पटेलांच्या पुतळ्यामुळे गुजरातकडे पर्यटकांचा ओढा

संजय जोशी यांची पत्रकार परिषदेत माहिती


06th December 2018, 06:06 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : गुजरातमध्ये नर्मदेच्या पात्रात उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा जगातील सर्वांत उंच पुतळा आहे. १८२ मीटर उंचीचा हा पुतळा जगातील पर्यटकांचे आकर्षण बनले असल्याने गुजरातच्या पर्यटकांचा तो केंद्रबिंदू ठरला आहे, असे मत ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे मुख्य व्यवस्थापक संजय जोशी यांनी व्यक्त केले.

गुजरातच्या पर्यटन खात्याने आपल्या राज्याच्या पर्यटनाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पणजी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात जोशी बोलत होते. यावेळी गुजरात पर्यटन खात्याचे व्यवस्थापक सनातन पंचोली उपस्थित होते.

पटेल यांच्या पुतळ्यामुळे पर्यटनाबाबत गुजरात जागतिक नकाशावर महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. भविष्यात हे लोकप्रिय पर्यटन स्थळ बनेल. या पुतळ्याने सर्व पर्यटकांचे लक्ष वेधले आहे. पर्यटकांनी येथे भेट द्यावी, यासाठी गुजरात पर्यटन खात्याने आकर्षक पॅकेज तयार केले आहे. त्यामुळे देशीविदेशी पर्यटकांना हा पुतळा व गुजरातचे पर्यटन अनुभवण्याची संधी प्राप्त झाली आहे, असे जोशी यांनी सांगितले. गुजरातमध्ये वन पर्यटन, धार्मिक पर्यटन व अन्य विविध प्रकारच्या पर्यटनासंदर्भात पर्यटकांना आकर्षण वाटत असल्याने २००६ पासून आतापर्यंत सुमारे ५ कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. २०२० पर्यंत ७.५ टक्के वाढीव पर्यटक गुजरातला भेट देतील, असा दावा जोशी यांनी केला.