सेरुला कोमुनिदादीला वालीच नाही ?

Story: अग्रलेख-२ |
06th December 2018, 05:00 am
बार्देशातच नव्हे तर राज्यात श्रीमंत कोमुनिदाद म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, ती सेरुला कोमुनिदाद गैरप्रकारांतही आघाडीवर असल्याचे गेल्या अनेक वर्षांत उघड झाले आहे. कोमुनिदाद ही खऱ्या अर्थाने ग्रामसंस्था. त्याचे विशिष्ट सदस्य असतात. तेच समिती निवडून कारभार चालवतात. सदस्यांना पुरेसा वेळ नसेल, त्यांना त्यात स्वारस्य नसेल तर मग भामट्यांचे फावते! अशा वृत्तीचे काही सदस्य आणि राजकारणी व अधिकारी एकत्र आले की काय होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सेरुला कोमुनिदाद. पर्वरीहून सुरू झालेली या कोमुनिदादची मालमत्ता तीन पंचायत क्षेत्रांत विखुरली आहे. राजधानीपासून जवळ आणि मोक्याच्या ठिकाणी जागा बळकावणे हा खेळ राजकारण्यांचा व अधिकाऱ्यांचा कसा हातचा मळ बनला आहे, हे या ठिकाणी दिसते. याची चौकशी करण्यासाठी सरकारने नियुक्त केलेले तडफदार अधिकारी श्रीनेत कोठावळे या कोमुनिदादमधील घोटाळे उघडकीस आणून कारभार सुरळीत करतील असे सदस्यांना वाटत असतानाच, कोळावळे यांनी या अफाट घोटाळ्याची चौकशी मी अन्य पदे सांभाळून करू शकणार नाही, असे कारण देऊन नियुक्तीच नाकारली आहे. चौकशी झालीच नाही तर भ्रष्टाचाऱ्यांना मोकळे रान मिळेल. भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी सरकारला पूर्ण वेळ अधिकारी मिळू नये ही लोकशाहीची शोकांतिका म्हणावी लागेल. गुन्हेगारी व भ्रष्ट प्रवृत्तीसमोर सरकार गुडघे टेकणार असेल तर मग सेरूला कोमुनिदाद हे संबंधितांसाठी कायम चरण्याचे कुरणच राहील यात शंका नाही.