राजन घाटेंचे आजपासून बेमुदत उपोषण


16th November 2018, 06:17 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता                  

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेल्या ९ महिन्यांपासून आजारी असल्याने प्रशासनावर त्यांचा वचक राहिलेला नाही. एकंदरीत राज्याचे प्रशासन पूर्णतः कोलमडले असून  लोकशाही धोक्यात आली आहे. या लोकशाहीला वाचविण्यासाठी शुक्रवारपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले जाईल, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ता राजन घाटे यांनी दिली.

पणजी येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत घाटे बोलत होते. यावेळी नारी अधिकार संस्थेच्या अॅड. दीया शेटकर,  गोवा सिटीझन फोरम व अन्य सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.                  

मुख्यमंत्री पर्रीकर आजारी आहेत. हे आम्हाला माहिती असून ते लवकर चांगले व्हावेत, अशी प्रार्थना देवाकडे करतो. पण त्यांच्या आजारपणामुळे प्रशासन टप्प झाल्याने १५ लाख लोकांवर अन्याय होत आहेत. त्यामुळे या संदर्भात मुख्यमंत्री पर्रीकर यांनी विचार करून निर्णय घेतला पाहिजे. गेले तीन महिने मुख्यमंत्री पत्रकारांनाही भेटले नाहीत, तसेच लोकही त्यांची वाट पाहत आहेत, असे घाटे यावेळी म्हणाले. 

पर्रीकर यांनी आपल्याकडे असलेली खाती अन्य मंत्र्यांकडे सोपवावी व नेतृत्वबदल करून लोकशाही वाचवावी. त्यांनी खुर्चीसाठी गोव्यातील लोकशाही धोक्यात घालू नये, असेही घाटे यावेळी म्हणाले.

राजन घाटे यांनी घेतलेला निर्णय गोमंतकीयांच्या हितासाठी आहे. त्यामुळे सर्व गोमंतकियांनी त्यांनी पाठिंबा द्यायला हवा, असे अॅड. शेटकर यावेळी म्हणाल्या.