बालसंगोपन व पाल्यांची वेशभूषा

शर्टची बटणे लावणे, काढणे, पायात बुट-मोजे चढवणे, काढणे, शर्ट, विजार घडी करून, बूट, मोजे काढून योग्य त्या जागी ठेवणे यासारख्या गोष्टी पालकांनी मुलांना शिकवल्या तर त्यांना योग्य ते वळण लागते. अंगी व्यवस्थितपणा येतो. बाल्यावस्थेत हे शिक्षण महत्त्वाचे असते.

Story: ज्ञान सरिता | प्रा. सुरेंद्र वसंत सिरस� |
11th December 2018, 06:00 am

एखाद्या कुटुंबात बाळ जन्माला येणार, याची चाहुल लागली की, बाळाची माता त्याच्यासाठी कपड्यांची तयारी करायच्या कामाला लागते. थंडी-वाऱ्यापासून त्याचे संरक्षण व्हावे, यासाठी मऊशार, मुलायम, उबदार असे कपडे एकतर घरात तयार केले जातात किंवा बाजारातून विकत आणले जातात. एक काळ असा होता की, बाळाची आई लोकर आणून कपडे विणायची किंवा घरातील शिलाई यंत्रावर बाळासाठी कपडे शिवायची. जुन्या काळात स्त्रियांनी शिवणकला शिकून घेणे गरजेचे होते. आधुनिक युगात माणसाची जीवनशैली बदलली आहे. त्याचं जीवन धावपळीचं आणि धकाधकीचं बनलं आहे. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने तो बहुतेक वेळ घराबाहेर असतो. आज सुशिक्षित महिलाही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नोकरी-व्यवसायात व्यस्त असतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती सुस्थितीत आहे, अशा बाळाचे आईवडील बाजारातून किमती कपडे विकत घेतात. बाजारात विविध आकारांचे, कृत्रिम धाग्यांचे तयार केलेले कपडे मिळतात. कृत्रिम धाग्यांचे कपडे बाळाच्या आरोग्याला व त्वचेला अपायकारक होऊ शकतात. त्यासाठी सुती, सैलसर वजनाने हलके असे कपडे बाळासाठी खरेदी करणे योग्य असते. ऋतुमानानुसार बाळाच्या कपड्यांमध्येही फरक झाला पाहिजे. उन्हाळ्यात पातळ व सुती कपडे तर हिंवाळ्यात किंवा पावसाळ्यात जाड व लोकरीचे कपडे वापरणे योग्य असते. बाळाची शारीरिक वाढ लक्षात घेऊन योग्य त्या आकाराचे कपडे वापरणे ​अधिक सोयिस्कर असते.
मुलं वयानं वाढू लागली, चालू बोलू लागली की, आपल्या कपड्यांबद्दल त्यांच्या आवडी निवडी तयार होऊ लागतात. वडीलधाऱ्यांच्या आवडी-निवडीपेक्षा त्यांना स्वत:ची निवड अधिक योग्य वाटते. मुलं अनुकरणप्रिय असतात. त्यांना आपल्या मित्र-मैत्रिणीसारखे कपडे हवे असतात. मुली तर कपड्याच्या बाबतीत जास्तच चोखंदळ असतात. आपल्या आवडीच्या कपड्यांसाठी मुलं पालकांकडे हट्ट धरतात. अशावेळी पालकांनी मुलांच्या आवडी-निवडींना योग्य दिशा दाखवत त्यांचा हट्टीपणा मोडून काढला पाहिजे.
एक अत्यंत महत्त्वाची बाब पालकांनी लक्षात ठेवणे फार फार गरजेचे आहे. काही दांपत्यांना मुलगाच हवा असतो. पण जन्माला येते मुलगी. काहींना मुलगी हवी असते. त्यांना होतो मुलगा! ज्यांना मुलगी हवी असते आणि होतो मुलगा, तेव्हा मुलाचे पालक त्यांना बालपणात मुलीला शोभतील असे फ्रॉक, झबली यासारखे कपडे घालतात. सातत्याने मुलाला मुलीचे कपडे घातले तर त्याच्या मनोवृत्तीत बायकीपणा येतो, असं जाणकारांकडून सांगितलं जातं. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला ही प्रवृत्ती घातक असते. काही पालक मुलींना मुलांचे कपडे घालतात. परिणामी मुली मुलांप्रमाणे बोलतात, वागतात. मुलींचं वय जसं जसं वाढत जातं तसं मुलींच्या मनोवृत्तीतील हा पुरुषीपणा अधिकाधिक तीव्र बनत जातो. त्यामुळे पालकांनी मुलगी सात आठ वर्षाची झाली की तिच्या पेहरावात योग्य तो बदल घडवून आणला पाहिजे. मुलीच्या रंगरुपाला शोभेल असे कपडे पालकांनी मुलीसाठी घेणे गरजेचे आहे.
मुलांच्या कपड्यांबाबत पालकांनी फारशी काळजी करण्याची गरज नसते. बुशशर्ट, शर्ट, पँट, विजार मिळाली की मुलांची वेशभूषा पूर्ण होते. पायात घालण्यासाठी चपला, शूज मिळाले की, त्याचं भागतं. आपले कपडे धुण्यापासून इस्त्री करीपर्यंत मुले सारे काम आपणच करतात. एक गोष्ट खरी की, मुलांनाही कपड्याची अभिरुची असते आणि नीटनेटके राहणेही आवडते. परंतु वाढत्या वयाबरोबर मुलींच्या आवडी-निवडी मात्र अधिक जिकिरीच्या होत असतात. त्यांनी नवीन आणि अद्ययावत पद्धतीचे कपडे हवे असतात. त्यासाठी त्या पालकांकडे हट्ट धरतात. माफक प्रमाणात त्यांची इच्छापूर्ती करण्यात काही गैर नसले तरी मुलींना त्याची सवय लागू देता कामा नये.
पालकांनी आणखी एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे की, मुले बालपणापासून महत्त्वाकांक्षी असतात. विशिष्ट प्रकारच्या कपड्यांमुळे त्यांच्यामधील महत्त्वाकांक्षा विकसित करण्यात मदत होत असते. मुलांना नवे व विविध प्रकारचे कपडे वापरायला आवडतात. काही मुलांना सैन्यातील, नौदलातील अधिकाऱ्यांचा, नर्स-डॉक्टरचा पेहराव आवडतो. त्यावरून भविष्यात त्यांना कोण बनायचं आहे, याची झलक मिळते.
मुलांच्या कपड्यांच्या आवडीवरून पालकांना त्यांची महत्त्वाकांक्षा जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य ती दिशा दाखवता येते. त्यांच्या ‘कारक’ विकासालाही चालना देता येते.
मुलं चालू, बोलू लागली की, पालक त्यांना बालक मंदिरात पाठवण्याच्या तयारीला लागतात. सध्या शहरी भागात खासगी व सरकारी बालवाड्या आहेत तर ग्रामीण भागात बहुतेक सरकारी बालवाड्या असतात. सरकारी बालवाड्यांमधून गणवेशाची सक्ती नसली तरी खासगी बालवाड्यातून गणवेशाची सक्ती केलेली असते. या वयात मुलांना कपडे घालणे, काढणे फारसे जमत नसले तरी त्यांना थोडी-थोडी सवय लावली तर मुले पुढे स्वत:हून कपडे घालू-काढू लागतात. काही खासगी इंग्रजी माध्यमाच्या बालक मंदिरातून मुलांच्या गणवेशामध्ये लांडी विजार, शर्ट, शर्टवर नॅक-टाय, बुट-मोजे यांचा समावेश असतो. सरकारी बालवाड्यांमधून पालक आपल्या मुलांना सर्वसामान्य पेहराव घालून पाठवतात. आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी बहुतेक पालकांचा कल आपल्या मुलांना खासगी बालक मंदिरामध्ये पाठवण्याकडे असतो. मुलं बालक मंदिरातून पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊ लागली की, प्रत्येक विद्यालयाचा गणवेश वेगवेगळा असल्याने त्यानुसार मुलांना गणवेश शिवून घ्यावे लागतात. बहुतेक विद्यालयातून आठवीपर्यंतच्या मुलांना लांडी विजार घालावी लागते तर नववी व दहावीच्या मुलांना लांब पँट घालणे सक्तीचे आहे. उच्च माध्यमिक विद्यालयांतूनही मुलांसाठी लांब विजार व मुलींसाठी सलवार कमीज असा गणवेश असतो.
शालेय जीवनात मुलांना बालवीर व वीरबाला यासारखा विषय असतो. मुलांना त्यासाठी खास असा पेहराव शिवून घ्यावा लागतो. बालवीरांच्या डोक्यावर खास टोपीही असते. शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींना छात्रसैनिक विषय निवडला तर त्यांचाही खास असा पेहराव व टोपी असते. रेडक्रॉस विषय घेतलेल्या मुलांनाही विशिष्ट कपडे घालावे लागतात. महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षण घेणाऱ्या युवा-युवतींना गणवेशाची ही बंधनं नसतात. पर्यायानं आपल्या आवडीच्या ​निरनिराळ्या रंगांच्या विविध आकारांच्या कपड्यांचा पेहराव करून महाविद्यालयात किंवा विद्यापीठात जाता येतं.
कपड्यांबरोबरच मुलांच्या केशरचनेकडेही पालकांनी लक्ष दिले पाहिजे. सध्या केशकर्तनालयातून विविध प्रकारची केशरचना केली जाते. चित्र-विचित्र आकार या केशरचनेत केले जातात. त्यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला बाधा येत असते, हे पालकांनी ध्यानी घेतले पाहिजे. पाल्यांच्या बाबतीत पालकांनी एक गोष्ट ध्यानात घेणे फार गरजेचे आहे आणि ती म्हणजे, मुलं जेव्हा बाल्यावस्थेतून तारुण्यात पदार्पण करतात तेव्हा त्यांच्यामध्ये होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांचा आढावा घेत त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करीत योग्य दिशा दाखवणे! हेच ते वय ज्या वयात मुले भिन्नलिंगी मुलांच्या आकर्षणाने विविध प्रकारांचे, आकारांचे, रंगांचे, तंग पेहराव करून महाविद्यालयात, विद्यापीठात जातात. हल्ली मुली तर तंग लांब विजारी, टी शर्टस् घालून वावरतात. शारीरिक ठेवण वगळता अशी मुलं मुलगा की मुलगी हे ओळखणं तसं कठीणच असतं. म्हणूनच बालसंगोपनात कपडे व पेहराव यांना महत्त्व आहे. मुलांना त्यांच्या इच्छेनुसार आणि हवे तेवढे कपडे घेऊन देण्यापेक्षा त्यांना मोजकेच आवश्यक आणि जरुर तेवढेच व उचित असेच कपडे घेऊन दिले पाहिजेत. पेहरावामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात कोणतीही बाधा येणार नाही, याकडेही पालकांनी लक्ष दिले पाहिजे.