मगोच्या याचिकेवर आज निवाडा

17th December 2018, 06:32 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : माजी आमदार दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या दोघांना आगामी ‌निवडणुकीसाठी अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका मगो पक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली आहे. या याचिकेचा निकाल सोमवारी जाहीर केला जाणार आहे.

मगो पक्षाचे केंद्रीय समितीचे सदस्य सत्यवान पालकर आणि विकास प्रभू यांनी सोपटे आणि शिरोडकर यांना अपात्र करावे, अशी याचिका खंडपीठात दाखल केली आहे. या याचिकेत केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, सभापती, गोवा विधानसभा सचिव, सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांना प्रतिवादी बनविण्यात आले आहे.

सोपटे आणि‌ शिरोडकर यांनी दि. १६ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर तिथूनच त्यांनी आमदारकीचा आणि काँग्रेसचा राजीनामा पाठवून दिला होता. आमदारकीच्या राजीनाम्याबाबत सभापतींच्या कार्यालयात फॅक्स करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. यावेळी सभापतींनी त्याची प्राथमिक चौकशी करण्याची आवश्यकता होती. मात्र, ती न करता त्यांनी त्वरित राजीनामे स्वीकारल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

याचिकादारांनी संविधानाच्या कलम २२६ आणि २२७ अंतर्गत दाखल केलेल्या या याचिकेत सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी शिरोडकर आणि सोपटे यांचे राजीनामे स्वीकारण्याच्या कृतीलाच आव्हान दिले आहे. या दोघांना किमान सहा वर्षे निवडणूक लढविण्यापासून अपात्र करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. आता या याचिकेचा निकाल काय येतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

Related news

लिफ्ट देणे कार चालकाच्या बेतले जीवावर

सिरसईच्या जीवन च्यारींचा जांबोटीत मृतदेह; खून करून पळवली कार Read more

साडेनऊ महिन्यांनंतर मडकईकर विधानसभेत

शरीराची डावी बाजू कमजोर, पण उत्साह पूर्वीसारखाच Read more

Top News

कुठल्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी!

राज्यात घटनात्मक पेचप्रसंगाची स्थिती, काँग्रेसचा आज पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा Read more