पणजी कांपाल येथे ४० हजारांचा गांजा जप्त


23rd August 2017, 11:15 pm
प्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : पणजी पोलिसांनी कांपाल येथे छापा टाकून ४० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी मूळ उस्मानाबाद - महाराष्ट्र सध्या कांपाल येथे राहणाऱ्या संशयित रमेश विठ्ठल चव्हाण (१९) याला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या चव्हाण याला मंगळवारी पणजी प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आला. यावेळी न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडी ठोठावली आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सोमवारी रात्री ८.१० ते १०.१५ दरम्यान बालभवन - कांपाल जवळ छापा टाकून रमेश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ ४० हजार रुपये किमतीचा ३९० ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. पोलिसांनी पंचनामा करत हा गांजा जप्त केला व त्याला अटक केली. या प्रकरणी पथकाने रमेश विठ्ठल चव्हाण याच्या विरुद्ध अमली पदार्थ कायदा १९८५च्या कलम २२ (बी) ए नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक हळर्णकर पुढील तपास करत आहेत.