खाण अवलंबितांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा

अवलंबित आज घेणार सरदेसाई, चोडणकर, गोम्स यांची भेट


16th November 2018, 06:15 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता            

पणजी : राज्यातील खाणी चालू करण्यासाठी खाण अवलंबितांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली असून शुक्रवारी ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई आणि आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक एल्विस गोम्स यांची भेट घेणार आहेत. सर्व राजकीय पक्ष प्रमुखांची भेट घेऊन खाणप्रश्न सोडविण्यासाठी कायदा दुरुस्ती प्रस्तावाला पाठिंबा मिळवण्यासाठी खाण अवलंबितांनी ही मोहीम सुरू केली आहे.             

भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आणि मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांची बुधवारी भेट घेऊन आक्रमक पद्धतीने हा विषय मांडल्यानंतर आता अन्य राजकीय पक्षांच्या प्रमुखांना भेटण्याचे खाण अवलंबितांनी ठरवले आहे. दीपक ढवळीकर यांनी १५ डिसेंबरपर्यंत खाणप्रश्न सुटला नाही तर, सरकारच्या पाठिंब्याबाबत फेरविचार करू, असा इशारा देऊन खाण अवलंबितांच्या या मोहिमेची उत्सुकता वाढवली आहे. विनय तेंडुलकर यांनी पुढील १५ दिवसांत निश्चित पर्याय खुला करू, असे म्हणून खाण अवलंबितांना आश्वस्त केले आहे. आता अन्य राजकीय पक्षांचे प्रमुख नेमकी काय भूमिका घेतात, याचे कुतूहल खाण पीडितांना लागून राहिले आहे. शिवसेनेनेही खाण अवलंबितांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेनेचे लोकसभेतील खासदार कायदा दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार आहेत, असेही त्यांनी कळविल्याची माहिती राज्य उपप्रमुख राखी नाईक यांनी दिली आहे.             

खाणप्रश्नी वटहुकूमाची शक्यता मावळल्यानंतर आता एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करण्याचा एकमेव पर्याय राहिला आहे. केंद्र सरकारने तशी प्रथमदर्शनी तयारी दर्शविल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे. दि. ११ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. 

या काळात दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे कार्यक्रम आयोजित करण्याचाही खाण अवलंबितांचा मनोदय आहे. गोवा मायनिंग पिपल्स फ्रंटचे निमंत्रक पुती गांवकर यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेकडून खाणी सुरू होण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत खाणप्रश्न केंद्रस्थानी असेल. त्यामुळे हा विषय तत्काळ सोडवण्यासाठी भाजपचेही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीत भाजपचे तीन खासदार आहेत. श्रीपाद नाईक हे केंद्रात आयुषमंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांनी आपले वैयक्तिक संबंध आणि पक्ष संघटनेच्या मदतीने हा विषय निकालात काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही या संघटेनेतर्फे करण्यात आली आहे.

आझाद मैदानावर आज जमणार अवलंबित

शुक्रवारी सकाळी सुमारे १ हजार खाण अवलंबित आझाद मैदानावर एकत्र येतील. तिथून ते राजकीय पक्ष प्रमुखांच्या भेटीसाठी जातील. या मोहिमेद्वारे शक्तीप्रदर्शन करून, तसेच या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठीचा हा भाग आहे, असे यावेळी पुती गांवकर म्हणाले.