राफेलवर कॅबिनेट बैठकीत चर्चा नाही : मुख्यमंत्री

अधिकृत ट्विटर हँडलवर प्रतिक्रिया

Story: विशेष प्रतिनिधी | गोवन वार्ता |
02nd January 2019, 10:42 am

पणजी: राफेल संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत किंवा अन्य कुठल्याच बैठकीत चर्चा झालेली नाही त्यामुळे जी ऑडिओ क्लिप काँग्रेसने जाहीर केली आहे ती बनावट आहे आणि काँग्रेसने वैफल्यग्रस्त होऊन ही कृती केली आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप जारी केली ज्यात राणे यांच्या आवाजात राफेलच्या फाईल्स मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये आहेत असा उल्लेख आहे. याच विषयावरून आज संसदेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आरोग्य मंत्र्यांच्या रिकॉर्डिंगचा मुद्दा उपस्थित केला पण जेटली यांनी त्यास हरकत घेतली.

दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी काँग्रेसचा खोटारडेपणा हल्लीच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने उघड झाला आहे. त्यांचा खोटारडेपणा उघड झाल्यामुळेच त्यांनी वैफल्यग्रस्त होऊन हा प्रयत्न केला आहे. पण अशा प्रकारची कसलीच चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी याविषयी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा