शेख अमीर : किंग ऑफ मिमिक्री

कलाकार

Story: इजिदोर डांटस |
15th December 2018, 10:00 am
शेख अमीर : किंग ऑफ मिमिक्री


-
शेख अमीर यांनी किंग आॅफ मिमिक्री म्हणून नाव कमावले आहे. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९६१ रोजी करंझाळे येथे झाला. जाॅन एफ. या तियात्रिस्तासोबत ते तियात्र पहायला जात. कालांतराने त्यांना तियात्राची ओढ लागली. मराठी नाटके वर्षाला कधीतरी व्हायची. त्यामुळे आपली कला दाखवायला मिळत नाही. त्यामुळे त्यांनी तियात्रात प्रवेश केला.
जाॅन एफ. यांच्या शिफारसीने प्रेमानंद सांगोडकर यांच्या तियात्रात त्यांनी सुरूवात केली. त्याचे नाव ‘वाट चुकली’ होते. त्यात त्यांनी ‘काताकुतू’ हे कांतार सादर केले. जे त्यांना ‘वन्स मोअर’ मुळे सात वेळा गावे लागले. नंतर प्रेमानंद यांच्या सर्व तियात्रांमध्ये त्यांनी भाग घेतला. जाॅन क्लारा यांच्या ‘विंगळी नाचपीण’ आणि ‘सिव्हील काजार’ यात अमीर यांनी काम केले.
सर्गेस्त फादर फ्रेडी दा काॅस्ता यांनी अमीर यांना एदुआर्द फालेरोंची नक्कल करताना पाहिले. त्यांनी त्यांना मिमिक्री करायला प्रोत्साहन दिले. आपल्या ‘ऊठ गोंयकार, खाता पिता देव दिता, गोंयचो आवाज’ या तियात्रांमध्ये कामही दिले. नंतर ओल्गा यांच्या ‘चिमटी भर सांबाळ, हें झाड दुडवांचें’, मारियो मिनेझिस यांच्या ‘घराब्यांचे वांटे’ आणि ‘ही मांय कोणाची’ तियात्रात त्यांनी अभिनय केला.
जॉन क्लारो यांच्या ‘तांबडी माती’, विलमिक्स यांच्या ‘चेडूं’ , चुकलेले रस्ते’ कार्लुस फर्नांडिस यांच्या ‘आपसुवार्थी’ तियात्रांत अमीर यांनी काम केले आहे. कायतान परेरा यांच्या ‘घात’ या व्हिडिओ चित्रपटातील ते चमकले आहेत. कलाकार, गायक व विनोदवीर म्हणू्न कला अकादमीचे अनेक पुरस्कार अमीर यांनी पटकावले आहेत. मुंबई, पुणे, बेंगळुरू, दिल्ली, कुवेट, दुबई, यु. के. येथे त्यांनी तियात्रांमध्ये काम केले आहे. प्रसिद्ध गायक, अभिनेते स्व. जासिंत वाज यांच्याकडून अमीर कोकणी गीते कशी लिहायची ते शिकले आहेत.
मिमिक्री करण्यात अमीर जास्त प्रसिद्ध आहेत. ते सुमारे ४२ व्यक्तींची नक्कल करतात. त्यात राहुल गांधी, चर्चिल आलेमांव, जासिंत वाज, मिंगेल रॉड, एच. ब्रिटन, विल्मिक्स, यंग चिको, मार्सेलिन दे बेती, लॉर्ना, एम. बॉयर यांचा समावेश आहे. लक्ष्मीकांत पार्सेकराची नक्कल तर सर्वांत चांगली करतात. विशेष म्हणजे कोकणी तियात्र रंगभूमीवरील ते एकमेव मुस्लिम कलाकार आहेत.
तियात्रांमध्ये शेख अमीर गेली २५ वर्षे आहेत. मिमिक्री किंग शेख अमीर या त्यांच्या सीडीत १० कांतारे आहेत. त्यांचे लेखन, गायन त्यांनी केले आहेत. त्यांनी ‘बाय जुवान’ हा एकमेव तियात्र लिहून दिग्दर्शित केला आहे. ‘आपसुवार्थी’ हे तियात्र २५ ठिकाणी झाले. त्यात २४ वेळा अमीर यांनी दारुड्याच्या भूमिकेसाठी पुरस्कार पटकावला आहे. एके ठिकाणी त्यांना तो देण्यात आला नाही. कारण ते दारू पिऊन आले आहेत, असा लोकांचा समज झाला. वास्तवात अमीर दारू पीत नाहीत. तियात्राला १२५ वर्षे झाली, तेव्हा तसेच कुवेट, कांदोळी येथे त्यांचा सत्कार झाला आहे.
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)