‘ते’ परिपत्रक बदलले

सर्वसाधारण प्रशासनाकडून चुकीची दुरुस्ती


16th November 2018, 06:20 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : सरकारमधील सर्वांच्या भुवया उंचावण्यास कारणीभूत ठरलेले ‘ते’ परिपत्रक अखेर सर्वसाधारण प्रशासन विभागाने बदलले आणि मंत्र्यांचा जीव भांड्यात पडला. सर्वसाधारण प्रशासन विभागाच्या अवर सचिव वर्षा नाईक यांनी सुधारित परिपत्रक जारी करून या घोळावर अखेर पडदा टाकला. या वादग्रस्त परिपत्रकामुळे मात्र सरकारी प्रशासन कोलमडल्याचे स्पष्ट झाले.                   

सविस्तर वृत्त असे की, मंगळवार, दि. १३ रोजी सर्वसाधारण प्रशासन विभागाकडून एक परिपत्रक जारी झाले हाेते. त्या परिपत्रकात सर्व सरकारी सचिव, अतिरिक्त सचिव, संयुक्त सचिव, अवर सचिव, खाते प्रमुख, अधिकारी तसेच महामंडळ, स्वायत्त संस्था यांना सरकारी पत्रव्यवहार, फाईल्स व इतर सरकारी कामकाजासंबंधीच्या फाईल्स वीजमंत्र्यांच्या पर्वरी मंत्रालयातील कार्यालयात पाठविण्यात याव्यात, असे सुचविण्यात आले होते. या परिपत्रकामुळे एकच खळबळ उडाली. हे परिपत्रक म्हणजे अप्रत्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ताबा दिला की काय, अशी चर्चा सुरू झाली. या परिपत्रकावरून मंत्रिमंडळात एकच खळबळ उडाली. काही मंत्र्यांनी तत्काळ या परिपत्रकाला आक्षेप घेऊन या परिपत्रकाबाबत स्पष्टीकरण मागितले. 

सर्व खात्यांशी संबंधित फाईल्स आणि सरकारी व्यवहार वीजमंत्र्यांकडे पाठविण्याचा हेतू काय, असा जाब त्यांनी विचारला. हे परिपत्रक मुख्य सचिवांच्या मंजुरीने जारी केल्याचेही या परिपत्रकात नमूद केल्यामुळे हा विषय अधिकच गंभीर बनला.                  

या सगळ्या गोंधळानंतर संध्याकाळी सर्वसाधारण प्रशासन विभागाच्या अवर सचिव वर्षा नाईक यांनी नवे सुधारित परिपत्रक जारी करून या वादावर अखेर पडदा टाकला. नव्या सुधारित परिपत्रकात वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे देण्यात आलेल्या जबाबदारीसंबंधीच्या सर्व फाईल्स त्यांच्या पर्वरी मंत्रालयातील पहिल्या मजल्यावरील १०५ नंबरच्या कार्यालयात पाठविण्यात याव्यात, असे संबंधित सचिवालय अधिकारी आणि इतर खाते प्रमुख तसेच महामंडळ आणि स्वायत्त संस्थांना सुचविण्यात आले आहे. सर्वसाधारण प्रशासनाकडून या परिपत्रकात सुधारणा केली खरी परंतु मुख्यमंत्र्यांकडून एखादवेळी आपली जबाबदारी अन्य मंत्र्याकडे सोपविल्यास त्याचे कशा पद्धतीने तीव्र पडसाद उमटू शकतात, याची झलक मात्र या प्रकारातून पाहायला मिळाली.