पर्यावरणीय पर्यटनाच्या व्यवसायात

पर्यटकांना जंगलाकडे वन्यजीव निरीक्षण आणि भटकंतीसाठी वळवणे हे मोठे आव्हान त्याने आणि त्याच्या साथीदारांनी स्वीकारले असल्याने पर्यटकांची पावले त्यांच्या आस्थापनात पक्षीनिरीक्षण, फुलपाखरांचे संशोधन, गिर्यारोहणासारख्या उपक्रमांत सहभागी होण्यासाठी वळू लागलेली आहे.

Story: लढवय्या | राजेंद्र केरकर | 11th January 2019, 06:00 Hrs

त्याने आणि त्याच्या साधीदारांनी आज पर्यावरणीय पर्यटनाच्या व्यवसायात आपला जम बसवण्यात यश संपादलेले आहे. जंगल समृद्ध परिसरातल्यांनी एकत्रितपणे सुरु केलेला पर्यावरणीय पर्यटनाचा प्रकल्प आज त्याच्याबरोबर त्याच्या सहकाऱ्यांना उपजिविकेचे साधन देऊ शकलेला आहे. पर्यावरणीय नियम व अटींचे पालन करून पक्षीनिरीक्षण, फुलपाखरांचा अभ्यास, गिर्यारोहण, पदभ्रमण, निसर्गभ्रमंती आदी उपक्रमांचा माध्यमांचा नियोजनाबद्धरीत्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कल्पक व्यावसायिक यशस्वी ठरू शकतो ही धारणा त्यांनी सफल केलेली आहे. गोव्यासारख्या राज्यात आजच्या घडीस पर्यावरणीय पर्यटनास प्रचंड वाव ​आहे. सरकार आणि समाजातल्या विविध घटकांनी प्रामाणिकपणे या संदर्भात वेगवेगळे प्रयोग केले तर या व्यवसायातून त्यांना चांगली कमाई होऊ शकते. परंतु क्षमता आणि दृष्टी असलेली युवक मंडळी या व्यवसायात असलेल्या असंख्य आव्हानांना सामोरे जाण्याऐवजी सरकारी अथवा खाजगी आस्थापनांत नको ते झंझट म्हणून नोकरी स्वीकारून काम करण्यातच धन्यता मानतात. परंतु त्याने सरकारी नोकरीच्या मृगजळामागे धावण्याऐवजी पर्यावरणीय पर्यटनाच्या प्रकल्पात आपले नशीब अजमावण्याचे ठरवले आणि यशाच्या दिशेने वाटचाल आरंभलेली आहे.
सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेल्या निसर्गसंपन्न गावात सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय उपक्रमांना चालना देण्यासाठी मी पाव शतकापूर्वी जेव्हा आरंभ केला तेव्हा तिथे परिस्थिती बरीच प्रतिकूल होती. दारुदुकानांची संख्या तेथील लोकसंख्येच्या तुलनेत मोठी असल्याने दारुड्यांसाठी त्या गावाची ख्याती वाढत चालली होती. सह्याद्रीच्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या पर्वतरांगा, मान्सूनात सहस्त्रधारांनी खोल दरीत कोसळणारे धबधबे, हरण, अस्वल, बिबट्यासारख्या जंगली श्वापदांचा संचार, निसर्गाच्या गर्भश्रीमंतीची दर्शन घडवणारी पठारे... हे सारे असणाऱ्या या गावाला खरंतर पर्यावरणीय पर्यटनाच्या दृष्टीने बराच वाव होता. परंतु अशा प्रकल्पांना दारुड्यांच्या गर्तेत त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीवेळी वाव मिळणे दुरापास्त होते. पदभ्रमण, गिर्यारोहण, निसर्गभटकंती, निसर्ग संस्कार शिबिरे, कार्यशाळा यासारखे उपक्रम हाती घेऊन गावातल्या तरुणांना सहभागी करून घेण्याचे प्रयोग मी सुरु केले, त्याला तिथल्या मंडळाने योग्य प्रतिसाद दिला. तो मला जेव्हा भेटला तेव्हा त्याच्या डोळ्यांतली चमक मी ओळखली. सुदर कविता लिहिण्याची त्याच्याजवळ शैली होती आणि काव्यलेखन स्पर्धेत त्याला बक्षीसही लाभले होते. त्यामुळे पर्यावरणीय उपक्रमांबरोबर साहित्यिक कार्यक्रमांत त्याला मी सहभागी करण्याकडे लक्ष दिले. परंतु पदभ्रमण, गिर्यारोहण आदी उपक्रमांवेळी त्याचा वार्तालाप वन्यजीव अभ्यासकांशी होऊ लागला आणि त्याला पक्षी निरीक्षण वन्यजीव अभ्यास, निसर्ग भ्रमंती करण्यात आनंद लाभू लागला. परंतु खेडेगावातला आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या कुटुंबातला युवक असल्याने शालान्त परीक्षा उत्तीर्ण होणे त्याला जमले नाही. दहावी नापास झाल्याने आणि पुन्हा शिक्षण घेण्याची संधी गावात सहजासहजी उपलब्ध नसल्याने कुठे नोकरी मिळेल या आशेने तो माझ्याकडे आला. त्याचवेळी पर्यावरणीय पर्यटनाच्या प्रकल्पात पर्यटकांना निसर्ग भ्रमंतीवेळी मार्गदर्शन आणि अभिरुची निर्माण करण्याच्या कामासाठी मी त्याची शिफारस केली. अल्पावधीतच त्याने त्या नोकरीत जम बसवला. त्याला जेव्हा साप्ताहिक सुट्टी असायची, त्यावेळी मी त्याला माझ्यासोबत स्लाईड शोसाठी घेऊन जायचो.
एकदिवस एका कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रतिष्ठित अशा हॉटेलसाठी गिर्यारोहण आणि साहसी उपक्रम राबवण्याच्या प्रकल्पात त्याला नोकरी मिळाली. पर्यटक मंडळींना तो सर्प आणि अन्य वन्यजीवविषयक जागृती करण्यासाठी कार्यक्रम करू लागला. नव्या संधीमुळे त्याच्याकडे पैसा आला आणि कुटुंबाची आर्थिक घडी सुव्यवस्थित करणे त्याला जमले. त्या पूर्वी वन खात्याच्या वन्यजीव विभागात रोजंदारीवर त्याला जेव्हा संधी मिळवून दिली होती त्यावेळी त्याला सापांची अनाकलनीय दुनिया समजून घेण्याची चांगली संधी लाभली होती. त्याचा गाव जंगलाच्या कुशीत वसलेला असल्याकारणाने खरंतर त्याला वन्यजीवांचा सहवास लाभायचा. परंतु त्याच्याकडे जिज्ञासूवृत्तीने पहाण्याची दृष्टी त्याला पर्यावरणीय पर्यटनाच्या प्रकल्पांत सहभागी झाल्यावर लाभली. उडणारा साप, विहरणारे बेडुक, सस्तन प्राण्यांत आदिम गणले जाणारे वनमाणूस... आदी वन्यजीवांची रहस्ये त्याने जाणून घेतली. त्याची छायाचित्रे टिपणे, त्यांच्या संचाराच्या नोंदी ठेवण्याची आवड त्याला लागली आणि ग्रामीण भागातला जेमतेम शालेय शिक्षण घेऊ शकलेला तरुण संशोधक होण्याच्या दिशेनं वाटचाल करू लागलेला आहे. दारिद्र्य, अज्ञान, निरक्षरता पाचवीला पुजलेल्या कुटुंबातल्या तरुणाला योग्यवेळी संधी लाभली. त्याच्या अंगी वास करणारी कौशल्ये विकसित करण्यासाठी वाव मिळाला तर कायापालट होणे शक्य आहे, याची प्रचिती त्याने दाखवून दिली.
त्याच्या अंगी असणारे कौशल्य आणि क्षमता यामुळे पर्यावरणीय पर्यटनाच्या उपक्रमांत त्याने देशी, विदेशी पर्यटकांची मने काबिज केली. त्यामुळे नव्याने सुरु झालेल्या पर्यावरणीय पर्यटनाच्या प्रकल्पाच्या संचालक मंडळासाठी त्याची माझ्याकडे विचारणा सुरु झाली. चांगल्या पगाराची आणि पंचतारांकित हॉटेल आध्यापनातली नोकरी सोडून, नवीन आव्हानात्मक संधी त्याने स्वीकारावी की नाही याचा निर्णय माझ्यावर होता. मी त्याला या प्रकल्पात सहभागी होण्यास सुनावले आणि त्याने तो विचार मान्य करून प्रकल्प पुढे नेण्यासाठी मिळेल ती जबाबदारी पत्करून काम करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांचा प्रकल्प प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून आर्थिकदृष्ट्या सफलतेकडे वाटचाल करत आहे, ही उल्लेखनीय बाब आहे.
पर्यावरणीय पर्यटनाचा व्यवसाय सह्याद्रीच्या कुशीत करणे ही सोपी गोष्ट नव्हे. गोव्याची भूमी आज सागरी पर्यटनामुळे नावारुपाला आलेली असून, रुपेरी वाळूचे सागरकिनारे, फेसाळणाऱ्या लाटा यांचे देशविदेशातल्या पर्यटकांना वाढते आकर्षण असल्याने, त्या पर्यटकांना जंगलाकडे वन्यजीव निरीक्षण आणि भटकंतीसाठी वळवणे हे मोठे आव्हान त्याने आणि त्याच्या साथीदारांनी स्वीकारले असल्याने पर्यटकांची पावले त्यांच्या आस्थापनात पक्षीनिरीक्षण, फुलपाखरांचे संशोधन, गिर्यारोहणासारख्या उपक्रमांत सहभागी होण्यासाठी वळू लागलेली आहे. गोव्यात बारामाही प्रसन्नतेचा शिडकावा करणारा जागोजागी जसा निसर्ग आणि त्याचे सौंदर्य आहे तसेच इथली वैविध्यपूर्ण अन्न संस्कृतीचाही समृद्ध असा वारसा आहे.या साऱ्याबाबींचा अभ्यास करून त्यांनी सुरु केलेला पर्यावरणीय पर्यटनाचा प्रकल्प त्यामुळे आज सफलतेच्या दिशेने वाटचाल आव्हानांना पार करून, केलेली आहे.      

Related news

मतदानाच्या विश्लेषणातील काही निष्कर्ष

गोव्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले होते. असह्य उकाड्यामुळे मतदान कमी होणार हे माझे भाकीत अचूक ठरले. त्याचप्रमाणे २३ मे रोजी तिन्ही पोटनिवडणुका व दोन लोकसभा मतदारसंघांत भाजपचा विजय होईल, हेही भाकीत अचूक ठरणार आहे. Read more

निवडणूक आयोगाच्या कमतरता

निवडणुकीच्या बराच काळ आधी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध असतात. यंत्रे तपासूनच मतदानासाठी ठेवणे अपेक्षित असते. तरी मतदानावेळी यंत्रे बिघडतात कशी या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. Read more