विज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासासाठी करा : नोरोन्हा

चौगुले महाविद्यालयात भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन


16th November 2018, 06:39 pm

वार्ताहर। गोवन वार्ता
नावेली : आजच्या युगात चित्रपट पाहण्यासाठी आता सिनेमागृहावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांना मोबाईल तसेच संगणकावरही चित्रपट पाहता शक्य झाले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीचा वापर करून आपल्या ज्ञानात अधिकाधिक भर घालावी व या ज्ञानाचा उपयोग देशाचा विकास साधण्यासाठी करावा, असे प्रतिपादन सार्वजनिक सेवा आयोगाचे अध्यक्ष जुझे नोरोन्हा यांनी घोगळ, मडगाव येथील श्रीमती पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयात काढले.
श्रीमती पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय आणि विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सव २०१९ च्या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जुझे नोरोन्हा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सन्मानित पाहुणे म्हणून फातोर्ड्याचे माजी आमदार दामोदर नाईक, चौगुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरिश नाडकर्णी, गोवा विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुहास गोडसे, एनआयओचे माजी शास्त्रज्ञ डॉ. राजीव निगम यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना दामोदर नाईक म्हणाले, आजच्या युगात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील झपाट्याने होणारी प्रगती ही चकित करणारी असून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे अनेक चित्रपट तयार झाले. या चित्रपटांकडे पाहताना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थी, युवा वर्गाने संशोधनाला वाव देणाऱ्या कथानकावर भर द्यावा. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. डॉ. उमा मासूर आणि डॉ. सचिन काकोडकर यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. डॉ. गणपत नाईक यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. उमा मासूर यांनी आभार मानले.

गोव्याची निसर्गसंपदा ही विपुल आहे. परंतु, गोव्यात पर्यटकांना आकर्षिक करणारे समुद्र किनारे हे केरळमध्येही आहेत. त्यामुळे भविष्यात या समुद्र किनाऱ्यांचे आकर्षण पर्यटकांना राहणार नाही. त्याऐवजी गोव्यातील ऐतिहासिक स्थळांवर भर देताना पर्यटकांना या ऐतिहासिक स्थळांविषयी माहिती द्यावी. - डॉ. राजीव निगम, एनआयओचे माजी शास्त्रज्ञ