हरमलात सिंधुदुर्गातील मासळीचे आगमन; दर चढेच


04th December 2018, 06:39 pm

वार्ताहर। गोवन वार्ता
हरमल : गोव्यात फॉर्मेलिन युक्त मासळीवर बंदी घातल्याने मडगावमधून घाऊक पद्धतीने येणारी मासळी पूर्णतः बंद झाली. ताजी मासळी किंचित वाढीव दराने मिळायची. मात्र, अलीकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा, मालवण आदी भागातून मासळी आली व दर बरेच वाढलेले असल्याने ग्राहकांनी नापसंती व्यक्ती केली.
हरमल भागातील ताजी मासळी बांगडे १०० रुपयास ८-९ होते, तर करमट त्यात खापी, सवनाळे, आदी मासळीचे वाटे स्वस्त (१०० रुपये) दिले जायचे. त्यासाठी ग्राहकांची झुंबड होती. इसवण मासळी किलो दराने न देता साधारण अर्धा किलोचा इसवण ५०० रुपये व त्यापेक्षा जास्त दराने विक्रीस होता. तर मोठे दोडकारे ४००-५०० रुपयास दोन दिले जायचे. त्यामुळे कित्येकांनी त्याकडे पाठच फिरविली.
फॉर्मेलिनयुक्त मासळीचा धसका बऱ्याच जणांनी घेतला. त्यास सरकारचे खाते जबाबदार असून फॉर्मेलिनयुक्त मासळी पकडण्यात आली व २४ तासांत तीन तऱ्हेचे अहवाल प्रसिद्ध केले हे गोंधळात टाकणारे होते. त्यामुळे कित्येकांनी मासळी विशेषतः इसवण, माणके, कर्ली, शीतगृहातील बांगडे, पेडवे, आदी मासे खाणे वर्ज्यच केले आहे. परंतु, इसवण खायची रुची असलेले लोक फॉर्मेलिनयुक्त मासळी कशी ओळखायची, असा प्रश्न विचारताना आढळले.
गोमंतकीय लोकांना मासळी प्रिय. मात्र, मासळीवर बंदी घालताना स्वस्त दरात मासळी उपलब्ध करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकले नाही, हे दुर्दैव असल्याचे मत ग्राहक अर्जुन नाईक यांनी व्यक्त केले. तर कित्येकांना मासेमारीसाठी अनुदान रूपात डिझेल, जाळी व होडी घेण्यासाठी कर्जसुविधा देऊनसुद्धा त्यांच्या दरावर सरकारचे नियंत्रण नसल्याचे मत ग्राहक व्यक्त करत आहेत.