माटोळी विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम

 म्हापसा पालिका मंडळ, अधिकारी तोडगा काढण्यास अपयशी : दोन दिवसांच्या कमाईवर पाणी


23rd August 2017, 11:13 pm

प्रतिनिधी
गोवन वार्ता
म्हापसा : म्हापसा मार्केटमध्ये माटोळीचे सामान विकणाऱ्या काही विक्रेत्यांना मार्केटमध्ये तर काही विक्रेत्यांना टॅक्सी स्थानकावर सामावून घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला. ऐन सणाच्या सुरुवातीला करण्यात आलेल्या या प्रक्रियेमुळे माटोळी विक्रेत्यांची समस्या दूर झाली तरीही विक्रेत्यांच्या व्यवसायावर खूप परिणाम झाला
आहे.
पालिका मार्केटमध्ये गणेश चतुर्थीसाठी मोठ्या प्रमाणात माटोळीचे सामान विकायला येते. या सामान विक्रेत्यांची संख्या चारशेपेक्षा जास्त असते. मार्केटमधील सर्व रस्त्यांवर हे विक्रेते बसू लागल्याने लोकांना मार्केटमध्ये फिरताना अडथळा निर्माण होते तसेच वाहतुकीची समस्याही उद्भवते. यामुळे गेल्या वर्षी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत चतुर्थी काळातील मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी फटाके स्टॉल्स व माटोळी सामान विक्रेत्यांना अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
याची सूचना पालिका मंडळाला दिल्यानंतर पालिकेने फटाक्यांचे स्टॉल्स येथील आंतरराज्य बस स्थानकावर व माटोळी विक्रेत्यांचे टॅक्सी स्थानकावर स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी सायंकाळी नगराध्यक्ष रोहन कवळेकर, पालिका मुख्याधिकारी क्लेन मादेरा व पालिका अभियंता हुसेनशहा मुजावर यांनी मार्केटची पाहणी केली. माटोळी सामान विक्रेत्यांच्या स्थलांतराविषयी चर्चा करून मार्केट निरीक्षकांना लेखी निर्देश देण्यात आले.
सर्व माटोळी सामान विक्रेत्यांची व्यवस्था टॅक्सी स्थानकावर होणार नाही. तसेच नव्या कदंब बसस्थानकाच्या ठिकाणी चिखल असल्याने त्याठिकाणीही विक्रेत्यांना जागा देऊ शकत नसल्याचा अहवाल मार्केट निरीक्षकांनी वरिष्ठांना सादर
केला.
पाहणीपुर्वीच माटोळी सामान विक्रेत्यांनी मार्केटच्या रस्त्यांवरील जागा अडविली. पालिका कर्मचाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी याठिकाणी विक्रेत्यांना धंदा न करण्याच्या सूचना दिल्या. गोवा फेरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष सुदेश हसोटीकर यांनी माटोळी सामान विक्रेत्यांना भेटून त्यांची समस्या जाणून घेतली व त्यांना पाठींबा व्यक्त केला.
पालिकेच्या निर्णयानुसार गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही माटोळी विक्रेत्यांची व्यवस्था टॅक्सी स्थानकावर करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांनी सांगितले. टॅक्सी स्थानकावरील खासगी गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था नव्या बसस्थानकानजीक करण्यात येईल, असेही कवळेकर यांनी स्पष्ट केले.
फटाके विक्री स्टॉल्सची व्यवस्था आंतरराज्य बसस्थानकानजीक करण्यात आली आहे. पालिकेने या स्टॉल्ससाठी जागा माेजून दिली आहे. मात्र, या व्यवसायासाठी लागणारा परवाना पालिका तसेच संबंधित खात्यांकडून घेण्यात आलेले नाहीत.