राष्ट्रीय क्रीडास्पर्धांची रडकथा

Story: अग्रलेख |
11th January 2019, 06:00 am
गेली दहा वर्षे गोव्यात राष्ट्रीय क्रीडास्पर्धा भरविण्याच्या गप्पा मारल्या जात आहेत. या दशकभरात सरकारे बदलली, क्रीडामंत्री बदलले, तरी राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या आयोजनाचे गोव्याचे स्वप्न काही साकार होईना. मुळात २००८ मध्ये गोव्याला राष्ट्रीय क्रीडास्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा काहीच तयारी नसल्यामुळे स्पर्धा पुढे ढकलण्याची परवानगी गोव्याने मिळविली. परंतु त्यानंतर आणखी दोन वेळा अशीच नामुष्की गोव्यावर आली. आणि आता अखेरची संधी असे म्हणावे तर चौथ्यांदा या स्पर्धा पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात गोवा आहे. ३० मार्च ते १४ एप्रिल या काळात राष्ट्रीय क्रीडास्पर्धा गोव्यात आयोजित करण्याचे क्रीडा खात्याने तसेच राज्य सरकारने कबूल केले होते. विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये तर लोकसभा निवडणुका एप्रिल-मे या काळात असतील याचा अंदाज सर्वांनाच आधीपासून होता. त्यामुळे आता परीक्षा आणि निवडणुकांची कारणे देऊन क्रीडास्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी गोव्याने करणे अनाकलनीय आहे. अर्थात स्पर्धांच्या आयोजनाची तयारीच न झाल्यामुळे परीक्षा आणि निवडणुकांचे निमित्त वापरणे आयोजकांना सोयीचे वाटले हेही तेवढेच खरे. सध्या स्पर्धा भरविण्यासाठी लगबग सुरू असली तरी स्पर्धांचा काळ दीड-दोन महिन्यांवर येऊन टेकला आहे, यजमानपद भूषविण्यासाठी गोव्याची तयारी झालेली नाही. आता अखेरचे एकदा म्हणून गोव्याला नवीन तारखा मिळाल्या तरी तयारीत मागे पडणार नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी क्रीडा खात्यावर येऊन पडते.