किनारा

कथा

Story: वसंत सावईकर |
15th December 2018, 10:00 am
किनारा

बायणा किनारा गजबजून गेला होता. रविवार होता. वेळ संध्याकाळची. माणसांचे थपेच्या थपे समुद्रकिनाऱ्यावर येत होते. लहान मुले, तरूण, वृद्ध खाऱ्या वाऱ्यात जणू नहात होते. बायका अापल्या लहान मुलांना पाण्यात न जाण्याच्या सूचना करीत होत्या. काही विक्रेते शेंगदाणावाले, फुलेवाले, अाईस्क्रीमवाले अोरडून अापणाकडे लक्ष वेधून घेत होते. पंधरा- वीस वर्षांची मुले समुद्राच्या पाण्यात डुंबत होती. सूर्य अजून अस्ताला गेला नव्हता. पाण्यावर पडणारी सोनेरी किरणे मनाला मोहवत होती. कित्येक वृद्ध जोडपी रेतीवर कपडा टाकून अारामात सुखदु:खाच्या गोष्टीत रंगून गेली होती. तरुण जोडपी हातात हात गुंफून किनाऱ्यावर फिरताना दिसत हाेती. काही तरुणी मोबाईलचे बटन दाबत अालेले मॅसेज तपासत होती.
... अाणि अशा या रम्यवेळी विठ्ठलराव व रखमाबाई हे वृद्ध जोडपे जवळच असलेल्या एका मोठ्या दगडावर बसले होते. अापल्या जीवनातील मागील सुखाचे क्षण शोधीत ते क्षण एकमेकांत वाटीत होते. घरात ती दोघेच. मुलीचे लग्न झाले होते. ती चेन्नईला रहात होती. दोन्ही मुलगे लग्न होऊन अमेरिकेत स्थायिक झाले होते. अाठवड्यात एक- दोनदा त्यांचे फोन येत. विठ्ठलराव व रखमाबाई वेळ घालविण्यासाठी रोज समुद्रकिनाऱ्यावर येत असत. २-३ तास दोघे त्याच दगडावर बसत अाणि काळोख होईपर्यंत मागल्या आठवणीत रमत. दोघेही जवळच्याच फ्लॅटमध्ये रहात. हा त्यांचा रोजचाच दिनक्रम झाला होता.
ती सुखवस्तू माणसे होती. पैशांची ददात नव्हती. विठ्ठलराव राष्ट्रीयकृत बँकेत मॅनेजर होते. अाता रिटायर होऊन बरीच वर्षे झाली होती. पेन्शन चालू होती. खाणारी दोघेच असल्याने पैशांची कमी नव्हती. पण या वृद्धावस्थेत जवळ कोणीच नव्हते. अाम्हा दोघांपैकी एकटे कोणी गेले तर, दुसऱ्याचे काय हा विचार दोघांनाही सतावत होता.
अापली जबाबदारी अापणच घ्यायची. पण, वय वाढल्याने मनात येणारी मृत्यूची जाणीव दोघांना बेचैन करीत असे. पहिला मृत्यू कोणाचा होणार अाणि मागे राहणाऱ्याचे कसे होणार, या विचारांत दोघेही बुडून जात. अाता बसल्या जागेवरून रखमाबाई नवऱ्याकडे पहात होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील पडलेल्या सुरकुत्या पांढरे सफेद भुरभुरणारे केस, चष्म्याच्या काचेतून समुद्राच्या पाण्याकडे लागलेले डोळे. हे सारे पहात असताना नवऱ्यापूर्वी अापला मृत्यू झाला तर यांचे कसे होईल, याची चिंता त्या करू लागल्या. यांचे मन इतके हळवे की, साध्या गोष्टींतही डोळ्यांतून अश्रू पाझरतात. कसे व्हायचे यांचे? मी अाधी गेले तर हा माणूस सैरभैर होईल. मी नसताना हे कसे जगतील? त्यापेक्षा माझ्या अाधी यांचा मृत्यू झाला तर. उत्तम. मला सौभाग्यवतीचेच मरण हवे अाहे, हे खरे. पण, माझ्यानंतर यांना होणारे दु:ख, वेदना, सोसावे लागणारे हाल याचा विचार करता माझा मृत्यूनंतर येणेच योग्य.
त्यांच्या डोक्यात विचार आला, मी असे बोलले तर लोक म्हणतील, काय स्वार्थी बाई अाहे. जगण्याची केवढी लालसा. पण, मला नाही तसं वाटत. मला नवऱ्याला मी गेल्यावर होणारे दु:ख नाही द्यावयाचे. शिवाय तब्येतीचीही काळजी घेणे त्यांना नाही जमणार. मी त्यांच्या शिवाय जगेन. ते शक्य नसले तरी मृत्यूपर्यंत जगावेच लागेल. नवऱ्यासाठी जगेन, सारे सहन करीत. न रडता.
विठ्ठलरावांनी सहज पत्नीकडे पाहिले. ती कसल्यातरी विचारात गढून गेल्याचे त्यांच्या ध्यानी अाले. त्यांच्याही मनात विचार आले, अापला प्रथम मृत्यू झाला तर पत्नीचे कसे होईल? कोण सांभाळील तिला. तिला कोण अौषधे अाणून देईल. तिला या समुद्रकिनाऱ्यावर कोण अाणील? अाणि कदाचित ती आधी गेली तर माझे कोण करील? मला वेळेवर अौषधे कोण देईल? ती अगोदर गेली तर माझ्या जगण्याला अर्थच राहणार नाही. मी तिच्याशिवाय जगूच शकणार नाही. तिच्या अस्तित्वाशिवाय मी अपूर्ण अाहे. मी निराधार होईन. अपंग होईन. खरे पहाता मी तिच्यासाठी काहीच करत नाही. ती मात्र माझे सारे करत असते. तिचे माझ्या वाचून काहीच अडणार नाही. पण ती नसेल तर माझे मात्र सारेच अडणार अाहे. जीवनच सारे गोठून जाईल. दोघांना बरोबरच मरण अाले तर खूपच छान होईल. पण तसे होतच नसते.
विठ्ठलरावांच्या विचारात एकदम बदल झाला. अाम्ही दोघांनी अात्महत्या केली तर? रात्री दोघांनी एकदमच गळफास घेतला तर दोघांचा मृत्यू होईल अाणि पुढे होणारे दुसऱ्याचे दु:ख व हाल नाही होणार. हा अात्महत्येचा विचार मनात येताच विठ्ठलरावांना किनाऱ्यावर वाऱ्याच्या झोतातही घाम फुटला. त्यांनी प्रयत्न करून तो विचार मनातून बाजूला काढला. अापण किती स्वार्थी अाहोत. मरणातही स्वार्थ पाहतो. त्यांनी पत्नीकडे पाहिले. ती उठण्याचा प्रयत्न करीत होती. बराच वेळ बसून राहिल्याने तिच्या कंबरेत दुखत होतं असावं. तिला अाधाराची गरज होती.
विठ्ठलराव दगडाच्या एका उंचवट्याला धरून उठले अाणि पत्नीला म्हणाले, अगं मी अाहे ना. माझ्या हाताला पकड. तुला अाधाराची गरज अाहे. दोघेही उठले अाणि एकमेकांचा हात पकडून हळूहळू रेतीतून चालू लागले. चालता चालता गोष्टीत रंगूनही गेले.
पत्नी म्हणाली, मी पहात होते मघापासून. कसला विचार चालला होता. तुम्ही एकटक समुद्राकडे पहात होता.
अगं, सारखा विचार येत होता. माझ्या पूर्वी तुझा मृत्यू झाला तर, मी एक कसा जगेन? तुझ्या शिवाय मला जगणे शक्य नाही. माझी अौषधे मला वेळेवर कोण देईल? अाणि तुझ्या पूर्वी माझा मृत्यू झाला तर तुला कोण पाहिल?
माझी तुम्ही नका हो काळजी करू. तुम्हाला मी एकटं नाही सोडणार. मी येईन तुमच्यामागे. अहो स्वर्गात रंभा, ऊर्वशी, मेनका असतात. स्वर्गात गेल्यावर त्या तुम्हालाही भुलवतील. मी नाही तुम्हाला त्यांच्यात एकटं सोडणार. मी तुमची धर्मपत्नी अाहे. मृत्यनंतरही मी तुम्हाला एकटे नाही सोडणार. सांगून ठेवते. सात जन्म तुमच्याबरोबर असेन. सुखात अाणि दु:खातही. विठ्ठलरावांनी तिचा हात हातात घट्ट धरला अाणि हासत तिच्याबरोबर चालू लागले. उद्या पुन्हा किनाऱ्यावर येण्याचे वचन देत.
(लेखक कथाकार, कवी आहेत.)