संकल्प आपले, गोव्यासाठीचे!

कव्हर स्टोरी

Story: डाॅ. नारायण देसाई |
05th January 2019, 11:15 am
संकल्प आपले, गोव्यासाठीचे!

नववर्ष म्हणजे काय? म्हटलं तर तो केवळ आकड्यातील बदल. एक आकडा संपला की त्याच्या पुढची संख्या क्रमाने येतेच. बाकी सारे तेच असते. महिने, आठवडे, सारे तेच आणि तसेच. आणि तरी नववर्षाची उत्कंठा, नव्या वर्षाच्या पोटात काय दडलंय याचे अंदाज, नवीन वर्षात काही नवीन, वा नवल विशेष घडेल... ही आशा हे सारेच नववर्षाच्या नवलाईशी जोडलेले असते. म्हणून तर नववर्षाच्या शुभेच्छा आपण आवर्जून देतो आ​णि त्यांची अपेक्षाही करतो. वर्ष येणार असते आणि जाणारही असते. आणि तरी वर्ष येण्याआधी ते कसे असू शकेल, याचे आडाखे आणि वर्ष संपतानाचे विविध आढावे हा नित्यनेम ठरलेला. नववर्षासोबत येणारे तितकेच महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तिगत स्तरावरील नववर्षाचे संकल्प. येणाऱ्या वर्षभरात काय काय साध्य करायचे, बदलायचे, सुधारायचे याचे मनातले निश्चय आणि निर्धार म्हणजे संकल्प.
असे संकल्प म्हणजे एका अर्थाने आपले जगणे, आपल्या विचाराने घडणार असल्याची ग्वाही. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असल्याचा विश्वास. काळाचे बंधन पाळून आपली प्रगती साध्य करण्याचा एक निर्धार. व्यक्ती म्हणून असे संकल्प नववर्षारंभी केले जातात. समाज आणि राज्य वा प्रदेश म्हणूनही असे संकल्प करता येतात. आपल्या गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, औद्योगिक आदी क्षेत्रात या वर्षासाठी असे संकल्प असल्यास कोणते असावेत? या संकल्पांच्या मागे कोणते बळ उभे करायचे? असे प्रश्न नववर्षाच्या निमित्ताने आपल्यासमोर येतात.
२०१९ हे वर्ष एकविसाव्या शतकाचे दुसरे दशक पूर्ण होण्याची सूचना देणारे. एकविसाव्या शतकाच्या शुभारंभी जागतिक स्तरावर ‘सहस्रक विकास उद्दिष्ट्ये’ ठरवण्यात आली. जगभरात मानवी जीवन सुखी होण्यासाठी, विकासाचे लाभ संपूर्ण मानवजातीला मिळावेत, यासाठी जीवनाच्या विविध अंगांशी संबंधित अशी आठ उद्दिष्टे या सहस्रकाच्या पहिल्या पंधरा वर्षात गाठण्याचा तो संकल्प होता. या काळात त्या उद्दिष्टांतील प्रत्येकावर विचार आणि कृती, नियोजन आणि समीक्षा, योजना आणि अपेक्षा यांच्यावर भर दिल्यानेच हे शक्य होणार आहे. मात्र, २०१५ पर्यंत यातले फार काही ठरल्यानुसार घडून आले नाही. म्हणून २०१५ संपतानाच नव्या नावाने, आधीच्या उद्दिष्टांत भर घालून एकूण १७ उ​द्दिष्टे ‘निरंतर विकास उ​द्दिष्टे’ म्हणून जगात सर्वांसाठी निश्चित करण्यात आली. या १७ उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी २०१६ ते २०३० हा पंधरा वर्षांचा कार्यकाळ ठरवण्यात आला आहे. आणि या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी उपलब्धींचे टप्पे आणि त्यांचे निर्देशक मुद्दे एकूण ३०० आहेत. हे मुद्दाम इथे सांगायचे कारण? केवळ व्यक्ती, समाज, व्यवस्था आणि प्रदेश म्हणून जरी या वर्षभराचा विचार करायचा असे म्हटले तरी त्यासाठीही एक वैश्विक चौकट आपल्या मदतीला आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या संकल्पांना या व्यापक संदर्भातही मांडणे शक्य आहे. हे आपल्या लक्षात यावे.
गोव्याने २०१९ साठी करण्यासारखे संकल्प कोणते? काय करता येईल? विशिष्ट प्रश्नांच्या बाबतीत संकल्प करावे लागणे याला कारणे कोणती? आपल्याला एक प्रगत प्रदेश म्हणून टिकून रहायचे असेल तर काय करायला हवे? यावर ते संकल्प ठरावेत. गोवा हा निसर्ग संपन्न, शांत, आनंदी आणि सुखी असावा असे गोमंतकीयांना वाटणारच. तो तसा रहायचा तर काय करता येईल याचा विचार करावा लागेल.
जेमतेम ४०० गावांचा आपला गोवा. त्याला डोंगरांची उशी निवांतपणासाठी लाभली आहे. या डोंगररांगांनीच निसर्गवैभव राखून गोव्याची शान वाढवली आहे. याच्यामुळेच पावसाच्या दृष्टीने गोवा भाग्यवान आहे. पण, पाणीटंचाई आणि पाण्यासाठी घेराव, मोर्चे गोव्यात वर्षभर पहायला मिळतात. पावसाचे पाणी वाहून जाते आणि गोव्यात पिण्याचे पाणी विकत घेण्यासारखी स्थिती येते. बागायती आणि शेतीसाठी ओळखला जाणारा सावईवेरे सारखा गाव टँकरची वाट बघतो. याचा अर्थ आपण आपली पाण्यासारखी मुलभूत गरज भागवण्याइतकेही सक्षम नाही, असा झाला ना? गोव्याला हा संकल्प करणे भाग आहे की या वर्षअखेरीस प्रत्येक गाव आपल्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी पाणी साठवण्या- जिरवण्याची मोहीम आपल्या पूर्ण शक्तीनिशी राबवील. यासाठी कोट्यवधी रूपये खर्चाच्या प्रकल्पांना न भुलता स्थानिक पातळीवर जलसंधारणाची मोहीम निसर्गप्रेमी, महिला गट पर्यावरणाचे जाणकार यांच्या सहभागाने ग्रामपंचायतींना राबवता येईल. त्यासाठी या विषयावर जागृतीत वेळ न दवडता प्रत्यक्ष कृतीवर भर हवा.
पाणी म्हणजे जीवन! गोव्यातले जीवन सुधारायचे तर पाण्यापासून सुरुवात करू. या कामी आपल्या गरजा, आपल्या क्षमता, प्राधान्यक्रम, सार्वजनिक जीवन आणि सहभागिता, सामूहिक विचार आणि योजकता आणि अभ्यासपूर्ण सामूहिक कृतीतून प्रश्न सोडवण्याचा संकेत पाणी प्रश्नाच्या निमित्ताने करायची ही संधी आहे. या कामासाठी गाव एकवटण्यासाठी विद्यार्थी आणि तरुणांना असा कार्यक्रम आपल्याला देता आला पाहिजे. ते व्हायचे तर निर्णयप्रक्रियेचा प्रश्न येतो. याचसाठी आपल्याला सध्या प्रशासनाच्या नावे चालणाऱ्या ‘पर’ शासनाकडून ‘स्व’ शासनाकडे वळावे लागेल.
स्व-शासनासाठी गावच्या संवैधानिक व्यवस्थेत प्रत्येक गोवेकराने स्वत:ला गुंतवण्याचा संकल्प केला पाहिजे. आज गावांचे गावपण हरवण्याचे एक कारण गावात जीव नसणे हे आहे. गावचे चैतन्य आणि पुरुषार्थ, कर्तृत्व आणि नेतृत्व निर्यात करत गावांनी आपले सत्त्व आणि स्वत्व गमावले आहे. ते पुन्हा मिळवायचे तर स्व-शासनासाठीचा लढा अराजकीय मार्गाने लढायची गरज आहे. हा संकल्प एक तृतियांश आरक्षणाच्या लाभार्थी महिला आणि तरुण यांनी संयुक्तपणे केला तर लोकसहभागातून लोक शासन, जनसंघटन शक्य होईल. पण त्यासाठी दृढ संकल्प हवा. पर-शासनाकडून स्व-शासनाकडे वळण्यासाठी तटस्थ निष्पक्ष सामूहिक कृतीत सातत्य हवे. कायद्याच्या चौकटीत राहून करता येण्यासारखे स्व- शासनासाठीचे संघर्ष शांतपणे चालवत, संविधानमान्यतेच्या सत्तरीच्या या वर्षात लोकांचे लोकराज्य कंत्राटी टोळीच्या तावडीतून सोडवून सर्वांच्या भल्यासाठी वापरण्याचा संकल्प गावपातळीवर हवा.
गोव्याने राज्यशासन म्हणून, एक संवैधानिक प्रशासकीय रचना म्हणून या वर्षात एक साधे सोपे काम मुद्दाम करावे. लोकहिताचे ब्रीद घोळवत आपले प्रशासन आकाराने फुगतच चालले आहे. ‘नागरिक : सरकारी सेवक’ प्रमाणाचा जागतिक उच्चांक गाठण्याचा आपला प्रयत्न राज्यकर्त्यांच्या मनमानीमुळे यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. आजघडीला हे प्रमाण ‘२५ - २७ नागरिकांमागे एक शासकीय कर्मचारी,’ असे सांगितले जाते. मग या एवढ्या मनुष्यबळाचा लेखा -जोखा ज्यांच्या नावे शासन चालते, त्या लोकांसमोर एकदा तपशिलात यावा. माहिती तंत्रज्ञानाचा उत्साही वापर करूनही सरकारी नोकरीत असलेले मनुष्यबळ वाढवणे चालूच आहे. असे का? या मनुष्यबळाची कौशल्ये, क्षमता, उत्पादकता, कार्यदक्षता यांचा एक परिपूर्ण अहवाल हवा.
आपल्या गरजा भागवण्यापुरते प्रशासन तेही लोकशाहीत नागरिकाची सत्ता मान्य करून चालणारे घडवण्यासाठी मनुष्यबळाचा असा लेखा-जोखा महत्त्वाचा ठरतो. त्यातून आपली कार्यक्षमता, उत्पादकता, कृतिशीलता, नैतिकता यांचे मूल्यांकन होऊ शकेल. देव- दैवतांच्या गोव्यात निसर्ग आणि माणूस यांचे अस्तित्व कितपत सुसंवादी आणि टिकावू आहे, याची निश्चिती करण्यासाठी हे तीन संकल्प पुरेसे आहेत. पहिल्या जल संवर्धनाचा संबंध आपल्या अस्तित्वाशी आहे.
दुसरा संकल्प अर्थपूर्ण स्वाभिमानयुक्त स्व- शासनासाठीचा. तो यासाठी की लोकशाही टिकायची तर स्वराज्याचे प्रात्यक्षिक आणि जीवनतंत्र तळागाळात रुजणे आवश्यक आहे. यासाठी गाव पातळीवर सर्व घटकांना वावरता येईल. तिसरा संकल्प खास शासकवर्गासाठी आहे. राज्यघटनेत सामाजिक आर्थिक न्यायाचे तत्त्व महत्त्वाचे मानले आहे. पण, कुंपणानेच शेत खाणे जेव्हा कायद्याच्या आधारे चालते, तेव्हा आपण राष्ट्र म्हणून पुढे जाण्याच्या शक्यता कमी होत जातात. मनुष्यबळ किती, कुठे आणि काय करते याचा प्रामाणिक अत्यावश्यक आहे. गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षात ग्राम स्वराज्य आणि लोकराज्य यांच्या सबलीकरणाचा, सक्षमीकरणाचा संकल्प, अंत्योदयाचे उद्दिष्ट आणि सर्वोदयाचे साध्य आपला विवेक जागवो! संकल्प आणि सिद्धी यांच्यामध्ये सायास आणि साधना यांना स्थान हवे. ते २०१९ मध्ये जनमनात शतगुणित होवो, ही सदिच्छा!
(लेखक शिक्षणतज्ञ आहेत.)