कोनेत क्रेनखाली चिरडून महिलेसह चिमुकला ठार


16th November 2018, 06:18 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता

फोंडा : कोने-प्रियोळ येथे गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात चिमुकल्यासह एक महिला जागीच ठार झाले. संगीता सदानंद गावडे (३८, रा. सांगाव-प्रियोळ) आणि देवेश राजेश जल्मी (३, रा. कोने) अशी मृतांची नावे आहे. देवेश हा संगीताच्या भावाचा मुलगा होता. हे दोघेही एक मोठ्या क्रेनच्या खाली चिरडल्याने त्यांचा करुणाजनक अंत झाला. याप्रकरणी पोलिसांनी क्रेनचे चालक मुल्ला कुमार साह (२९, रा. बिहार) याला अटक केली आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक चक्क चार तास ठप्प होती. या काळात वेलिंग व प्रियोळच्या बाजूने वाहतूक वळविण्यात आली होती.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कोने-प्रियोळ येथे रस्त्याकडेलाच संगीत गावडे यांच्या मालकीचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी ३.३० वा.च्या सुमारास संगीता आपल्या भावाच्या मुलाला घेऊन रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात होती. त्याचवेळी दोघे क्रेनच्या चाकाखाली सापडले. हा प्रकार बघून क्रेन तेथेच सोडून चालकाने पळ काढला. घटनेची माहिती मिळताच गावडे आणि जल्मी कुटुंबियांनी अपघातस्थळी धाव घेतली. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. बातमी ऐकून घटनास्थळी मोठा जमाव झाला. या जमावाने क्रेनला आग लावण्याचा प्रयत्न केला. इतक्यात पोलिसांनी धाव घेऊन आग विझविली. यावेळी कुटुंबियांनी आणि स्थानिकांनी क्रेनचालकावर कारवाई करण्याची मागणी केली. दुसऱ्या बाजूने पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करून संशयित क्रेनचालक मुल्ला याला बेतोडा येथून अटक केली. या अपघातामुळे देवेशचे वडील सदानंद गावडे आणि त्याच्या आईला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. या घडामोडींमुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल ४ तास ठप्प होती. दरम्यान, या भागाचे आमदार या नात्याने मंत्री गो‌विंद गावडे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन कुटुंबियांची सांत्वना केली. त्यानंतर रात्री ८ वाजता वाहतूक पूर्वपदावर आली. 

उपजिल्हाधिकारी विशाल कुंडईकर, मामलेदार अभिर हेदे, फोंडा पोलिस निरीक्षक हरीश मडकईकर, पोलिस निरीक्षक कपिल नायक, पोलिस निरीक्षक नवलेश देसाई आणि इतर पोलिस घटनास्थळी उपस्थित होते. फोंडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपासणी करीत आहेत.