घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या वाहनातील गॅस सिलिंडरची तपासणी


23rd August 2017, 11:15 pm
घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या वाहनातील गॅस सिलिंडरची तपासणीप्रतिनिधी
गोवन वार्ता
वास्को : नागरी पुरवठा व वजन माप खात्यांच्या वास्को विभागांनी झुआरीनगर सांकवाळ येथे घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या वाहनांतील गॅस सिलिंडरची मंगळवारी तपासणी केली. यावेळी तपासलेल्या सर्व सिलिंडरचे वजन योग्य असल्याचे आढळून आले.
बाणावली येथे एका गॅस वितरकाच्या कामगारांनी गॅस सिलिंडरमधील गॅस चोरण्याचा प्रकार उघडकीस आल्यावर नागरी पुरवठा व वजनमाप खात्यांनी गोव्यात ठिकठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरची अचानकपणे तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
यापूर्वी बायणा येथे एका घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या वाहनांतील सिलिंडरच्या वजनाची तपासणी करण्यात आली होती. मंगळवारी झुआरीनगर- सांकवाळ येथे घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी जाणाच्या तयारीत असलेल्या वाहनातील बीपीसी सिलिंडरची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांची वजने योग्य असल्याचे आढळून आले. याप्रसंगी नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक अरुणकुमार, उपनिरीक्षक संजीव नाईक, वजनमाप खात्याचे निरीक्षक आर. एम. बोरकर, भारत गॅस कंपनीचे विक्री व्यवस्थापक प्रतिक श्रीवास्तव तेथे उपस्थित होते.