सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्षच : नाईक

मुरगावातील सभेत काँग्रेस नेत्यांकडून सरकारवर टीका


16th December 2018, 06:22 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता

वास्को : राज्य सरकारने शिक्षणापेक्षा रस्ते, पूल आणि सिमेंट काँक्रिटच्या जंगलांवरच अधिक भर दिला आहे. पूल, रस्त्यांपेक्षा सरकारने शिक्षण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज होती, अशी टीका फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी केली. काँग्रेसच्या जनआक्रोश आंदोलनाअंतर्गत शनिवारी मुरगाव पालिका इमारतीसमोर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, एम. के. शेख, वामन चोडणकर, संकल्प आमोणकर, सैफुल्ला खान, देवेंद्र केंकरे, महेश भंडारी, अॅड. ग्लक डिसोझा, सुभाष फळदेसाई, फ्रान्सिस नुनिस, इम्रान शेख आदी उपस्थित होते.

सूरज चोडणकर यांनी नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांना लक्ष्य करीत, लोकांना कोळसा नको, पण नाईक यांना कोळसा हवा आहे, असा आरोप केला. उपस्थित मान्यवरांनीही सरकारच्या कारभारावर टीका केली.

सहानुभूती नको, खाणी सुरू करा!

बाबू कवळेकर म्हणाले, राज्यातील खाण व्यवसाय सुरू व्हावा यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहे. नवी दिल्ली येथे खाण अवलंबितांनी केलेल्या आंदोलनात केवळ सहानुभूती दर्शविण्यासाठी भाजपचे काही मंत्री व खासदार सहभागी झाले होते. पण खाण अवलंबितांना सहानुभूती नको, खाणी सुरू झालेल्या हव्या आहेत. खाणी सुरू करण्यासाठी काँग्रेसचा केंद्र व राज्य सरकारला बिनशर्त पाठिंबा आहे, असे ते म्हणाले. राज्यातील भाजप आघाडी सरकार गोमंतकीयांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला घरचा रस्ता दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले.