संजीवनीला ‘संजीवनी’ची तयारी

प्रशासकांकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाला अनुपालन अहवाल सादर


07th December 2018, 06:24 pm

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : राज्यातील ऊस उत्पादकांसाठी पुढील काही दिवसांत चांगली बातमी मिळू शकते. संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरू होण्याची शक्यता आहे. संजीवनीच्या प्रशासकांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला अनुपालन अहवाल सादर केला असून, कारखान्याला मंडळाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.

संजीवनीचा ४६ वा ऊस गळीत हंगाम अनधिकृतरीत्या सुरू करण्यासाठी कारखान्याचे प्रयत्न सुरू होते. पण अजून काही दिवस केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची वाट पाहावी, असे ठरले आहे. राज्यात ऊस तोडणीला सुरुवात झाली असून, ऊस संजीवनीच्या आवारात दाखलही होत आहे. या सर्व गोष्टींची कल्पना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आली आहे. शिवाय प्रदूषण नियंत्रणासाठी ज्या गोष्टी हव्या होत्या, त्यांचीही पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे कारखाना सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा शुक्रवारपर्यंत आदेश येऊ शकतो. शेतकऱ्यांनी आपले आंदोलनही तत्काळ स्थगित केले असून, येत्या दोन दिवसांत काय घडते, याकडे त्यांचे लक्ष लागून आहे.

कारखाना सुरू करण्याची तयारी पूर्ण

संजीवनीसाठी लागणारे १० कोटी रुपयेही सरकारने मंजूर केले असून, ते हप्त्याहप्त्याने दिले जात आहेत. कारखान्याची यंत्रणा बरीच जुनी झाली असून ती बदलण्यासाठीचा प्रस्तावही सरकारने विचारात घेतला आहे. प्रशासनाने कारखाना सुरू करण्याची पूर्ण तयारी केली असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आदेश मिळताच त्वरित ऊस गाळप सुरू होईल. कारखान्याच्या गोदामात मोठ्या प्रमाणात पडून असलेली साखर विकण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे.

संजीवनी सहकारी साखर कारखान्यात प्रदूषण नियंत्रणासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्या करण्याच्या दृष्टीने प्रशासक दामोदर मोरजकर यांनी अनुपालन अहवाल सादर केला आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी देईल, असे आम्हाला अपेक्षित असल्याचे सहकार निबंधक संजीव गडकर यांनी गुरुवारी सांगितले.