नको ही घुसमट, हवी मला मोकळीक!

राज-कथा

Story: संजय ढवळीकर |
15th December 2018, 09:47 am
नको ही घुसमट, हवी मला मोकळीक!


................................
असा जबरदस्त धक्का कमलाक्षदादांना कोणी दिला नव्हता. ज्या चार मंत्र्यांनी आधी पक्ष सोडला होता, ते पक्षाशी एकनिष्ठ नव्हतेच. कमलाक्षदादांशीही त्यांना काही देणेघेणे नव्हते. ते केवळ सत्तेला चिकटलेले मुंगळे होते. पण जगन्नाथ काकोडेंची गोष्ट वेगळी होती. मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे स्थान भूषवणाऱ्या आणि कमलाक्षदादांशी भावनिक नाते असलेल्या जगन्नाथ काकोडेंनी ऐन कसोटीच्या क्षणी आपल्या मित्रासमान नेत्याला एकाकी सोडून विरोधकांच्या कळपात उडी मारली, तेव्हा कमलाक्षदादांना बसलेला धक्का राजकीय कमी आणि भावनिक जास्त होता.
‘‘भारतीय राष्ट्रहित पक्षात नेहमीच माझी घुसमट व्हायची. पक्षाच्या कोअर वर्तुळात मला कधी प्रवेश दिला नाही. एकनिष्ठ राहिलो तरी धोरणात्मक नियोजनात सहभागी व्हायची संधी त्यांनी दिली नाही. त्यापेक्षा मला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अधिक खुल्या मनाचा वाटतो, म्हणून मी हे पक्षांतर केलं.’’ भारतीय राष्ट्रहित पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काकोडेंनी मडगावात रात्री जमलेल्या काही पत्रकारांशी बोलताना आपल्या निर्णयामागील कारणमीमांसा जाहीर केली.
भारतीय राष्ट्रहित पक्षात काकोडेंच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली. एक म्हणजे त्यांनी कमलाक्षदादांचा विश्वासघात केला. कार्यक्षमतेने चालू असलेल्या त्यांच्या सरकारात काकोडे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. चार मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे सरकार अडचणीत आले असले तरी कोसळले नसते. अशा परिस्थितीत आपल्या मित्राबरोबर ठामपणे उभे राहण्याऐवजी त्यांनी दगाबाजी करण्याचा असा निर्णय घ्यावा याचा पक्षकार्यकर्त्यांना राग आला होता.
‘‘माझं मूळ राष्ट्रीय काँग्रेस पक्षातच आहे. भारतीय राष्ट्रहित पक्षाने मला उमेदवारी दिली, आमदार बनवले, मंत्रिपदी बसवले खरे. पण त्यांनी मला आपला कधी मानला नाही. त्यामुळे तिथं कोणाशी मन मोकळं करता आलं नाही. सतत घुसमट व्हायची. आता माेकळ्या वातावरणात आल्यावर मला छान वाटतंय.’’ काकोडेंनी दोन्ही पक्षांच्या कार्यपद्धतींतील फरक पत्रकारांपाशी आपल्या परीने विशद केला.
रात्री उशिराच काकोडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे, आमदारकीचा राजीनामा विधानसभेच्या सभापतींकडे आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठवून दिला होता. मध्यरात्रीनंतर ही बातमी भारतीय राष्ट्रहित पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत समजली. सकाळपर्यंत संपूर्ण राज्यात ही बातमी पोहोचली. कमलाक्षदादांशी एकनिष्ठ असलेले शेकडाे पक्षकार्यकर्ते रागाने चवताळून काकोडेंच्या मडगावातील घरासमोर जमले. परिस्थितीचे गांभीर्य वाढत असल्याने संरक्षणासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.
काकोडेंच्या राजीनाम्याने गोव्याच्या राजकारणात हलकल्लोळ निर्माण केला होता. ईरमांव मेंडोन्सा, चिको सापेको, महादेव शिरवळकर आणि अंतोनियो फोन्सेका या चार मंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी कमलाक्षदादांच्या सरकारातून राजीनामे देत पक्षाचे सदस्यत्वही सोडले होते. त्याआधीच्या काही दिवसांत त्यांची पावले त्या दिशेने पडत होती, त्यामुळे त्यांच्या या राजकारणाचा बऱ्यापैकी अंदाज सगळ्यांनाच आला होता. तरी बहुमत हातात असल्यामुळे सरकारला धोका निर्माण होत नव्हता. त्यामुळे आणीबाणीची उपापयोजना करण्याची आताच आवश्यकता नाही असे भारतीय राष्ट्रहित पक्षाच्या केंद्रीय समितीचे मत होते.
हे चौघेही जण नाही तरी मुळात वेगवेगळ्या राजकीय पार्श्वभूमीतून आलेले नेते होते. गुळाच्या ढेपेला जसे सहज मुुंगळे येऊन चिकटतात तसे विविध राजकीय पक्षांतून आलेले हे मुंगळे सत्तेत असलेल्या भारतीय राष्ट्रहित पक्षाला चिकटले होते. मात्र तिथली राजकीय संस्कृती आणि कारभार आपल्याला मानवणारा नाही हे दोनेक वर्षांत त्यांच्या लक्षात आले. त्याबरोबर त्यांनी इतरत्र सोयरिक जुळवण्यास प्रारंभ केला. मेंडोन्सा, शिरवळकर आणि फोन्सेका राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गेले. तर राष्ट्रप्रेमी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामराव पाटील यांच्या संपर्कातून चिको सापेको त्या पक्षाचे सदस्य बनले.
चार मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही भारतीय राष्ट्रहित पक्षाच्या सरकारकडे म्हणजेच मुख्यमंत्री कमलाक्षदादांकडे एका आमदाराचे बळ अधिक असल्यामुळे सरकार सुरक्षित हाेते. इतर सारे आमदार पक्षाच्या गाभ्याशी जोडले गेले असल्यामुळे त्यातील कोणी फुटणार नाही अशी पक्षनेत्यांना खात्री होती. जगन्नाथ काकोडे तसे पक्षाच्या गाभ्याशी संबंधित नव्हते, ते मुळात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य. कमलाक्षदादांनी आपला पक्ष दक्षिण गोव्यात वाढवण्याच्या दृष्टीकाेनातून त्यांना आपल्यापाशी ओढले होते. काकोडेंना भारतीय राष्ट्रहित पक्षाने मानसन्मान दिला आणि कमलाक्षदादांशी जुळलेल्या मैत्रीमुळे काकोडेही त्या पक्षाशी एकरुप झाले आहेत असे सर्वांनाच वाटत होते.
आणि अशा वेळी जगन्नाथ काकोडेंनी भारतीय राष्ट्रहित पक्षाला रामराम ठोकण्याचा अचानक निर्णय घेतला. ही बातमी समजताच कमलाक्षदादा आणि पक्षाचे महत्वपूर्ण नेेते तातडीने पणजीतून मडगावात जायला निघाले. परंतु मडगावात दाखल होऊनही त्यांचा काकोडेंशी संपर्क होईना. काकोडेंचा थांगपत्ता लागेना. गुप्तचर पोलिसांना कामाला लावूनही काकोडे संपर्काच्या कक्षेत येईनात.
तोपर्यंत सकाळ झाली होती. काकोडेंच्या घरासमोर एकेक करून समर्थक आणि विरोधक अशा परस्परविरोधी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. त्या गर्दीत आपण गेलो तर मुख्यमंत्री या नात्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आपली जबाबदारी असताना आपणच दंगलीला प्रोत्साहन दिले असे होईल असा विचार करून कमलाक्षदादा आपल्या सहकाऱ्यांसह पणजीत परतले.
एव्हाना राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले होते. जगन्नाथ काकोडेंच्या राजीनाम्याआधी भारतीय राष्ट्रहित पक्षाच्या सरकारकडे जे एका सदस्याचे बहुमत होते, ते चित्र त्यांच्या राजीनाम्यानंतर पालटले. अर्थात काकोडे आणि इतर चार मंत्र्यांनी पक्ष बदलण्यासाठी पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदींनुसार राजीनामे दिले होते, पोटनिवडणुकीतून पुन्हा निवडून आल्यानंतरच त्यांना विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होता आले असते. यामुळे सत्ताधारी बाजूचा एक आमदार कमी झाला तरी त्यामुळे विरोधकांच्या आमदारसंख्येत एकाने वाढ झाली नाही. दोन्ही बाजूंचे संख्याबळ समान झाले.
परंतु अशा परिस्थितीत विधानसभेत मतदान घ्यावे लागले असते तर त्याचा फटका सरकारलाच बसला असता. कारण सत्ताधारी बाजूचा म्हणजेच भारतीय राष्ट्रहित पक्षाचा एक आमदार सभापती पदावर होता. त्यामुळे मतदानावेळी त्यांचे एक मत कमी झाले असते आणि विरोधातील राष्ट्रीय काँग्रेसची बाजू वरचढ ठरली असती. जगन्नाथ काकोडेंनी बाजू बदलून कमलाक्षदादांना केवळ भावनिक धक्का दिला नव्हता, तर सरकारच अल्पमतात आणून दाखवले होते!
वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रहित पक्षाचा पराभव होऊन राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार दिल्लीत सत्तेत आले होते. दिल्लीचे छत्र गेले तरी कमलाक्षदादांनी केंद्र सरकारला भीक न घालता गोव्यात नेटाने आपले सरकार चालवले होते. त्यामुळे दिल्लीतील राष्ट्रीय काँग्रेसचे नेते कमलाक्षदादांवर डूख धरून संधीची वाट बघत होते. ईरमांव मेंडोन्सा, चिको सापेको, महादेव शिरवळकर आणि अंतोनियो फोन्सेका या चार मंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला तेव्हाच दिल्लीकर सरसावून बसले होते.
दिल्लीतील हायकमांडच्या इशाऱ्यावरूनच गोव्यातील नेत्यांनी जगन्नाथ काकोडेंना मुख्यमंत्रिपदाचे आमिष दाखवून आपल्या पक्षात ओढण्याचा बेत आखला. हा बेत तडीस नेण्यासाठी त्यांनी काकोडेंचे बालपणापासूनचे मित्र आणि बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक भागीदार शिवा प्रभाकर नायक यांना हाताशी धरले. शिवा प्रभाकर नायक यांचे कमलाक्षदादा केरकरांकडे कायमचे वैमनस्य. शिवाय वैचारिकदृष्ट्या त्यांचा भारतीय राष्ट्रहित पक्षाला ठाम विरोध. राष्ट्रीय काँग्रेसला नेहमीच मदत करण्यास तयार असलेल्या शिवा नायक यांनी जगन्नाथ काकोडेंची भेट घेऊन त्यांना राजकीय उडी मारण्यासाठी राजी केले.
‘‘जगन्नाथ, या मोहिमेला दिल्लीतून आशीर्वाद आहे. आपले काहीही नुकसान होणार नाही, उलट राष्ट्रीय काँग्रेसचे सरकार सत्तेत आणता येईल. पुन्हा निवडून अाल्यानंतर तुला थेट मुख्यमंत्री बनवण्याची हमी ते देताहेत. भारतीय राष्ट्रहित पक्षात तुला ही संधी कधीच मिळणार नाही. सोड तो पक्ष आणि ये माझ्याबरोबर. ऐक माझे...’’ शिवा नायकांचे हे म्हणणे काकोडेंना पटले. राजकारणाबरोबरच व्यावसायिक स्वार्थही यातून साधला जात होता.
शिवा प्रभाकर नायकांच्या घरी झालेल्या त्या बैठकीत हा बेत ठरला. काकोडेंकडून हिरवा कंदील मिळाला असल्याचा निरोप शिवा नायकांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना दिला. त्याबरोबर पुढील घटनांनी वेग घेतला.
आधी ईरमांव मेंडोन्सा, चिको सापेको, महादेव शिरवळकर आणि अंतोनियो फोन्सेका या चार मंत्र्यांनी राजीनामे देऊन भारतीय राष्ट्रहित पक्षातून बाहेर पडावे. तरी कमलाक्षदादा हार मानणाऱ्यांतील नसल्याने राजीनामा देणार नाहीत. त्यांना काहीच थांग लागू न देता दोन दिवसांनंतर जगन्नाथ काकोडेंनी राजीनाम्याचे अस्त्र काढावे. काकोडेंनी धक्का दिला की कमलाक्षदादांचे नैतिक अवसान गळेल आणि त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावाच लागेल, असे धाेरण ठरले.
एरवी मंत्रालयातून निघून मडगावात घरी जाताना कमलाक्षदादांकडे एक चक्कर मारून जाणारे काकोडे त्या दिवशी आपल्या केबिनमधून बाहेर पडून थेट गाडीत बसून मडगावकडे निघाले. आधी शिवा प्रभाकर नायकांच्या घरी गेले. त्यांना घेऊन अापल्या घरी गेले. पुढील बेत तिथूनच पार पाडायचा होता!
‘हा जगन्नाथ आज आपल्याला न भेटताच कसा काय गेला’ अशा विचारात असलेल्या कमलाक्षदादांनी संध्याकाळी उशिरा काकोडेंना फोन लावण्याचे बरेच प्रयत्न केले, पण फोन बंदच. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण तेवढ्यात जगन्नाथ काकोडेंच्या बंडाचीच बातमी येऊन थडकली आणि दादा एकदम सुन्न होऊन डोके हातात धरून बसले.
........................
(लेखक ‘गोवन वार्ता’ चे संपादक आहेत.)
......................
(या कथेतील सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक असून वास्तवाशी त्यांचा कोणताही संबंध नाही.)