बाणावलीच्या विकासासाठी २४ कोटी मंजूर : चर्चिल

विकासकामांना ३१ पासून प्रारंभ


16th December 2018, 06:23 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : बाणावली मतदारसंघातील विकासकामे व सौंदर्यीकरणासाठी आपण सरकारकडे ७६ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २४ कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी निधी मंजूर झालेला आहे. सुरुवातीला ओडली चर्च, खारेबांद रस्ता रुंदीकरण, वार्का दफनभूमी, सुरावली पदपथ व केळशीचे सौंदर्यीकरण ही कामे हाती घेतली जाणार आहेत, अशी माहिती बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमांव यांनी दिली.

शनिवारी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत अशोक अवदी, अँथोनी फर्नांडिस, फेलोसिया फर्नांडिस व अन्य पंच उपस्थित होते. तळेबांद-बाणावली येथे ३१ डिसेंबर रोजी या विकासकामांना प्रारंभ केला जाणार आहे. सरकारच्या पाठिंब्याने आपण ही विकासकामे करीत असून, बाणावलीतील नागरिकांनी विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन चर्चिल यांनी केले.

खारेबांदच्या पुलापासून वार्कामार्गे भिडणीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करून दुतर्फा सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ३.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. ओडलीतील ४५० वर्षांपूर्वीच्या चर्चच्या परिसरात झाडे-झुडुपे वाढलेली आहेत. या चर्चचा परिसर व एका बांदाचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. खारेबांदपासून तळेबांदपर्यंतच्या रस्त्याचेही रुंदीकरण केले जाणार आहे. यासाठीच्या जागेसाठी नागरिकांनी स्वखुशीने ‘ना हरकत’ दाखले दिलेले आहेत. या मार्गाचे १४ कोटी रुपये खर्चून रुंदीकरण करण्याबरोबरच दुतर्फा सौंदर्यीकरण केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.

सरकारच्या निधीतून वार्कातील चर्चच्या दफनभूमीची दुरुस्ती करण्यासाठी १.७३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सुरावलीतील चर्च परिसरात असलेला एक बांद व तेथील परिसराचेही सौंदर्यीकरण केले जाणार आहे. त्यासाठी १.५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय केळशी पंचायत क्षेत्रातील एका बांदाचे १.५० कोटी रुपये खर्चून सौंदर्यीकरण केले जाणार आहे, अशी माहितीही आमदार चर्चिल आलेमाव यांनी दिली.