श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यावर इंग्लंडची पकड मजबूत


24th November 2018, 04:26 pm

कोलंबो :येथे चालू असलेल्या तिसऱ्या व अंतिम कसोटीत इंग्लंडने श्रीलंकाविरुद्ध ९९ धावांची आघाडी घेतली आहे. पाहुण्या संघाने पहिल्या डावात ३३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने आपल्या पहिल्या डावात २४० धवा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने बिनबाद ३ धावा केल्या होत्या. रोरी बर्न्स २ व कीटन जेनिंग्स १ धाव काढून नाबाद होते.
तत्पूर्वी पहिल्या दिवसाच्या ७ बाद ३१२ धावांवरून पुढे खेळणाऱ्या इंग्लंडचा संघ ३३६ धावांत आटोपला. मोईन अली ३३ धावा करून ८व्या गड्याच्या रुपात ३२८ धावांवर बाद झाला. यानंतर ३२९ धावासंख्येवर स्टुअर्ट ब्रॉड खाते न उघडताच तंबूत परतला. शेवटच्या गड्याच्या रुपात जेक लिच २ धावा करून बाद झाला. आदिल रा​शिद २१ धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडतर्फे पहिल्या डावात जॉनी बेयरेस्टोने सर्वा​धिक ११० धावा केल्या होत्या. बेन स्टोक्सने ५७ व कर्णधार जो रूटने ४६ धावांचं योगदान दिले. श्रीलंकेतर्फे लक्षण संदाकनने सर्वाधिक ५ गडी बाद केले.
पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या लंकेची सुरुवात चांगली झाली नाही. ३१ धावांवर दनुष्का गुणतिलकाच्या (१८) रुपात लंकेला पहिला धक्का बसला. यानंतर दिमुथ करुणारत्ने (८३) व धनंजय डी सिल्वा (७३) यांनी दुसऱ्या गड्यासाठी १४२ धावांची जबरदस्त भागीदारी केली मात्र ही जोडी बाद झाल्यावर लंकेचा डाव कोसळला.
तळातील एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही व संपूर्ण संघ २४० धावांत आटोपला. इंग्लंडतर्फे आदिल राशिदने सर्वाधिक ५ गडी बाद केले तर बेन स्टोक्सने ३ फलंदाजांना माघारी धाडले.
संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड : प. डाव : सर्वबाद ३३६ धावा, दु. डाव : बिनबाद ३ धावा : रोरी बर्न्स (नाबाद) २, कीटन जेनिंग्स (नाबाद) १. गोलंदाजी : दिलरुवान परेरा २-१-१-०.
श्रीलंका : प. डाव : सर्वबाद २४० धावा : दनुष्का गुणतिलका झे. जेनिंग्स गो. लिच १८, दिमुथ करूणारत्ने झे. जेनिंग्स गो. राशिद ८३, धनंजय डी सिल्वा झे. जेनिंग्स गो. राशिद ७३, सुरंगा लकमल (नाबाद) ३. गोलंदाजी : जेक लिच १८-२-५९-१, आदिल राशिद १३.५-२-४९-५, बेन स्टोक्स १०-१-३०-३.