साने गुरुजी कथामाला स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

उत्तर गोवा स्पर्धा २९ नोव्हेंबर, दक्षिण गोवा स्पर्धा ५ डिसेंबरला


16th November 2018, 06:38 pm

वार्ताहर। गोवन वार्ता
नावेली : यंदाची ३१ वी शिक्षक-पालक गोवा प्रदेश साने गुरुजी कथामाला कथाकथन स्पर्धा विविध संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा प्रथम उत्तर गोवा जिल्हा विभाग आणि दक्षिण गोवा जिल्हा विभागात घेतली जाणार आहे.
कथाकथन मराठी विषयातून करायचे असून यासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कथा’ हा विषय राहणार आहे. कथाकथनासाठी ६ ते ७ मिनिटांचा अवधी देण्यात येईल. कथा संस्कारक्षम व उद्बोधक असावी.
उत्तर गोवा विभागीय स्पर्धा गुरुवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता सरकारी प्राथम‌िक विद्यालय, केंद्र शाळा डिचोली येथे व दक्षिण गोवा विभागीय स्पर्धा बुधवार, दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी कोंब, मडगाव येथील महिला आणि नूतन विद्यालय येथे घेण्यात येतील. कथेची निवड (५ गुण), आत्मविश्वास (१० गुण), सादरीकरण (१५ गुण), एकंदर परिणाम (१० गुण) या निष्कर्षांवर परीक्षण केले जाईल.
दोन्ही विभागीय पातळीवरील विजेत्या स्पर्धकांना पुस्तक रूपाने पुरस्कार त्याचवेळी देण्यात येतील. या स्पर्धेतील विजेत्यांना रु. ५२५, रु. ४२५, रु. ३७५ अशी प्रथम तीन क्रमांकाची बक्षिसे देण्यात येतील. राज्य पातळीवरील स्पर्धा दि. १४ डिसेंबर रोजी घेण्यात येईल. राज्यस्तरावरील विजेत्यांना रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रथम तीन विजेत्यांना रु. ७५०, रु. ६००, रु. ४५० तर उत्तेजनार्थ रु. ३५० चे दोन पुरस्कार देण्यात येतील.
प्रा. भास्कर गं. नायक (मडगाव) यांनी आपले चुलते ‘भारतमित्र’कार ना.भा. नायक यांच्या स्मरणार्थ फिरता चषक पुरस्कृत केला आहे. अधिक माहितीसाठी उपाध्यक्ष श्रीकृष्ण शांताराम धोंड, डिचोली (९६२६१००९३७) किंवा नारायण चंदगडकर (९९६०४१८२४०) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.