कुठ्ठाळी-वेर्णा रस्ताबंदीचा प्रस्ताव

पणजी-मडगाव अंतर १८ किमीने वाढणार; नववर्षापासून अंमलबजावणी शक्य


07th December 2018, 06:22 pm

विक्रम नायक

गोवन वार्ता

वास्को : राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाच्या कामासाठी कुठ्ठाळी जंक्शन ते वेर्णा येथील शरयू टोयोटा शोरूम दरम्यानचा सुमारे ३.५ किलोमीटर लांबीचा रस्ता सुमारे वर्षभर बंद ठेवण्याच्या प्रस्तावाला सरकारी पातळीवरून मान्यता मिळाल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.

यामुळे कुठ्ठाळीमार्गे पणजी-मडगाव मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या हजारो गाड्यांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इतकेच नव्हे, तर सदर रस्ता बंद करून वाहतूक चिखली-दाबोळी विमानतळ-वेर्णा मार्गे वळविल्यास पणजी-मडगाव प्रवास सुमारे २२ किलोमीटरने वाढणार आहे. याविषयी वाहतूक खात्यातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या एका बैठकीवेळी रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी वाहतूक वळविण्याचा प्रस्ताव मांडला होता. या बैठकीला अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

जुवारी नदीवरील २६ मीटर रुंदीच्या सहापदरी पुलाचा जोडभाग असलेल्या उड्डाण पुलासाठी कुठ्ठाळीपासून वेर्णापर्यंत खांब उभारण्यात आले आहेत. मात्र, खांबादरम्यान गर्डर जोडण्यासाठीच्या कामासाठी हा रस्ता सुमारे वर्षभरासाठी बंद ठेवण्याचा सल्ला कंत्राटदारांनी बैठकीवेळी दिला होता. तसेच पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी या प्रस्तावाची तातडीने अंमलबजावणी करण्याची योजना होती. परंतु, नववर्षानिमित्त गोव्यात वाढणारी पर्यटकांची गर्दी, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन सदर निर्णय नववर्षानंतरच अंमलात आणण्याची सूचना काही खात्यांनी यावेळी केली.

द्राविडी प्राणायाम

जुवारी पुलाचा भाग असलेला कुठ्ठाळी ते वेर्णा दरम्यानचा उड्डाण पूल उभारण्यासाठी या मार्गावर क्रेन व अन्य अवजड यंत्रणा लागणार आहे. पुलाचे गर्डर, सिमेंट स्लॅब व अन्य साहित्याची उचल व ने-आण करण्यासाठी ही यंत्रणा येथे कायम वावरणार आहे. वास्को-पणजी किंवा वास्को-मडगाव असा प्रवास करणाऱ्यांवर याचा विशेष परिणाम होणार नसला, तरीही पणजी-मडगावच्या प्रवाशांना सुमारे वर्षभर द्राविडी प्राणायाम करावा लागणार आहे. पणजी-मडगाव दरम्यान प्रवास करणाऱ्यांना कुठ्ठाळी-रासई-केळशी आदी मार्गांचा पर्याय असला, तरी हे रस्ते अरुंद असल्याने वाहतुकीचा ताण पेलवणे कठीण आहे. अवजड यंत्रांमुळे वेर्णा-ठाणे दरम्यानच्या रस्त्याचा वापर करणेही शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले. कुठ्ठाळी व वेर्णाला जोडणारा शांतादुर्गा मंदिराजवळील रस्ता अरुंद असल्याने तेथून अवजड वाहतुकीला पंचायत व स्थानिकांचा विरोध होणे अपेक्षित आहे. यातील काही रस्ते अगदीच लहान असल्याने एका वेळी दोन वाहने समोरासमोर आल्यास अडचण होऊ शकते. यामुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची अधिक शक्यता आहे.

समांतर रस्ता जमिनीअभावी अडला!

जुवारी पुलासाठी उभारण्यात आलेल्या खांबांवर गर्डर व स्लॅब उभारले जाणार आहेत. यासाठी कायम अवजड यंत्रांची ये-जा सुरू असेल. शिवाय सिमेंट स्लॅबचे वजन लक्षात घेता आसपासच्या भागातून वाहतूक सुरू ठेवणे धोक्याचे आहे. यासाठी कुठ्ठाळी ते वेर्णा दरम्यान समांतर रस्ता (अतिरिक्त लेन) उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु, जमीन उपलब्ध नसल्याने ते शक्य झाले नाही.

वास्कोवर पडणार आणखी ताण

कंत्राटदाराने स्लॅब व गर्डर जोडण्यासाठी एका वर्षाचा अवधी मागितला आहे. त्यामुळे वाहतूक खात्यानेही या भागात अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यासाठी त्यांची संख्या वाढविण्याची मागणी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ वरील प्रत्येक जंक्शनवर नियंत्रण ठेवणे जवळपास अशक्य आहे. सर्व वाहतूक चिखलीमार्गे वळविल्यास वास्को शहरावर अतिरिक्त ताण पडणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर प्रस्ताव मान्य झाल्यास त्याची अंमलबजावणी करणे वाहतूक खात्याला क्रमप्राप्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कुठ्ठाळी-चिखली-दाबोळी-वेर्णा

- पणजी-मडगाव दरम्यानची वाहतूक कुठ्ठाळी येथून चिखली-दाबोळी विमानतळमार्गे वेर्णा

- मडगाव-पणजी वाहतूक वेर्णा येथून दाबोळी विमानतळ-चिखलीमार्गे कुठ्ठाळी अशी वळविण्यात येणार आहे.