अनुकंपा तत्त्वावर ६९ जणांच्या नियुक्त्या

काहीजणांना मुख्यमंत्र्यांकडून नियुक्ती पत्रे


06th December 2018, 06:05 pm

विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : सरकारी सेवेत कायम झाल्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील ६९ जणांना अनुकंपा (कॉम्पेसिनेट) तत्त्वावर सरकारी सेवेत नियुक्त करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अनुकंपा नियुक्त्या मंजूर केल्याचे वृत्त ‘गोवन वार्ता’ने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. मुख्यमंत्र्यांनी दि. २ डिसेंबर रोजी काहीजणांना आपल्या हस्ते नियुक्तीपत्रे सुद्धा दिली आहेत. कार्मिक खात्याचे अतिरिक्त सचिव यतिंद्र मराळकर, कायदा खात्याचे अतिरिक्त सचिव शरद मराठे व कार्मिक खात्याचे अवर सचिव हरीष अडकोणकर यांच्या हस्ते बुधवारी उर्वरित उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिली.

कार्मिक खात्याने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दि. २ डिसेंबर रोजी काही उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिल्याचे म्हटले आहे. ज्या ६९ नियुक्तींना मंजुरी दिली आहे त्यात सर्वसामान्य गटासाठीच्या ३५, ओबीसीच्या २४ तर एसटीच्या १० उमेदवारांचा समावेश आहे. दि. १ एप्रिल २०१२ पासून आतापर्यंत ५१२ अनुकंपा नियुक्त्या झाल्या आहेत. ज्यात पूर्वी ४४३ जणांच्या नियुक्त्या तर आज ६९ जणांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.