राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार

विद्यार्थ्यांना निवासी शिबिरात सहभागी करून त्यांना या राज्यातल्या ग्रामीण भागाचा परिचय करून देण्याबरोबर श्रमसंस्कार, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता निर्माण करण्यात राष्ट्रीय सेवा योजना परिणामकारक ठरलेली आहे.

Story: लढवय्या | राजेंद्र पां. केरकर |
16th November 2018, 06:00 am
राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार

‘‘सर, शौचालयात पाय ठेवायला ही जागा नाही. आत मोठया प्रमाणात मैला भरलेला आहे. सर्वत्र असह्य दुर्गंधीचे गलिच्छ वातावरण आहे. इथे आमचे दहा दिवस जाणे अत्यंत कठीण आहे. शौचालयाची परिस्थिती ओकारी आणण्यासारखी आहे.’' राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थी उद्गारले. खरंतर आम्ही ज्यावेळी दहा दिवसीय शिबिरासाठी जागा पाहण्यास आलो तेव्हा तेथे अशी ओंगळवाणी परिस्थिती नव्हती. शौचालयाची घाणीने भरलेली स्थिती पाहून, आमच्या शिबिराचा गाशा इथून गुंडाळला जावा, अशी निवासी शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मागणी होती. शिबिरासाठी निवडलेला ग्रामीण भागातील परिसर प्रेक्षणीय जरी असला तरी जेथे निवास करणार तेथील शौचालयाचा गलिच्छपणा विद्यार्थ्यांना शिसारी आणणारा होता. विद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी म्हणून दहा दिवसांचे निवासी शिबिर अायोजन करण्याचा माझा तो पहिलाच अनुभव होता. शौचालयाची ती परिस्थिती पाहून काय करावे असा प्रश्न माझ्यासमोर अा वासून उभा होते. त्यावेळी आमच्या समोर महात्मा गांधीजींची प्रतिमा तरळली. अाफ्रिकेहून स्वगृही परतून श्रमदान, स्वच्छता अभियानासारखे लोकोपयोगी उपक्रम हाती घेणाऱ्या उच्चविद्याविभूषित असणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने हाती केरसुणी घेऊन झाडलोटीद्वारे स्वच्छतेचे अभियान यशस्वी केले होते. मैला डोक्यावरून वाहून त्यांनी आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्यांवर आपल्या प्रत्यक्ष कृतीद्वारे श्रमसंस्कार केले होते. हा प्रसंग अाठवताच मी हातात फावडे अाणि घमेली घेऊन तडक शौचालयाच्या ठिकाणी गेलो. मानवी मलमूत्राची दुर्गंधी असह्य असताना मी संचारल्यागत शौचालयात काम करू लागलो. शौचालयात मी काम करतो हे पाहताच शिबिरार्थी न सांगता माझ्या हातातले फावडे घेऊन सहभागी झाले आणि हा हा म्हणता काही अवधीत शौचालय साफ झाले.
जे शिबिरार्थी शौचालयाची परिस्थिती पाहून अगदी निरुत्साही झाले होते ते उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आणि शौचालयाचाच नव्हे तर तिथल्या परिसराचा कायापालट केला. त्यानंतर शिबिरातले दहा दिवस हे शौचालय वापर करून झाल्यावर स्वच्छ ठेवण्यात शिबिरार्थीच पुढे होते. पुन्हा त्यांच्याकडून अशा स्वरूपाची अन्य तक्रार माझ्याकडे आली नाही. त्यानंतर गावातला अंतर्गत रस्ता श्रमदानाने सुमारे एक किलोमीटर पूर्ण करण्यात यश मिळवले. केरकचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यातही त्यांनी अजिबात शिथिलता दाखवली नाही. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीत विश्व विद्यालय अनुदान अायोगाचे अध्यक्ष डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी महाविद्यालय, विद्यापीठ आणि उच्च माध्यमिक विद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना लागू करण्याची जी शिफारस केली होती ती मान्य केली. त्यानुसार ९ नोव्हेंबर १९६९ रोजी विद्यार्थ्यांना ग्रामीण परिसराचा परिचय करण्याबरोबर त्यांच्यावर श्रमसंस्कार व्हावे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम देशभर सुरू झाला. गोव्यातल्या विद्यार्थ्यांना निवासी शिबिरात सहभागी करून त्यांना या राज्यातल्या ग्रामीण भागाचा परिचय करून देण्याबरोबर श्रमसंस्कार, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता निर्माण करण्यात राष्ट्रीय सेवा योजना परिणामकारक ठरलेली आहे. वर्षभरातल्या नियोजित उपक्रमांबरोबर दहा दिवसीय निवासी शिबिराच्या आयोजनाद्वारे ग्रामीण भागातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यात विद्यार्थी कसे सक्रिय होऊ शकतात या दृष्टीने राष्ट्रीय सेवा योजनेने महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.
माझे बालपण ज्या परिसरात व्यतीत झाले तो गाव एक तपापूर्वी बऱ्याच अावश्यक नागरी सुविधांपासून वंचित होता. त्यावेळी दिवाळी आणि नाताळाच्या सुट्टीत आमच्या गावात येणाऱ्या महाविद्यालय अाणि उच्च माध्यमिक विद्यालयांच्या शिबिरार्थींच्या मदतीने बरेच उपक्रम यशस्वीपणे हाती घेण्यात मला सहभागी व्हावे लागायचे. बऱ्याचदा गावात कुठे श्रमदानाने रस्त्याचे बांधकाम करायचे, रानटी विदेशी अपायकारक वनस्पती नष्ट करून शाळा, मंदिर यांचा परिसर स्वच्छ, निर्मळ करण्यासारख्या उपक्रमांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी शिबिरार्थींद्वारे करण्याची जबाबदारी मला स्वीकारावी लागे. राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली तर त्यातून राष्ट्र उभारणीत आपले वर्तमान आणि भवितव्य व्यतीत करणारी व्यक्तिमत्त्वे निर्माण होऊ शकतात, असा आशावाद माझ्यात असल्याने ज्या उच्च माध्यमिक विद्यालयात मला राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी म्हणून जेव्हा जेव्हा काम करण्याची संधी लाभली अथवा एखाद्या महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपक्रमात सहभागी झालो, तेव्हा तेव्हा शिबिरार्थींद्वारे विधायक कार्य व्हावे म्हणून प्रयत्न केले.
शिबिरार्थींवर श्रमसंस्कार रुजावे, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, सामाजिक समरसतेची जाणीव व्हावी म्हणून वेळोवेळी जे उपक्रम हाती घेतले त्यांना चांगला प्रतिसाद लाभला. दिवाळी, नाताळ, उन्हाळी अशा सुट्टीत राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे शिबिरार्थींना श्रमदान, स्वच्छता मोहीम, पाणी अडवा, पाणी जिरवा अशा उपक्रमांबरोबर पथनाट्य, गीतगायन, नाटिका सादरीकरणाद्वारे विविध विषयांसंदर्भात जागृती अभियान राबवणे शक्य आहे. भारतीय स्वातंत्र्यप्राप्ती अाणि गोवा मुक्ती होऊन इतकी वर्षे लोटली तरी आजही आपल्या गावात अस्पृश्यता, जातीयतेचा राक्षस जिवंत राहिलेला असून आमच्या समाजजीवनात थैमान घालत आहे. या परिस्थितीशी संघर्ष देणाऱ्या पिढीचे हात बळकट करण्यात, उपेक्षितांचे सबलीकरण व्हावे म्हणून वावरणाऱ्या संस्थांना उर्जा देण्यात शिबिरार्थी सहभागी होऊ शकतात.
सकस आहार, विविध नवनवीन रोगराईबाबत जागृती करण्यासाठी वसंत बंधाऱ्याचे काम करण्यास ओहळ, नाले स्वच्छ करण्यात शिबिरार्थींच्या सामर्थ्याचा नियोजनबद्ध उपयोग करण्यास चालना देणे शक्य आहे. आज पर्यावरणीय समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून हवा, जल, ध्वनी प्रदूषणाबाबत शिबिरार्थी पथनाट्याद्वारे जागृती करू शकतात. सरकारी साधनसुविधांचा लाभ ग्रामीण भागातल्या उपेक्षित, दुर्बल समाज बांधवांना मिळवून देण्यात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी आपल्या साथीदारांच्या पाठबळावर अशा उपक्रमांचे परिसरातल्या परिस्थितीनुसार यशस्वीपणे नियोजन करून अंमलबजावणी करू शकतो. पदभ्रमण, गिर्यारोहणासारख्या उपक्रमांद्वारे शिबिरार्थी निसर्ग आणि पर्यावरणाच्या जवळ येऊन, निसर्गात चालू असलेला उत्सव अनुभवण्याबरोबर निसर्गातल्या अनेक अज्ञात रहस्यांची प्रात्यक्षिकासह उकल करू शकतात. जबर इच्छाशक्ती, अथक प्रयत्नांची पराकाष्ठा, नियोजनाचा आराखडा, होकारार्थी दृष्टिकोन अंगी बाळगणारा राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी समाजात बदल घडून अाणण्यात यशस्वी होऊ शकतो.