आपले जवान आहेत. लष्कर आधुनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञान यांची सवय व्हावी म्हणून अनेक युद्धाभ्यास हाती घेते. ऑपरेशन ब्रासटॅक्स १९८६ साली सेनेने सुरू केले. ज्यात पूर्ण लढाई कशी लढावी याचा अभ्यास केला. अणुबॉम्ब कसा वापरावा, याचाही सराव केला. नेटवर्क कसे हाताळावे यासाठी अश्वमेध प्रात्यक्षिक थार वाळवंटात घेण्यात आले. ज्यात ३ लाख सैनिक होते. भारत व अमेरिकेत “युद्ध अभ्यास” केला गेला. ऑपरेशन शक्ती हा फ्रान्ससोबत युद्धाभ्यास होता. इतरही अनेक मोहिमा आहेत.
लष्कराचे मुख्य उद्दीष्ट होते ते म्हणजे देशाचे रक्षण करणे. पण कालांतराने, सेनेला अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली. खास करून उत्तर पूर्व राज्ये आणि काश्मीर.
आज भारतीय लष्कराचे नाव जगभर आहे. पण अजूनही आपण जुन्या शस्त्रांच्या आधारे पुढील युद्धे लढणार का? हवी ती शस्त्रे लाल फितीत अडकली आहेत. ब्रिटिशकालीन अधिकारी आणि जवान यांच्यातील दरी अजूनही दृष्टीस पडते. ती दूर होणे महत्वाचे. शिस्तीच्या नावाखाली जवानांना भरडले जाते, ते थांबले पाहिजे. तेव्हा भारतीय लष्कर जगात सर्वश्रेष्ठ होण्यास वेळ लागणार नाही. जय हिंद!