आमोणे पुलावर दुचाकीची कारला धडक; चालक जखमी


23rd August 2017, 11:15 pm
आमोणे पुलावर दुचाकीची कारला धडक; चालक जखमीवार्ताहर
गोवन वार्ता
अामोणे : अामोणे येथून पणजीच्या दिशेने जाणारी मारुती इको कार (जीए-०७-ई-१७५५) पुलावर बंद पडली होती. चालक गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत असतानाच आमोणे येथून माशेलच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलने (जीए ०४ के ८४४७) कारला मागील बाजूने धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे.
आमाणेवरून पणजीच्या दिशेने जाणारी मारुती इको कार तांत्रिक कारणास्तव आमोणे पुलावर बंद पडली होती. चालक गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. याचवेळी दुचाकीवरून दोघेजण पणजीच्या दिशेने जात होते. भरधाव वेगामुळे त्यांना थांबलेल्या या कारचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांनी कारला मागील बाजूने धडक दिली. यामुळे दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. तसेच दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर कोसळले. या अपघातात दुचाकीस्वार माजमूलला दुखापत झाली. यावेळी पुलावरून जाणाऱ्या अन्य नागरिकांनी रुग्णवाहिकेला बोलावून जखमीला इस्पितळात पाठविले व साखळी पोलिस आऊटपोस्टला अपघाताची खबर दिली. या घटनेची माहिती मिळताच हवालदार दत्ता गावस यांच्यासह अन्य पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मोटारसायकल ताब्यात घेतली. त्यानंतर अपघातग्रस्त कार रस्त्यातून बाजूला करण्यात आली. दरम्यान, अामोणेचे सरपंच संदेश नाईक यांनी गणेश चतुर्थीपर्यंत या पुलावर रहदारी वाढलेली असते, असे सांगत याठिकाणी भरधाव वाहनांवर आळा आणण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करून रहदारीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.