सौ सुनारकी तो एक...

परामर्श

Story: दीपक लाड |
15th December 2018, 09:48 am
सौ सुनारकी तो एक...

गुजरातच्या परीक्षेत नापास आणि कर्नाटकांतल्या परीक्षेत काठावर पास झालेला पप्पू मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानच्या परीक्षेत विशेष योग्यतेने पास झाल्यावर मोदींसकट भाजपच्या अनेक ‘मास्तरां’ ना धक्का बसणे साहजिक आहे. राहूल गांधी बावळट आहे. त्याला राजकारण झेपणार नाही, मोदींसारख्या महामेरुसमोर त्याची धडगत नाही. तो टिकणार नाही, अशी टीका, निंदा जाहीर सभांत आणि टीव्हीवरील वादविवादांत करण्यात भाजपच्या धेडांमध्ये चढाओढ लागायची. त्यात सत्ता पक्षाच्या मांडीवर खेळणारे अँकरही त्याची टर उडवण्याच्या चढाओढीत हिरीरीने भाग घ्यायचे.
हिंदी भाषेतील ‘सौ सुनारकी तो एक लुहारकी’ या उक्तीनुसार ११ डिसेंबरच्या एकाच दिवशी तीन राज्यांतील विजयाच्या रुपांत राहुलने या सगळ्या टीकाकारांना रट्टा हाणत तोंडघशीच पाडले. मोदींच्या तुलनेत तो फारच अपरिपक्व असल्याची दर्पोक्ती भाजपातील मोदींच्या अंधभक्तवर्गाकडून सतत केली जायची. पण, कॉग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडून एक वर्ष होते न होते तोच आपली धमक त्याने दाखवून दिली.
श्रेय हिरावू नका
उत्तरप्रदेश, छत्तीसगड सारख्या राज्यांत भाजप गेले दीड दशक सत्तेत असल्यामुळे कंटाळलेल्या मतदारांनी काँग्रेसच्या झोळीत मते टाकली, म्हणून काँग्रेसचे आयतेच फावले म्हणत राहुलचे श्रेय हिरावून घेणे सर्वथा अन्यायकारक ठरेल. आतापर्यंत मोदीनीं प्रचार करून निवडणुका जिंकलेल्या राज्यांत ‘स्टार प्रचारक’ म्हणून मोदींना श्रेय मिळत असे आणि कॉग्रेसच्या अपयशाचे खापर राहुलच्या डोक्यावर फोडले जात असे. आता या तिन्ही राज्यांत मोदींनी मोठ्या दिमाखात प्रचारसभा करूनही मार खाल्ल्यावर दोष पक्षाच्या स्थानिक संघटनांच्या माथी मारला जात आहे. काँग्रेसच्या यशाचे श्रेय राहुलला देण्याचा मनाचा मोठेपणा एकही विरोधक दाखवत नसल्याचे दिसते.
एकट्याने घेतला समाचार
मोदी, शहा, शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे, रमण सिंह, आदित्यनाथ सारख्या भाजपच्या अतिरथी- महारथींनीं जाहीर सभांतून केलेल्या चौफेर आरोपांना सामोरा जात राहुल एकटाच त्यांचा समाचार घेत होता. भाजपने सवयीनुसार राममंदिर मुद्द्याला हवा दिली होती. योगींनी मतांसाठी रामभक्त हनुमानाच्या जातीचा उलगडा केला. मोदींनी काँग्रेसवाल्यांना ‘शहरी नक्षली’ ठरवून टाकले. काँग्रेसचे ‘आगुस्ता वेस्टलेंड’ मधील कथित भ्रष्टाचारात संगनमत दाखवून देण्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेल्या ख्रिश्चन मिशेल या दलालाला युएईतून धरून आणला. त्याला आणल्याने गांधी कुटुंब हादरले असल्याचे मोदींनी प्रचारसभेत सांगितले. या चौफेर हल्ल्यांना एकट्या राहुलला सामोरे जावे लागले.
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार काँग्रेसतर्फे जाहीर केले गेले नव्हते. तीनही राज्यांचे ओझे राहुलच्या खांद्यावर होते. विवादास्पद विधानांमुळे पक्षाचे नुकसान व्हायला नको याची खबरदारी घेत दिग्विजयसिंह सारख्या नेत्यांना प्रचाराच्या धुमश्चक्रीपासून दूर ठेवण्याचा सुज्ञ निर्णय त्यांनी स्वतःच घेतला होता. गटबाजी टाळण्यासाठी सिंदिया- कमलनाथ आणि पायलट - गहलोत या प्रतिस्पर्धी गटांना लांब ठेवत आपण स्वतः पक्षातील काही वरिष्ठांच्या मदतीने या कामांत पुढाकार घेत तिकीटवाटप केले होते. काँग्रेस आपल्या बळावर तीनही राज्यांत स्वबळावर सत्तेत येऊ शकत असल्याचा अंदाज लागताच बसपा, सपाबरोबर जायचा निर्णय बाजूला ठेवत एकटेच लढण्याचा निर्णय घेण्याचे धाडस आणि शहाणपण राहुलने दाखविले.
द्रव्याची कमतरता
पंधरा वर्षांइतका दीर्घ काळ राज्यात सत्तेत नसल्याने राज्यांतील पक्षयंत्रणा चालविण्यासाठी विरोधी पक्षाला मुख्य म्हणजे पैशांची चणचण भासत असते. अशावेळी पैशाच्या जोरावर विरोधकांची यंत्रणा कमकुवत करण्याकडे सत्तापक्षाचा कल असतो. या राज्यांतील खिळखिळ्या झालेल्या, गटबाजीने पोखरलेल्या गंजक्या संघटनांत वंगण घालून त्यांना प्रचारासाठी कार्यरत करण्याचे काम त्याने स्वतः केले. या राज्यात केलेल्या रोड शोमध्ये लोटलेला जनसमुदाय त्याची ग्वाही देत होता. आपल्या उमेदवारांना प्रचारासाठी मुबलक पैसा उपलब्ध करून देण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नव्हती. याउलट केंद्रात आणि राज्यात सत्तेत असल्याने भाजपकडे धनबळ तर होतेच आणि त्याबरोबर सरकारी यंत्रणाही. द्रव्याची कमतरता मोठ्या फरकासह राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये विजय मिळवण्याला आडवी आली.
विशेष म्हणजे मोदींच्या हल्ल्यांवर राहुलने तेवढ्याच आक्रमकतेने प्रतिहल्ले चढवले. काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले असता रफेल विमान खरेदीत झालेल्या भ्रष्टाचारासाठी देशाचा चौकीदार म्हणजे खुद्द मोदींना राहुलने आरोपीच्या पिंजऱ्यांत उभे केले. काँग्रेस हा ‘मुसलमानांचा पक्ष’ असल्याचा बनाव करून हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा डाव स्वतः मंदिरांना भेटी देत आणि आपल्या गोत्राचे दस्तावेज मीडियासमोर मिरवत राहुलने उधळून लावला. बेरोजगारी, घटलेली औद्योगिक उत्पादकता आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे मुद्दे याबाबतच्या अपयशाबद्दल केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरीत त्यांचा खरपूस समाचार घेतला.
परिपक्व झाल्याचे संकेत
विजयानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण सुरवातीच्या काळात मार खाल्यानंतर बरेच काही शिकलो असल्याची प्रांजळ कबुली राहुलने दिली. भाजपच्या विचारप्रणालीविरुध्द आपला लढा असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना हरवण्यासाठी प्रयत्नशील असू, पण ‘भाजपमुक्त भारत’ असा दुराग्रह आपण बाळगणार नसल्याची कोपरखळी त्याने मोदींना मारली. कारण आपण भारत ‘काँग्रेसमुक्त’ करणार असल्याची दर्पोक्ती मोदी जाहीर सभांतून करत होते. विजयानंतर आक्रमकता न दाखवता राहुलने सहज विनम्रतेचे दर्शन घडवत आपण परिपक्व राजकारणी बनलो असल्याचे संकेत दिले.
कालबाह्य होण्याच्या मार्गावर असलेल्या निपचित पडलेल्या पक्षाला संजीवनी देण्याचे काम राहुलनी या विजयाद्वारे केले. तीन राज्यांत सत्ता संपादनामुळे पक्षामध्ये आणि देशाच्या राजकीय पटलावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढली, हे मात्र निश्चित. २०१९ च्या रणधुमाळीत याचा फायदा पक्षाला जरूर होणार आहे. एक म्हणजे पक्षाला या तिन्ही राज्यांतून देणग्या वाढणार असल्याने निवडणुकांना लागणारा पैसा उभा होईल. राज्यात सरकार असल्याने राज्यांतील यंत्रणांचाही फायदा मिळेल. निवडणुका केवळ सहा महिन्यांवर येऊन ठेपल्याने सद्य विजयाची ऊब तोवर टिकेल आणि राज्यात सरकार सत्तेत असल्याने इतर पक्षातील मतदारांचीही सत्तापक्षाकडे रीघ लागणे साहजिक असते.
या यशामुळे हुरळून जाऊन २०१९ मध्ये इतर स्थानिक पक्षांबरोबरच्या आघाडीविषयीच्या वाटाघाटीत हट्टीपणा आणि अरेरावीची भूमिका घेतल्यास भाजपला हरवणे, हे स्वप्नच राहून जाईल याचा विसर राहुलला पडता कामा नये. दोन कट्टर शत्रू असलेले स्पर्धक आघाडी करून खुद्द मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री दिनेश मौर्य यांच्या संसदीय क्षेत्रात कसे जिंकू शकतात, हे उत्तर प्रदेशांत बसपा आणि सपाने उपनिवडणूकांत दाखवून दिले आहे.
सर्वांकडूनच भ्रमनिरास
आता हा सगळा प्रपंच केवळ राहुल परिपक्व झालाय आणि त्याला आता कमी लेखू नये एवढ्यासाठीच. काँग्रेसप्रणीत सरकार राज्यात किंवा केंद्रात आल्यावर जादूच्या छडीने देशाचा कायापालट करतील, या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत. तसे पाहिल्यास देशाचे भले कधीच झाले असते. त्याची आजी इंदिरा आणि वडील राजीव यांच्या वाट्याला ही संधी आली होती. या बाबतीत देशाचा भ्रमनिरास सगळ्याच पक्षांकडून झालाय. २०१४ च्या प्रचारांच्या दरम्यान मोदींची भाषणे ऐकल्यावर वाटायचे की कमीत कमी हा माणूस तरी ‘बोले तैसा चाले’ मुशीतला असणार, पण ‘तो सतत मनकी बात’ सांगणारा बोलघेवडा निघाला. मुद्रा निश्चलीकरण आणि त्यापाठोपाठ जीएसटीने घातलेल्या सावळ्या गोंधळाने देशातील उद्योगधंद्यांचे कंबरडेच मोडले. निश्चलीकरणातून अपेक्षेनुसार काळा पैसा आलाच नाही. आता देशाच्या आर्थिक ताळेबंदातील तूट भरून काढण्यासाठी आणि सरकारी बँकात भांडवल ओतण्यासाठी लागणारा पैसा रिझर्व बँकेच्या गंगाजळीतून उठविण्याची इच्छा सरकार बाळगून आहे. विरोध करणाऱ्या गव्हर्नरची गच्छंती झाल्यावर मनाजोगत्या माणसाची तिथे वर्णी लावल्यावर पैसा उचलण्याचा मार्ग मोकळा होईल.
त्यामुळे राहुल काय किंवा मोदी काय, सत्तेच्या हव्यासापोटी प्रचाराच्या दरम्यान होणाऱ्या हाणामाऱ्या, शिव्याशाप, सर्व्हे, मतमोजणीचा मीडियातर्फे दिवस रात्र चालवला जाणारा तमाशा संपून एकदाचे सरकार स्थापन झाले की मग ये रे माझ्या मागल्या. सगळे एकाच माळेचे मणी!
(लेखक मुक्त स्तंभलेखक आहेत.)