‘गोसुमं’ पक्षाकडून रविवारी सुभाष वेलिंगकरांचे स्वागत

राज्यात भाजपचा अस्त निश्चित : आत्माराम गांवकर

16th November 2018, 06:16 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता                        

पणजी : भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि भारत माता की जय या संघटनांच्या जबाबदारीतून मुक्त झालेले आणि सक्रिय राजकारण प्रवेशाची सर्वांनुमते मान्यता मिळालेले  प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे रविवार, दि. १८ रोजी गोवा सुरक्षा मंच पक्षात पदार्पण होणार असून पक्षातर्फे पर्वरी येथील कार्यकर्ता महामेळाव्यात त्यांचे भव्य स्वागत करण्यात येईल. प्रा. वेलिंगकर यांच्या राजकारण प्रवेशामुळे राज्यात भाजपचा अस्त आणि ‘गोसुमं’चाच उदय निश्चित अाहे, असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष आत्माराम गांवकर यांनी व्यक्त केला.      

गोवा सुरक्षा मंचतर्फे गुरुवारी पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गांवकर बोलत होते. याप्रसंगी संघटन महासचिव संदीप पाळणी, उत्तर गोवा संघटक विनायक च्यारी आणि महिला अध्यक्ष अॅड. रोशन सामंत हजर होते.       

सुभाष वेलिंगकर यांच्यामुळे पक्षात नवचैतन्य पसरले आहे. पुढील महिन्यात पक्षाची एक भव्य महासभा आयोजित केली जाईल. त्यात पुढील कृती आराखडा जाहीर केला जाईल, असे गांवकर यावेळी म्हणाले. (पान ४ वर)

राज्याला एक सांस्कृतिक वारसा आहे. परंतु भ्रष्टाचार, अनैतिकता आणि खोटारडेपणाचा राजकारणाने कळस गाठला आहे. या परिस्थितीला जनता कंटाळलेली आहे. भावी पिढीसाठी गोवा सुरक्षित ठेवायचा असेल तर त्यासाठी नव्या विचारांची राजकीय चळवळ उभी राहावीच लागेल. गोवा सुरक्षा मंच पक्ष ही जबाबदारी खांद्यावर घेणार आहे, असेही गांवकर म्हणाले. आत्तापर्यंत भाजपला सत्तेवर आणण्यात केडरची मुख्य भूमिका राहिली आहे. हा केडर पूर्णपणे दुर्लक्षित राहिला आहे. या केडरची पक्षात मानहानी सुरू आहे. त्यामुळे तळागाळातील भाजप केडरला आता भाजप अनोळखी बनत चालला आहे. गोवा सुरक्षा मंच पक्षाच्या रूपात याच केडरचा एक मोठा गट पक्षापासून दुरावला आहे. आता सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा सुरक्षा मंचची पुढील वाटचाल सुरू झाल्यानंतर भाजपच्या मूळ विचारांची कदर असलेला केडर या पक्षाकडे दाखल होणार असल्याचेही गांवकर यांनी सांगितले.                         

राज्यावर आेढावलेल्या विचित्र परिस्थितीमुळेच वेलिंगकर यांच्यासारख्या व्यक्तीला राजकारणात प्रवेश करावा लागणार आहे. भाजपच्या वाटचालीत वेलिंगकर यांचे मोठे योगदान आहे. आता सत्तेच्या धुंदीत भाजप नेत्यांनी विचार, धोरणांना तिलांजली दिली आहे. याच भाजपला कंटाळलेल्या लोकांना योग्य पर्यायाचा शोध होता. तो पर्याय गोवा सुरक्षा मंच पक्षाने प्राप्त करून दिलेला आहे, अशी माहिती आत्माराम गांवकर यांनी दिली. भाजपच्या मूळ नेत्यांसाठी गोवा सुरक्षा मंच पक्षाची दारे खुली आहेत. ज्यांना खरोखरच राज्याचा सांस्कृतिक वारसा जपायचा असेल आणि भावी पिढीसाठी हे राज्य सुरक्षित ठेवायचे असेल, त्यांनी बिनदिक्कत गोवा सुरक्षा मंच पक्षात दाखल व्हावे. या राजकीय चळवळीचा एक भाग बनावे, असे आवाहनही गांवकर यांनी यावेळी केले.       

सुभाष वेलिंगकर यांची सक्रीय राजकारण प्रवेशासाठी समजूत काढणाऱ्या भारतीय भाषा सुरक्षा मंच, भारत माता की जय आणि ‘लोकशाही बचाव, गोवा बचाव’ या मंचाचे यावेळी गांवकर यांनी आभार व्यक्त केले.

भविष्यात मगोशी युती नाही

या पत्रकार परिषदेत गांवकर यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षावरही निशाणा साधला. २०१७ साली गोवा सुरक्षा मंचने मगोशी युती करून विधानसभा निवडणूक लढविली. मात्र, निकाल जाहीर होताच त्यांनी आपले रंग दाखविले. निकालानंतर मगोशी युती करणे, हा चुकीचा निर्णय होता, हे लक्षात आले, असे गांवकर यावेळी म्हणाले. मगोने तत्व आणि विचारधारेला तिलांजली दिली असल्याने भविष्यात कधीही या पक्षाशी युती केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाही गांवकर यांनी मांडली.

Related news

‘फोमेंतो मीडिया’तर्फे हुतात्मा जवानांना श्रद्धांजली

मिरामार येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध; पाकला अद्दल घडविण्याची मागणी Read more

विष्णू वाघ यांच्यावर आज फोंड्यात अंत्यसंस्कार

बांदोडकर मैदानावर अंत्यदर्शन; मंत्री गोविंद गावडे यांची माहिती Read more