सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात २०० रुपयांची नोट

छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठी ठरणार उपयुक्त


23rd August 2017, 07:46 pm
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात २०० रुपयांची नोटभारतीय रिझर्व्ह बॅंक सप्टेंबर महिन्यात २०० रुपयांची नवीन नोट चलनात आणणार असून केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना काढली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या शिफारसीप्रमाणे नवीन २०० रुपयांची नोट उपलब्ध करून देण्यास वित्त मंत्रालयाने अधिसूचनेद्वारे संमती दर्शविली आहे.
गतवर्षात मोदी सरकारने काळ्या पैशाविरोधात ठोस पाऊल उचलताना ५०० व १००० च्या नोटा रद्द ठरवल्या होत्या. निश्चलनीकरणानंतर नवीन ५०० रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती. त्याचबरोबर नवीन २००० रुपयांची नोटही बाजारात उपलब्ध करण्यात आली होती. परंतु २००० नोटेमुळे अनेक ठिकाणी नागरिकांना व्यवहारात अडचणी येत होत्या. त्यामुळेच रोकडसुलभतेसाठी सरकारने नवीन २०० रुपयांची व ५० रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला.
सूत्राच्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन २०० रुपयांची नोट बाजारात उपलब्ध होणार आहे. एटीएम मशीनमध्ये बसेल याचा विचार करूनच नव्या नोटीचा आकार निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठी नवीन २०० रूपायांची नोट सहजपणे उपलब्ध होणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.