एमसी मेरीकोम अव्वल नंबर!

एआयबीए क्रमवारीत पहिल्या स्थानावर

10th January 2019, 04:15 Hrs

नवी दिल्ली :भारताची स्टार बॉक्सर एमसी मेरीकोमने गतवर्षी वर्ल्ड चॅम्पियन किताब मिळवत आंतरराष्ट्रीय मष्टियोद्धा संघाच्या (एआयबीए) विश्व क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. आपल्या वजनी गटात मेरीकोमने १७०० गुण मिळवत पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे.
मणिपूरच्या या मुष्टियोद्धाने मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत झालेल्या महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचत ४८ किलो वजनी गटात सहावा किताब पटकावला होता. यामुळे ती या स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी मुष्टियोद्धा बनली होती.
मेरीकोमला २०२० टोकिओ ऑलिम्पिकचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ५१ किलो वजनी गटात खेळावे लागणार आहे, कारण ४८ किलो वजनी गट या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आलेला नाही. तीन मुलांची आई असलेल्या मेरीकोमने २०१८ साली शानदार प्रदर्शन केले होते व तिने विश्व चॅम्पियनशिपव्यतिरिक्त राष्ट्रकुल स्पर्धा व पोलंडमध्ये एका स्पर्धेत पहिले स्थान मिळवले होते. याशिवाय तिने बुल्गारियामध्ये प्रतिष्ठेच्या स्ट्ँड्जा स्मृती स्पर्धेतही रौप्य पदक मिळवले होते. इतर भारतीयांमध्ये पिंकी जांगडा ५१किलो वजनी गटात ८व्या स्थानावर आहे.
विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदकाची कमाई करणारी सिमरनजीत कौर (६४ किलो वजनी गट) नुकतीच राष्ट्रीय चॅम्पियन बनली असून ती आपल्या गटात चौथ्या स्थानावर आहे तर माजी विश्व चॅम्पियन एल. सरिता देवी १६व्या स्थानावर आहे. इंडिया ओपनमधील सुवर्ण पदक विजेता व विश्व चॅम्पियनशिपमधील कांस्य पदक विजेता लवलीन बोरगोहेन ६९ किलो वजनी गटात पाचव्या स्थानावर आहे.