महिला पोलिस ठाण्याचे इतरत्र स्थलांतर न केल्यास उपोषण


07th December 2018, 06:11 pm


प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मडगावात सुरू केलेल्या महिला पोलिस ठाण्याचे इतरत्र मोठ्या जागेत स्थलांतर केले नसल्यास १३ डिसेंबरपासून पोलिस ठाण्यासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा ‘बायलांचो एकवोट’च्या अध्यक्षा आवढा व्हिएगश यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत दिला आहे.
दक्षिण गोव्यात महिला पोलिस ठाणे सुरू करण्यासाठी आपण गृह खात्याकडे निवेदनाद्वारे प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर गृह खात्याने आपल्या निवेदनाची दखल घेऊन दक्षिणेत स्वतंत्र महिला पोलिस ठाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला. येथे महिला पोलिस ठाणे सुरू करावे म्हणून एकवेळा आपण उपोषणही केले होते. पोलिस स्थानकात महिला पोलिसांना जागा बरीच अपुरी आहे. अपुऱ्या जागेत महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी वेगळे कक्ष नाहीत. २६ चौरस मीटर्सच्या एकाच खोलीत महिला पोलिस ठाणे सुरू करण्यात आलेले आहे.
यामुळे महिला पोलिस ठाण्याचे इतरत्र मोठ्या जागेत स्थलांतर करण्यासाठी आपण पोलिस खात्याकडे मागणी केली आहे. दोन-अडीच वर्षे उलटली, तरी महिला पोलिस ठाण्याचे स्थलांतर केले जात नाही. जुन्या जिल्हाधिकारी इमारतीत महिला पोलिस ठाणे सुरू करावे, अशी सूचना आपण पोलिस खात्याला केली होती. मडगावच्या पोलिस ठाण्याच्या बाजूला २६ चौरस मीटर्सच्या जागेत महिला पोलिस ठाणे आहे. तर सध्या जुन्या जिल्हाधिकारी इमारतीतील २२ चौरस मीटर्सच्या जागेत महिला पोलिस ठाण्याचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या पोलिस ठाण्याच्या जागेपेक्षा नवीन जागा आणखी कमी आहे. तसेच त्या ठिकाणीही एकच खोली आहे. या अपुऱ्या जागेत पूर्णवेळ महिला पोलिस ठाणे चालविणे महिला पोलीसांना बरेच कठिण होते. यामुळे आपण पोलिस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
दक्षिण गोवा महिला पोलीस ठाण्यासाठी जुन्या जिल्हाधिकारी इमारतीत मोठी जागा देण्यात यावी ही आपली मागणी आहे. पोलीस खात्याने येत्या १८ डिसेंबर पूर्वी महिला पोलीस ठाण्याचे मोठ्या जागेत स्थलांतर करावे. तोपर्यंत आपले उपोषण चालूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.