गोमंतकीय भूमीचे भाषासौंदर्य

इंद्रधनुष्य

Story: डाॅ. अमृता इंदूरकर |
05th January 2019, 11:16 am
गोमंतकीय भूमीचे भाषासौंदर्य


--
भाषा हे सांस्कृतिक अायुध. ज्याप्रमाणे भाषा अाणि संस्कृती या एकाच नाण्याच्या बाजू अाहेत, त्याप्रमाणे भाषा अाणि मानवी जीवन देखील. भाषेचा जीवनाशी अगदी जवळचा संबंध असतो. मानव समूहांचा अभ्यास केला तर लक्षात येते की, ते दैनंदिन व्यवहारासाठी किंवा विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी कोणती ना कोणती भाषा वापरतच असतात. जीवनाशी असलेले भाषेचे निकटत्त्व अापल्या स्वत:च्या उदाहरणावरूनही लक्षात येऊ शकते. कारण मानव अाधी भाषा आत्मसात करतो अाणि त्यानंतर त्या भाषेबद्दल विचार करण्यास सक्षम होतो.
भाषा म्हणजे काय? अापण कोणती भाषा बोलतो? अापल्याला किती भाषा अवगत अाहेत? भाषा निर्माण कशी होते? या अाणि अशा कितीतरी प्रश्नांची जाणीव होण्यापूर्वीच अापण अापली भाषा, किंबहुना एकापेक्षा अधिक भाषा शिकलेलो, जाणायला लागलेलो असतो. व्यक्तीच्या नेणिवेतील खरे जग हे ‘भौतिक’ नसून भाषिक असते, भाषेच्या कृपेने मनुष्य वास्तवाला सामाेरा जातो. समाजाच्या अशा भाषिक सवयीतूनच व्यक्तीचा जीवनविषयक दृष्टीकोन तयार असतो. याचाच अर्थ भाषा ही माणसाच्या वर्तनाचा अंगभूत भाग असते.
भारत हा मोठा खंडप्राय देश. भाषिक वैविध्य हा भारताचा एक संस्कृतिविशेष. विविध प्रांत, राज्ये हे भारताचे विशेष. पण, या प्रांतांना, राज्यांना विशिष्ट चेहरा देण्याचे काम भाषा करत असते. विशिष्ट बोली, भाषांनी तो प्रांत अथवा ते राज्य अोळखले जाते. गोमंतकीय भूमीचा, राज्याचा विचार करताना एक वैशिष्ट्य विशेषत्वाने जाणवते. गोवाभूमी जशी तिथल्या निसर्गसौंदर्याने नटली अाहे तशी कोकणी, मराठी या दोन्ही भाषांनी अधिकच समृद्ध झाली अाहे. एकीकडे कोकणी ही जनसामान्यांची संप्रेषण व्यवहाराची भाषा अाहे, त्यामुळे ती लोकांच्या हृदयाच्या निकट अशी भाषा अाहे. तर दुसरीकडे लेखनव्यवहारासाठी, वाङ्मयनिर्मितीमध्ये मराठीदेखील तितकीच अग्रणी अाहे. कोकणी, मराठी अशा दोन्ही भाषांचे वरदान मिळालेली ही गोमंतकीय भूमी जागतिक भाषाविचाराच्या पार्श्वभूमीवर भाषिकदृष्ट्या अधिक सकस ठरलेली अाहे.
बहुभाषिकतेचा मान मिळालेली ही गोवाभूमी. यासंदर्भात बहुभाषाकोविद व नामवंत साहित्यिक काकासाहेब कालेलकर यांनी म्हटलेच अाहे की ‘कोकणी अाणि मराठी यांच्यामध्ये विशिष्ट अद्वैताचा संबंध अाहे.’ शिवाय अॅन्थनी डिसिल्वा व फॅलिक्स परैरा यांच्यासारखे फादर स्टिफन्सचा वारसा सांगणारे नव्या पिढीतील ख्रिस्ती अभ्यासकांचे म्हणणे देखील हेच अाहे की, एका भाषेच्या अभ्यासाने, त्या भाषेतील साहित्यनिर्मितीच्या अध्ययनाने दुसरी भाषा व त्यामधील वाङ्मय सखोल व अत्यंत विशाल होत असते. गोवा भूमीने अाजपर्यंत ‘ख्रिस्तपुराण’ लिहिणारे फादर स्टिफन्स, काकासाहेब कालेलकर, अ. का. प्रियोळकर, वि. बा. प्रभुदेसाई, कवी बा. भ. बोरकर यांच्यासारखे कितीतरी साहित्यिक मराठी साहित्यसृष्टीला दिले अाहेत.
गोव्यामध्ये प्रामुख्याने कोकणी बोलली जाते. कोकणीचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता महाराष्ट्राच्या पश्चिमेस किनारपट्टीच्या भूभागास ‘कोकण’ असे नाव असून या भागात विविध व्यवसाय, धर्म, परंपरा, धंदा यांना अनुसरून अनेक प्रकारची भाषा बोलणारेही लोक अाहेत. सह्याद्री पर्वतामुळे पश्चिम महाराष्ट्राचे ‘देश’ अाणि ‘कोकण’ असे दोन भाग पडतात. कोकणीचे प्रदेशानुसार उत्तर कोकणी व दक्षिण कोकणी असे पोटभेद पडतात. सामान्यमानाने दमणपासून रत्नागिरीपर्यंत उत्तर कोकणी, तर राजापूर ते गोवा मंगळूरपर्यंत दक्षिण कोकणी असे दोन भाग ठळकपणे जाणवतात.
बाणकोटी, दमणी, घाटी, मावळी, संगमेश्वरी हे पोटप्रकार स्थानावरून व अागरी, भंडारी, धनगरी, किरिस्तांव, कोळी, कुणबी, परभी, ठाकरी इत्यादी व्यवसायावरून पडलेले हे पोटप्रकार उत्तर कोकणीत मोडतात. राजापूरपासून मालवण, गोमंतक, कारवार, मंगळूर इत्यादी विभाग दक्षिण कोकणी भाषेत मोडतात. त्याचप्रमाणे बारदेसकरी, कुडाळी, चित्पावनी व मालवणी असे प्रांतपरत्त्वे उपप्रकारही सांगितले जातात. गोवा-कोकण प्रदेशात या सर्व बोलींचे स्वरुप त्या-त्या बोलींना विशिष्टत्व प्राप्त करून देणारे अाहे.
बोली अाणि संस्कृती यांचा संबंध अतूट असतो. अापल्याला हे माहितच अाहे की, दर बारा कोसावर भाषा बदलते. मग बोली या उक्तीपासून कशा बरे अलिप्त राहतील? उलटप्रमाण भाषेपेक्षा बोली या अधिक प्रवाही असतात. ज्या अापोअापच एक-एक करून छोटे-छोटे भौगोलिक प्रदेश एकमेकांशी जोडत असतात. उत्तर व दक्षिण कोकणात बोलल्या जाणाऱ्या काही निवडक बोलींची उदाहरणे या प्रदेशातील भाषिक समृद्धी अधिक स्पष्ट करतात.
गोमंतकीय कोकणीतील एक छोटीशी कथा बघा. ‘म्हापशां शारांत एक हाॅडलाॅ गिरेस्त अासलाॅ. तेका चार चॅडे, चार सुनो, तीन चेड्वां अशी संतती अासली. तॅचॅ चॅडे, सुनो, चेड्वां तेची सेवा चाकरी एकापरास एक जास्त चडाअोडीन करतालीं’.
कुडाळी बोलीची विचार करता उत्तर कोकणी व दक्षिण कोकणी यांच्या माथ्यावर भौगोलिकदृष्ट्या कुडाळी बोली येते. सावंतवाडी, गोमंतक, बेळगाव जिल्ह्याचा काही भाग, कोल्हापूरचा पश्चिम भाग, थोडा रत्नागिरीकडचा भाग इत्यादी भागात कुडाळी बोलली जाते. यामध्ये सावंतवाडीकडे बोलली जाणारी बोलीतील कथा बघा.
‘अॅका माणसाक दोन झील होते. तेतुरलो न्हानगो बापाशीक म्हणूक लागलो बाबा, माका येतलो तो जिंदगेचो वाटो माका दी. मगे तॅका अापली जिंदगी वाटून दिली. मगे पुस्कळ दीस जांवचे अादीच न्हानग्या झिलान सगळा घालयला’.
हीच कथा कोकणीच्या कारवारी बोलीत. खास करून सारस्वतांच्या.
यॅका गृहस्ताक दाॅग जाण पूत असिलतॅ. तातुंलेपैकी सानु अापणागॅल्या बापसुकडे म्होणच्या लागलाॅ, अन्नां, मागॅल्या वाट्याक येंवची तितली अास्ति माका दी. अानी तांणॅ अापणागेली अस्ति ताका वांटुनु दिली’.
उत्तर रत्नागिरी, वेंगुर्ले, सावंतवाडी, गोमंतकाचा काही भाग इत्यादी भागांमध्ये चित्पावनी बोली बोलली जाते. चित्पावनांचे सानुनासिक बोलणे अाजही नाटक, चित्रपटांमधून अापण एेकतो. करय, फिरयलो, सापयचे, चालयली, घेवयला, जेय, ठेय इत्यादी रुपात ‘व’ चा ‘य’ होतो. घोडो, भोपळो, चौयरो, पायल्यो, पोथ्यो, शाहणो इत्यादी शब्दातील ‘अो’ कार स्पष्ट अाहे. शिवाय ज्यो, हो, ही सर्वनामे अाणि अायलो, बोलल्यो, हवो, ठेवलो यांसारखी रुपे चित्पावनीत अाढळतात. केळा, सोना, भांडा, फुला, गवता, बकरा अाहेत. अहूर (पूर), अांदुळो (झोपाळा), माथ्यो (रवी), खळ (अांगण), मिरसांग (मिरची), रांधप (स्वयंपाक) घोऊस (नवरा) इत्यादी. कादंबरीकार ह. मो. मराठे यांची ‘बालकाण्ड’ कादंबरी चित्पावनीचा उत्कृष्ट नमुना अाहे.
संगमेश्वरी, बाणकोट, मावळी, घाटी हे उत्तर कोकणीचे प्रांतपरत्त्वे उपभेद. बाणकोटच्या अासपास पूर्वी मुसलमानांचे वर्चस्व असल्याने या बोलीवर उर्दू, फारसी भाषांचा परिणाम बराच अाहे. कोकणलगतच्या सह्याद्री घाटावर, भोरच्या अासपास घाटी बोलली जाते. तर संगमेश्वरी ही उत्तर कोकणीपैकी दक्षिणेकडली बोली. देवरुख- रत्नागिरीच्या अासपासची. यामध्ये जिनगी (जिंदगी), हिसा (हिस्सा), परांगदा, ख्यालगिरी (बेफिक्री), राजी (राझी) असे उर्दू, पारसी शब्द अाले. मुंबईच्या काही भागातही संगमेश्वरी कोकणी बोलली जाते.
मालवणी तर अाज साहित्यासह मराठी चित्रपट, मालिका, हास्य-विडंबनाचे कार्यक्रम अाणि नाटकांमधूनही लोकप्रिय ठरली अाहे. १९२८ साली गं. बा. कदम यांच्या ‘ललाटलेख’ या मराठी नाटकातील काही मालवणी प्रवेश चांगलेच गाजले होते. अाताशा तर रंगभूमीवर समग्र मालवणी खेळही सादर होत असतात.
विकसित होणारी कोणतीही भाषा एकजिनसी राहू शकत नाही. कोणतीही जिवंत भाषा अापल्या मूळ स्वरुपात उरत नाही. परकीय अाक्रमणे, राज्यक्रांती, दुष्काळादी अापत्ती, वैचारिक क्रांती इत्यादी कारणांनी मानवी समूहाचे भ्रमण व मिश्रण सुरु असते. म्हणून रीतिरिवाज, चालीरिती, पोषाखपद्धती, वाङ्मय, अावडीनिवडी यांच्यात देवाणघेवाण सुरु होते. मराठी, कोकणी या प्रक्रियेला अपवाद कशा ठरतील? या दोन्ही भाषा देखील विकसित होताना त्यांनी इतर भाषांचे कित्येक शब्द, विशेष अात्मसात केले. परकीय अमलामुळे जे-जे म्हणून फरक घडले ते ते त्यांनी अात्मसात केले.
पोर्तुगीजांनी अादिलशहाकडून १५१० साली गोवा जिंकून घेतला. तो १९ डिसेंबर १९६१ पर्यंत त्यांच्याच ताब्यात राहिला होता. या साडेचारशे वर्षाच्या कालावधीत गोवा, दमण व दीव या तीनही पोर्तुगीज वसाहतींचा राज्यकारभार हा अर्थातच पोर्तुगीजमधून चालणे स्वाभाविकच होते. अापोअापच पोर्तुगीज भाषेचा मराठी, कोकणीवर परिणाम होऊ लागला. दैनंदिन व्यवसाय, व्यवहाराचा पोर्तुगीजशी संपर्क येऊ लागला. व्यापार, धर्मप्रसार, व्यवसाय, राजकारण, वाङ्मय इत्यादी क्षेत्रात अनेक पोर्तुगीज शब्द शिरले अाणि कालांतराने ते मराठी, कोकणीत दृढ झाले. मराठीत, कोकणीत जवळपास शंभर पोर्तुगीज शब्द सामावलेले अाहेत. ते पाहू.
१) वस्तूंशी संबंधित पोर्तुगीज शब्द : इस्काद (जिना), अलमारा (कपाट, अलमारी), फलेर, फोलेर (दीपस्तंभ, दीपगृह), फास्की (चौकट), फेस्क, फस्क (अागपेटी), बांबोट, बांबट (उथळ पाण्यातील वाफेची बंब असणारी नाव), बुरींग/ बुरीज (बुरुज), बुशे-सेत (लहान डबी, टिन पत्र्याची पेटी), बोम (लहान मुलास दूध पाजण्याचे काचेचे भांडे). शिवाय काडतूस, काजे, चेपे, कुतनी, फीत, घमेले, परात, रिफाड, खण, बशी, चावी, खमीस, इस्त्री, मेज, साबण, वरांडा, बादली, बटवा इत्यादी.
२) खाद्यपदार्थांशी संबंधित शब्द : अार्गुमास (कात, गुळाचा चूना), फूंच (हलकी तंबाखू, बडिशेप), काजू, पाव, अननस, बटाटा, बिस्कूट, कोबी, पोपय, पेरू, भोपळा, हापुस, बोंबील (माशाची एक जात) इत्यादी.
३) नैसर्गिक गोष्टींशी संबंधित शब्द : अारय (काळी रेती), कोको (एक वनस्पती, पेय) गाराफ- गार्फ (कलमी अांब्याचे झाड), गार्फेली (कलमी अांबे लावणारा), पराय- प्राय (बोटीचा धक्का), फर्नादीस, फर्नादीन (अाडनाव अाहे, हे माहीत अाहे, पण अांब्याची एक जातही अाहे) इत्यादी.
४) ख्रिस्ती धर्माशी संबंधित शब्द : इर्मित (ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा मठ), पाद्री (ख्रिस्ती धर्मप्रसारक), नाताळ (ख्रिसमस), पोदीन (धर्मपिता) तर बालांडा (देवळाचा सोपा यासाठी)
५) व्यवसाय व व्यावहारिक गोष्टींशी संबंधित शब्द : पदेर (पाव विकणारा), फेती (कारागिराची मजुरी, घडणावळ), पाॅरय (ताबा, अधिकार), अावीज (सूचना, नोटीस) पगार, पिकाव, टिकाव, कर्नल, जुगार, लिलाव, मेस्त्री इत्यादी.
६) वस्त्रसंबंधी शब्द : गाॅल (अंगरख्याचा गळा), फुस्ताव (एक प्रकारचे कापड), फ्लानेल (लोकरीचे मऊ कापड), बाॅल्स (खिसा)
७) स्वभावविशेष, भावभावनापर अालेले शब्द : अाल्म (धैर्य, धाडस), फालतू (बिनकामाचे) अाल्मा (वेढब कुरुप स्त्री), फिदाल्ग (चैनी, खुशालचेंडू), फोग (शोभेचे दारुकाम, खरडपट्टी), फोगोट (फटाका, खडसावणी)
८) अाजारसंबंधी शब्द : फुगाव (कांजण्या, विस्फोटक)
असे कितीतरी पोर्तुगीज शब्द गोव्यातील कोकणी, मराठीत स्थिरावले. पोर्तुगीजांच्या अाक्रमणामुळे हे भाषिक आदानप्रदान घडून अाले, पण यामुळे या भाषांचे कुठलेही नुकसान झाले नाही. उलट या शब्दांना सामावून घेतल्यामुळे त्या अाज अधिक समृद्ध झाल्या अाहेत. विविध वाङ्मय निर्मितीमधून गोमंतकीय भूमीचे भाषासौंदर्य अधिकच खुलविणाऱ्या ठरल्या अाहेत.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)