तो आवाज माझा नव्हेः विश्वजीत

सरकारने चौकशी करण्याची मागणी

Story: विशेष प्रतिनिधी | गोवन वार्ता |
02nd January 2019, 10:31 am

पणजी: राफेलच्या फाईल्स संदर्भात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुठलेच भाष्य केले नव्हते. त्यामुळे जी ऑडिओ क्लिप काँग्रेसने व्हायरल केली आहे ती बनावट आहे. त्यातील आवाज माझा नसून तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून काँग्रेसने हे कारस्थान रचले आहे. या साऱ्या प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांशीही मी चर्चा केली आहे, ते माझे नेते आहेत आणि त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज सांगितले. 

काँग्रेसने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन विश्वजीत राणे यांच्या फोनवरील संभाषणाचे रिकॉर्डिंग सादर केले. राफेल डीलच्या फाईल्स मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितल्याची माहिती या क्लिपमध्ये आहे. हा आवाज राणे यांचा असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. राणे यांनी हा आवाज बनावट असल्याचे सांगून केंद्रीय तपास यंत्रणा किंवा क्राईम ब्रँचकडून या प्रकरणाचा तपास करावा, तसेच तो आवाज कोणाचा आहे ते हैदराबाद येथील लॅबमधून तपासून घ्यावे, अशी मागणी केली. या संदर्भात मी भाजप अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहिले आहे, असे राणे म्हणाले. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर काल मंत्रालयात दाखल झाले हे पाहून काँग्रेसला आश्चर्याचा धक्का बसला आहे. ज्या क्षणाला पर्रीकर सक्रिय झाल्याचे काँग्रेसने पाहिले त्याच क्षणी सत्ता स्थापन करण्याचे काँग्रेसचे मनसुबे धुळीस मिळाले. त्यातून ते वैफल्यग्रस्त झाले. काँग्रेसमधून दोन आमदार भाजपमध्ये दाखल झाले तेही त्यांना पचवता आले नाही. अशा अनेक घटनांमुळे काँग्रेस वैफल्यग्रस्त होऊन माझ्या मागे हात धुवून लागली आहे. चेल्लाकुमार यांनीही मी त्यांच्याकडे बोलल्याचे सांगितले होते. या साऱ्या घटना पाहिल्या तर काँग्रेस किती खालच्या स्तरावर आली आहे, ते दिसते. मी कुणाकडेही काही बोललेलो नाही. त्या विषयी मी पक्षाकडे खुलासा पाठवला आहे, असे राणे यांनी सांगितले. 

काँग्रेसकडे कसलाच विषय नाही म्हणून त्यांनी राफेलचा मुद्दा बनावट आवाजाद्वारे तयार केला. मी अमित शहा यांना इमेलद्वारे कळवले आहे की, ऑडिओ क्लिपमध्ये जो आवाज आहे त्याची पडताळणी व्हायला हवी. हे रिकॉर्डिंग कोणी कोणाला दिले आहे त्याची माहिती केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीतून बाहेर येईल आणि त्यातील आवाज माझा नाही हेही स्पष्ट होईल असा विश्वास राणे यांन व्यक्त केला.

राफेल हा राज्याचा विषय नाही. त्यामुळे असा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला नाही. हा राष्ट्रीय विषय आहे त्यामुळे आमच्या बैठकीत असा विषय येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसने घाबरून लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हे नाटक केले आहे. पोलिस महासंचालकांना सांगून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हा आवाज कोणाचा आहे आणि कोण तो सर्वत्र फिरवत आहे, त्याची माहिती मिळण्यासाठी तपास आवश्यक आहे असेही त्यांनी नमूद केले. 

या विषयात तज्ञ असलेल्या एजन्सी मार्फत चौकशी झाली तर काय खरे आहे व कोणाचा आवाज ते सगळे स्पष्ट होईल. आवाज तपासणाऱ्या एजन्सी आहेत. मी पूर्ण सहकार्य करीन. हा ऑडिओच बनावट असल्यामुळे त्यातील कुठल्याच गोष्टीकडे माझा संबंध नाही किंवा मी बोललेलो नाही. मुख्यमंत्र्यांना माझ्यावर विश्वास आहे आणि मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यामुळे अशा गोष्टींमुळे मला चिंता वाटत नाही असे राणे म्हणाले. 



सर्वांनीच आता संभाळून बोलावे 

राफेल हा मोठा विषय आहे. त्यामुळे हा शब्द जेव्हा चर्चेत येतो तेव्हा वाद होतोच. त्यामुळे जेव्हा काँग्रेसने आरोप केले तेव्हा मीच पक्षाच्या वरिष्ठांना फोन करून सत्य स्थितीची कल्पना दिली. या घटनेने मी खूप काही शिकलो आहे. या घटनेने मला सतर्क केले आहे. अशा गोष्टीही राजकारणात घडू शकतात. सर्वांनीच कोणाशीही बोलताना संभाळून बोलले पाहिजे, असे राणे म्हणाले. 


मी कुठल्याही स्पर्धेत नाही. मनोहर पर्रीकर हे आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मी कुठल्याच पदाच्या स्पर्धेत नाही. त्याबाबतची चर्चाही आज वैध नाही. माझी कुठल्याच पदाविषयी इच्छा नाही. मी लोकांच्या सेवेसाठी कायम तत्पर आहे असे विश्वजीत राणे म्हणाले. पत्रकारांनी त्यांना तुम्ही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्यामुळे हे आरोप झाले आहेत का असे विचारल्यानंतर त्यांनी वरील उत्तर दिले. 


हेही वाचा