सुरावलीत साडेतीन कोटी खर्चून रेल्वे भुयारी मार्ग : चर्चिल


16th December 2018, 06:24 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : सुरावली येथील चर्चसमोर असलेल्या रेल्वेच्या फाटकाजवळ ३.६३ कोटी रुपये खर्चून रेल्वे भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार चर्चिल आलेमाव यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

सुरावली येथील चर्चसमोर असलेले रेल्वे फाटक काढून रेल्वे उड्डाणपूल अथवा रेल्वे भुयारी मार्ग बनविण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन आपण माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू गोव्यात आले असता त्यांच्याकडे या मागणीचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी प्रभूंनी सुरावलीतील भुयारी मार्गाला हिरवा कंदील दाखविला होता. त्याबाबतचा आदेशही १२ डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे. राज्य सरकार व कोकण रेल्वे महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भुयारी मार्गाचे काम केले जाणार आहे. तसेच पन्नास टक्के खर्च कोकण रेल्वे महामंडळ करणार असून उर्वरित पन्नास टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे, असे चर्चिल यांनी सांगितले.

वेर्णापासून चिंचोळणेपर्यंत जाणाऱ्या पश्चिम बगल मार्गावर ठिकठिकाणी लोखंडी पूल उभारण्याची मागणी आपच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. या पश्चिम बगल मार्गामुळे पावसाळ्यात पूर येऊन लोकांना त्रास होणार असल्याचे त्यांचे मत आहे. पण साळ नदी पूर्णपणे प्रदूषित झालेली असून, साळ नदीतील गाळ उपसून नदीच्या दुतर्फा सिमेंटकाँक्रिटचे कठडे बांधण्याची मागणी सरकारकडे केली आहे. तसेच शेतातील छोट्या-मोठ्या नाल्यांच्या जोडण्या साळ नदीच्या पात्रात व्यवस्थितपणे सोडण्याचीही मागणी केली आहे. ही सोय केल्यास पश्चिम बगल मार्गावर पावसाचे पाणी तुंबून पूर येण्याची समस्या निर्माण होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

साळ नदीतील गाळ उपशास सुरुवात

साळ नदीतील प्रदूषित पाण्याच्या उपशाबाबत आपण सार्वजिनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी चर्चा केलेली आहे. नदीच्या साफसफाईसाठी २०० कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. तसेच साळ नदीच्या साफसफाईला सुरुवातही करण्यात आली आहे. नदीची टप्प्याटप्प्याने सफाई झाल्यानंतर पावसाळ्यात कुठेही पाणी तुंबून राहणार नाही. गाळ उपसल्यानंतर नदीचे पात्र स्वच्छ होईल, असा विश्वासही आमदार चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केला.

आपकडून जनतेची दिशाभूल

आम आदमी पक्षाचे (आप) समर्थक रॉडनी आल्मेदा सुरावलीतील भुयारी मार्गाच्या कामाबद्दल लोकांची दिशाभूल करीत आहेत. या भुयारी मार्गाच्या अनुषंगाने शनिवारी सकाळी आपच्या समर्थकांनी सुरावलीत मिरवणूक काढून भुयारी मार्ग होणार नसल्याचे नारे लावले होते. त्यात काडीचेही तथ्य नाही. सरकारने याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला आहे. त्यानुसार पुढील महिन्यात भुयारी मार्गाच्या कामाची निविदा जारी करून कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.