खाणप्रश्नी गोव्याचे तिन्ही खासदार अपयशी

सुभाष वेलिंगकर यांचा टोला; म्हापशात कार्यकर्ता मेळावा


16th December 2018, 06:21 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता

म्हापसा : गोव्यातील खाणबंदीचे भाजपच्या केंद्रीय नेत्यांना काहीच पडलेले नाही. त्यांच्याकडून गेली दोन वर्षे सुमारे साडेतीन लाख खाण अवलंबितांना एकाकडून दुसऱ्या नेत्याकडे खेळविले जात आहे. खाणप्रश्नी केंद्राकडून अध्यादेश निघणे कठीण आहे. गोव्याचे तिन्ही खासदार हा प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत, असा आरोप गोवा सुरक्षा मंच पक्षाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी शनिवारी केला.

म्हापसा येथील तुळशीराम सभागृहात आयोजित गोवा सुरक्षा मंच पक्षाच्या म्हापसा मतदारसंघासाठीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत पक्षाचे अध्यक्ष आत्माराम गावकर, महासचिव संदीप पाळणी, जिल्हाध्यक्ष नंदन सावंत, उपाध्यक्ष सुनील मेथर, परेश रायकर, महिलाध्यक्ष अॅड. रोशन सामंत, गटाध्यक्ष किशोर राऊत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील खाण अवलंबितांनी राजधानी दिल्लीत केलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकारने पूर्णपणे पाठ फिरविली. माजी पंतप्रधान देवेगौडा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आंदोलनस्थळी पोहोचले. पण भाजपचे केंद्रीय नेते मात्र आंदोलनाकडे फिरकलेच नाहीत. यावरूनच केंद्राला गोव्यातील खाण समस्येची जाण नसल्याचेच दिसून येते, असे वेलिंगकर म्हणाले.

भाजपची सध्या वैचारिक दिवाळखोरी झाली आहे. त्यामुळेच गोवा सुरक्षा मंच वैचारिक अधिष्ठान असलेल्या, निष्ठावान, नि:स्वार्थी व सदसद्विवेकबुद्धी असलेल्या कार्यकर्त्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहे. स्व. भाऊसाहेब बांदोडकरांच्या नेतृत्वाखालील मगो पक्षाने राज्याला उत्तम प्रशासन दिले. लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. परंतु १९८० पासून सत्तेवर आलेल्या काँग्रेसने स्वार्थी राजकारण करून गोव्याला लुटले. मगोचे आमदार विकत घेऊन भ्रष्टाचार माजविला. त्यामुळेच भाजपला सत्तेवर येण्याची आयती संधी मिळाली, असे ते म्हणाले. प्रादेशिक आराखडा मार्गी लागला नसताना ऑर्चर्ड जमिनींचे रूपांतरण केले जात आहे. म्हादई नदीचे पाणी देऊन गोव्याला कर्नाटकला विकले आहे. फसवी आश्वासने, खोटारडेपणा व विश्वासघात यांचा अंत करण्यासाठी गोवा सुरक्षा मंच पक्षाची स्थापना झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

भाजपला परमेश्वरही तारू शकत नाही

सतीश धोंड यांच्या पुनरागमणाबाबत बोलताना, भाजपच्या फसवणुकीच्या राजकारणाला जनता आता कंटाळली आहे. त्यामुळेच लोकांनी भाजपला नाकारण्याचा निर्धार केला आहे. हा पक्ष मोडकळीस आला आहे. रसातळाला गेला आहे. त्यामुळे परमेश्वरही आता या पक्षाला तारू शकणार नाही, असा दावाही सुभाष वेलिंगकर यांनी केला.

निवडणुकांच्या तयारीला लागा!

गोव्यात मध्यावधी विधानसभा निवडणुकीची शक्यता असून, गोवा सुरक्षा मंच या निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहे. प्रदेश व संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत ३५ जागांसह लोकसभा निवडणुकीच्या दोन्ही जागाही पक्ष लढविणार आहे, अशी घोषणा करीत कार्यकर्त्यांनी बूथ समित्यांची बांधणी करून या निवडणुकांसाठी तयार रहावे, असे आवाहन सुभाष वेलिंगकर यांनी केले.